फोटो – ट्विटर / @imRaina

इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) खराब कामगिरी इतकीच सुरेश रैनाच्या (Suresh Raina) माघारीची मोठी चर्चा झाली होती. IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॅट्समनपैकी एक असलेला रैना आयपीलसाठी युएईला गेला होता आणि अचानक मायदेशी परतला. त्याच्या माघारीबद्दल नंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. रैनानं ‘टाईम्स ऑफ इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच या माघारीचं कारण सांगितलं आहे. त्याचबरोबर मुंबईत रात्री पबमध्ये सापडल्याबद्दलचंही स्पष्टीकरण दिलं आहे.

रैना का परतला?

“मला खरोखरचं माझ्या घरी परत यायचं होतं. पंजाबमध्ये एक घटना घडली होती, ( रैनाची आत्या आणि त्यांच्या पतीचा पठाणकोटमध्ये चोरांनी खून केला होता.) आणि त्यांना माझी गरज होती. माझ्या बायकोला महामारीच्या काळात माझी गरज होती. मी 20 वर्षांपासून खेळतोय. त्यामुळे मी पुढंही खेळू शकेल हे मला माहिती आहे. पण कुटुंबीयांना गरज असते तेंव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असायला हवं.’’ असं रैनानं स्पष्ट केलं.

रैना मागच्या वर्षी पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळला नाही. त्या अनुभवाबद्दल तो म्हणाला, “ मी टीमच्या संपर्कात होतो. पण, घरी बसून मॅच पाहणं हा एक विचित्र अनुभव होता. ते माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण यामुळे मी माझ्या घरच्यांना जास्त वेळ देऊ शकलो. माझी मुलं लहान आहेत आणि माझं कुटुंब ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे.’’

( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )

विराटला पाठिंबा

सुरेश रैना आयपीएल स्पर्धेपूर्वी टीमला सोडून घरी परतल्यामुळे त्याला सोशल मीडियावर बरीच ट्रोलिंग सहन करावी लागली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कौटुंबिक कारणामुळे माघारी परतलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीलाही  (Virat Kohli) सध्या तोच अनुभव येत आहे. रैनानं या प्रकरणात विराटची बाजू घेतली आहे.

“तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. ती (अनुष्का) त्याची बायको आहे. मी माझ्या मुलीच्या जन्मावेळी देखील हेच केले होते. खेळ आज आहे, कदाचित उद्या नसेल. विराट, बायकोची काळजी घेण्याचं चांगलं काम करत आहे. सध्याच्या महामारीच्या काळात तुम्ही कुटुंबासोबत असणे आवश्यक आहे. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कसं खेळणार?  तुमच्या मनात कुटुंबाची चिंता असेल तर तुम्ही खेळू शकत नाही. त्यानं देशासाठी इतकं काही केलं आहे. त्यामुळे तो यासाठी पात्र आहे.’’ या शब्दात रैनानं विराटला पाठिंबा दिला आहे.

( वाचा : IPL 2021- CSK साठी पुढच्या वर्षीही ‘रैना है ना’! )

  ‘त्या’ रात्री पबमध्ये का होता?

मुंबईतील एका पबमध्ये COVID19 चे नियम मोडून होत असलेल्या पार्टीमध्ये काही दिवसांपूर्वी रैना सापडला होता. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. रैनानं या मुलाखतीमध्ये या विषयावरही स्पष्टीकरण दिलं आहे.

“मला मुंबईमधील नियमांची माहिती नव्हती. स्थानिक नियमांची माहिती करुन घेणे आणि सुरक्षित राहणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे,’’ अशी कबुली रैनानं दिली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: