फोटो – ट्विटर / विस्डेन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. बॉलर्सनं गाजवलेल्या या दिवसावर टीम इंडियाचं (Team India) वर्चस्व होतं. तीन फास्ट बॉलर्सनं तयार केलेल्या दबावाचा आर. अश्विननं (R. Ashwin) फायदा उचलला. सध्या टेस्टमध्येच आठवणाऱ्या अश्विननं चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. टीम इंडियाकडे दुसऱ्या दिवसअखेर 62 रन्सची महत्वपूर्ण आघाडी आहे.

फास्ट बॉलर्सचा दबदबा

भारतानं यापूर्वी ऑस्ट्रेलिया सीरिज जिंकली होती, तेंव्हा फास्ट बॉलर्सनं कमाल केली होती. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात ‘ऑल आऊट’ कसं करायचं हे आता भारतीय बॉलर्सना माहिती झालं आहे. शुक्रवारी देखील त्यांनी ती भूमिका चोख बजावली. जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि उमेश यादव (Umesh Yadav) या जोडीनं पहिला स्पेल कडक टाकाला. बुमराहनं मॅथ्यू वेड आणि जो बर्न्ससला आऊट करत स्टीव्हन स्मिथ आणि त्याचा शिष्य मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांना डिनरपूर्वीच मैदानात आणलं.

भारताकडून ख्रिसमस गिफ्ट

भारताची यावर्षी ख्रिसमसपूर्वी होणारी ही शेवटची टेस्ट आहे. त्यामुळे भारतीय फिल्डरनं लाबुशेनला ख्रिसमस गिफ्ट वाटले. त्यांनी त्याला दोनदा जीवदान दिलं. लाबुशेननं 47 रन्स काढले. त्याच्या या खेळीचं काही ऑस्ट्रेलियन अगदी तोंडभरुन वर्णन करत आहेत, पण त्याला तिथपर्यंत पोहचवण्यात दोन जीवदानांची शिडी लागली हे विसरता कामा नये.

अश्विनचा धमका

ऑस्ट्रेलियन टीमनं या टेस्टपूर्वी भारताच्या फास्ट बॉलर्सचा उत्तम सराव केला होता. डेटा विश्लेषणाच्या या युगात अश्विनच्या बाजूनं या वर्षभरात आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोणताही डेटा नव्हता. अश्विननं अ‍ॅडलेडमध्ये तो डेटा तयार केला. त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये स्टीव्हन स्मिथला फक्त 1 रनवर आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाला धाडकन बॅकफुटवर ढकललं. स्मिथचा भारताविरुद्धचा टेस्टमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे. अश्विनने स्मिथसह ऑस्ट्रेलियाची संपूर्ण मिडल ऑर्डर कापली.

( वाचा : आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर! )

पेनचा संघर्ष

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनवर या सीरिजमध्ये सर्वात जास्त दबाव आहे. तो पहिल्यांदा विकेट किपर म्हणून दुसऱ्यांदा कॅप्टन म्हणून आणि शेवटी बॅट्समन म्हणून टीममध्ये आहे, अशी टीका होते. ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 79 अशी असताना तो बॅटिंगला आला. त्यानंतर ती अवस्था 7 आऊट 111 अशी आणखी नाजूक झाली होती. त्यानंतर पेननं शेवटच्या तीन बॅट्समन्सना घेऊन 80 रन्स जोडले. विराट कोहली आऊट झाल्यानंतर भारताने शेवटच्या सहा विकेट्स या फक्त 56 रन्समध्ये गमावल्या होत्या. त्या तुलनेत पेनचा संघर्ष विशेष उठून दिसतो.

पेननं ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जास्त 73 रन्स काढले. तो अखेरपर्यंत नाबाद राहिला. पेन 73 आणि दोन जीवदानानंतर लाबूशेनच्या 47 वगळता ऑस्ट्रेलियाचा एकही बॅट्समन 15 च्या वर पोहचला नाही. भारताला पहिल्या इनिंगमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पण महत्वपूर्ण अशी 53 रन्सची आघाडी मिळाली.

( वाचा : ‘भारताविरुद्धच्या पराभवाचे आजही PAIN कायम’ ऑस्ट्रेलियन कॅप्टनची कबुली )

भारताच्या बॅटिंगमध्ये काय घडले?

भारतीय बॅट्समननं पहिल्या दिवसाच्या स्कोअरमध्ये फार रन्स काढण्याचे कष्ट घेतले नाहीत. जास्त बॉल खेळण्याचा संयमही त्यांनी दाखवला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 ओव्हर्सच्या आत 11 रन्समध्ये भारतानं 4 विकेट्स गमावल्या.

भारताची दुसरी इनिंगची सुरुवातही खराब झाली. पृथ्वी शॉ नं यंदा भोपळा टाळला. पण तो टिकून राहू शकला नाही. पहिल्या इनिंगप्रमाणेच खराब फ्रंटफुट, तसंच बॅट आणि पॅड मधील अंतर याचा त्याला फटका बसला तो फक्त 4 रन्सवर परतला. वीरेंद्र सेहवाग सारखा पृथ्वी शॉ चा वापर करण्याचे टीम मॅनेजमेंटचे डावपेच पहिल्या टेस्टमध्ये तरी फसले आहेत.

( वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: