
खंडप्राय भारत देशात गरीबांची संख्या मोठी आहे. यावर्षी भारतासह जगाला कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका बसला. यामुळे भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या. काही जण कमी पगारावर काम करत आहेत, तर काहींना रोजचं कसं जगायचं? आणि दोन वेळेस काय खायंच? हा मुलभूत प्रश्न पडला आहे.
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्या पूर्व दिल्लीचा भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखला जातो. प्रत्येकामधील माणुसकीची परीक्षा घेणाऱ्या सध्याच्या काळात गंभीर पुन्हा एकदा पुढं आला आहे. गंभीरने पूर्व दिल्ली मतदारसंघात ‘जन रसोई’ ची सुरुवात केली आहे. या ‘जन रसोई’मध्ये अवघ्या एक रुपयात भरपेट जेवण दिले जाणार आहे. गंभीरने गुरुवारी दिल्लीतील गांधी नगर भागात पहिल्या ‘जन रसोई’चे लोकार्पण केले. लवकरच त्याच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व 10 मतदारसंघात हा उपक्रम सुरु होणार आहे.
“कोणत्याही व्यक्तीला त्याची जात, धर्म, आर्थिक परिस्थिती याचा कशाचाही विचार करता दोन वेळा भरपेट जेवण मिळण्याचा अधिकार आहे. अनेक बेघर आणि निराधारांना हा अधिकार मिळत नाही, हे पाहून वाईट वाटते.’’ अशी खंत गंभीरनं यावेळी बोलून दाखवली.
जेवणात काय मिळणार?
दिल्लीतील या ‘जन रसोई’मध्ये एका वेळी 100 जणांना बसण्याची क्षमता आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेळी जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. मसूरची डाळ, भात आणि भाजी असा या जेवणाचा मेन्यू असेल. विशेष म्हणजे हा सर्व खर्च गौतम गंभीर स्वत:च्या खिशातून आणि गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून करणार आहे. यासाठी तो कोणतीही सरकारी मदत घेणार नाही.
( वाचा : उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’! )
गंभीरनं नेहमीच जपलं सामाजिक भान
सामाजिक भान जपण्याची गंभीरची ही पहिलीच वेळ नाही. छत्तीसगडमधील सुकमामध्ये 2015 आणि 2017 साली झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीरकडून केला जातो. कोरोनाच्या महामारीतही त्यानं खासदार फंडाचा सर्व निधी दिल्ली सरकारला कोरोनाचा सामना करण्यासाठी दिला होता. दिल्लीमध्ये अडकलेल्या स्थालांतरित मजुरांनाही त्याने गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून भरभरुन मदत केली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.