फोटो – ABP NEWS

टीम इंडिया (Team India) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन टीममध्ये एक मुख्य साम्य आहे. दोन्ही ठिकाणी  टीमला विकेटची गरज असते तेंव्हा कॅप्टन जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) आठवण येते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिज सुरु झाल्यापासून ही गोष्ट सातत्यानं अधोरेखित होत आहे. प्रॅक्टीस मॅचमध्ये टीमची अवस्था झालीय, ओके. बुमराह हाफ सेंच्युरी करेल. अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ‘ऑस्ट्रेलियन टीमवर दबाव टाकायचा आहे?’, बुमराह दोन्ही ओपनर्सना आऊट करेल. पृथ्वी शॉ लवकर ‘आऊट झालाय, शेवटच्या ओव्हर्स कोण खेळेल?’ बुमराहला बॅट घेऊन मैदानात पाठवा. ‘मेलबर्न टेस्टमध्ये आपला कॅप्टन नवा आहे. चौथ्या विकेटची पार्टनरशिप लांबायला लागलीय, कॅप्टनचे डोळे पुन्हा बुमराहला शोधतात. बुमराह शांतपणे बॉलिंग सुरु करतो आणि विकेट घेतो.

बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तीन्ही प्रकार आणि आयपीएलही नियमीतपणे खेळतो. भागीदारी तोडणे, किंवा डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकून प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना जखडून ठेवण्याचे काम तो सातत्याने करत आलाय. त्यामुळेच महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, पार्थिव पटेल आणि आता अजिंक्य रहाणे या त्याच्या सर्व कॅप्टन्सनी अनेकदा मोठ्या अपेक्षेने त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे.बुमराहनेही त्यांना क्वचितच निराश केलंय. त्याच्या प्रत्येक कॅप्टनला तो जणू इतकचं सांगतोय, ‘ डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

कुठे जन्मला बुमराहाचा यॉर्कर?

जसप्रीत बुमराह सात वर्षाचा असतानाच त्याचे वडिल गेले. अहमदाबादच्या शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या आईने जसप्रीत आणि त्याच्या मोठ्या बहिणीला वाढवले. क्रिकेटची टोकाची आवड असलेला जसप्रीत दुपारी घरातही बॉलिंगचा सराव करत असे. आईची झोप मोड होऊ नये म्हणून खोलीतल्या विशिष्ट भागात बॉलिंग करण्याची सवय त्याने स्वत:ला लावून घेतली. सातत्याने एकाच टप्प्यावर बॉलिंग करणे आणि त्यातही हुकमी यॉर्कर टाकणाऱ्या बुमराहचा जन्म इथेच झाला.

बॉलिंग अँक्शन आणि लवकर शिकण्याची सवय यामुळे बुमराह सुरूवातीपासूनच इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या प्रत्येक कोचने त्यामुळेच त्याच्यावर विशेष मेहनत घेतली. गुजरात क्रिकेट संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. एमआरएफ पेस फाऊंडेशन, नॅशनल क्रिकेट अँकडमीतल्या प्रशिक्षणानंतर त्याच्या बॉलिंगला आणखी धार आली. मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे तत्कालिन कोच जॉन राइट यांच्या तो नजरेत भरला. त्यानंतरच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले.

बुमराहला मुंबई इंडियन्समध्ये लसिथ मलिंगा भेटला. श्रीलंकेचा हा फास्ट बॉलर जागतिक क्रिकेटमध्ये ‘अंगठातोड यॉर्कर’साठी ओळखला जातो. बुमराहसारखीच त्याची बॉलिंग अँक्शनही अपारंपारिक. त्याच्या सोबत सराव केल्याचा मोठा फायदा बुमराहला झाला. आयपीएल कारकिर्दीमधल्या पहिल्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने त्याला तीन चौकार लगावले. नवोदित बॉलर्सनी खांदा टाकावा यासाठी ही आदर्श परिस्थिती होती. पण बुमराहने खांदे पाडले नाहीत. तो त्वेषाने उभा राहिला. त्याच ओव्हरमध्ये त्याने विराटला बाद केले. भारतीय क्रिकेटच्या विश्वात नव्या गोलंदाजाचा उदय झाला होता.   

( वाचा : ‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज! )

झटपट क्रिकेटचा उदय झाल्यापासून बॅटिंगमध्ये झपाट्याने बदल झाला. बॅटचा बदललेला आकार हे याचे महत्त्वाचे कारण आहेच. मात्र त्याचबरोबर बॅट्समन्सनीही सातत्याने त्यांच्या शैलीत नवे बदल केले. 2020 च्या बॅट्समन्सची 1980 मधील बॅट्समन्सची तुलना करताना हा बदल ठळकपणे जाणवतो. फ्रंटफुट-बॅकफुट, फटक्यांची रेंज आणि मनोवृत्ती हे सारं काही गेल्या चाळीस वर्षात बदलले आहे. त्या तुलनेत आजही फास्ट बॉलर्स चाळीस वर्षापूर्वीची पद्धतच वापरतात. त्यांची रन-अप आणि बॉल टाकण्याची पद्धत आजही तशीच आहे. या पद्धतीला अपवाद दोन जण आहेत. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारताचा जसप्रीत बुमराह. आतंरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोन्ही प्रकारात या दोघांनी मोठं यश मिळवलंय.

प्रत्येक फॉरमॅटमध्ये यशस्वी

मुंबई इंडियन्समध्ये नुकताच दाखल झालेला बुमराह आणि सध्याचा बुमराह या दोन्ही काळातल्या व्हिडिओ टेप्स काढून पहा. त्याने आपल्याकडील नैसर्गिक गुणवत्तेला योग्य तंत्राची साथ दिलीय. तो सतत खूप काही वेगळे करत नाही. मात्र बॅट्समन्सना कोड्यात पडणारे बदल यशस्वीपणे करतो. फास्ट बॉलर्सची म्हणून ओळखली जाणारी भक्कम शरिरयष्टी आजही त्याच्याकडे नाही पण आवश्यक असा फिटनेस त्याने कमावलाय. त्यामुळेच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये तो सातत्याने खेळतोय आणि स्वत:ला सिद्ध करतोय.

( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )

‘बुमराहला टेस्ट टीममध्ये का घेतलं?’ असा प्रश्न काही तज्ज्ञांनी विचारला होता. वेस्ट इंडिजचे महान फास्ट बॉलर मायकल होल्डिंग यांनी त्याची इंग्लंडमध्ये खरी परीक्षा असेल अशी भविष्यवाणी केली होती.  बुमराहने होल्डिंगसह सर्व टीकाकारांना उत्तर दिले आहे. एकाच वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट मॅचमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केलाय.

चांगला बॉलर हा विकेट मिळवण्यासाठी खेळपट्टीकडून मिळणाऱ्या मदतीची वाट पाहत नाही. तो बॅट्समन्सच्या भोवती जाळं विणतो, त्याला चुकण्यास प्रवृत्त करतो आणि त्याला बाद करतो. ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यात मॅलबर्न टेस्टमध्ये अशाच एका अनपेक्षित संथ चेंडूवर बुमराहने शॉन मार्शला बाद केले.

( वाचा : Big Bash League: OMG! ‘हा’ बॅट्समन आऊट होता?’ – पाहा VIDEO )

मॅलबर्नमध्ये 2018 साली झालेल्या टेस्टमध्ये पाचवी विकेट घेतल्यावर बुमराहने हलकासा हात वर केला आणि पुढे बॉलिंग सुरु केली. आयपीएलमध्ये देखील त्याच्या बॉलिंगवर कुणी खराब फिल्डिंग केली, कॅच सोडला तर तो वैतागत नाही. एखादा बॅट्समन त्याच्या जाळ्यात सापडला तरी चेकाळत नाही.

 आपल्याला आणखी पुढे खूप मजल मारायची आहे. या मोठ्या प्रवासाची आता सुरूवात झालीय हेच त्याच्या या देहबोलीतून स्पष्ट होत होते. आपलं काम चांगल्या पद्धतीने करणे आणि टीममसाठी सर्वोत्तम देणे हाच तर बुमराहचा खेळण्याचा अगदी सोपा मंत्र आहे. त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रही त्याचे पक्के आहे. ‘मंत्र सोपा, तंत्र पक्के’ असलेले हे बुमराहास्त्र टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स यांच्या यशातील महत्वाचा घटक आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: