फोटो – ट्विटर, आयसीसी

11 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तब्बल 11 वर्षांनी ऑस्ट्रेलियानं T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये (Australia in T20 World Cup 2021 Final) प्रवेश केला आहे. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात फायनल गाठण्याची ही दुसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव (Australia vs Pakistan Semi Final) करत फायनल गाठली आहे. मॅथ्यू वेडच्या नाबाद 17 बॉल 41 रनमुळे (Mathhew Wade Inning) ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी तीच चूक

पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन टीम सुपर 12 मध्ये त्यांच्या गटात टॉपवर होत्या. इंग्लंडनं फक्त 1 मॅच गमावली होती. तर पाकिस्तान एकही मॅच न हरता सेमी फायनलमध्ये दाखल झाले होते. या दोन्ही टीमच्या घवघवीत दिसणाऱ्या यशात ‘टॉस फॅक्टर’ महत्वाचा होता. पाकिस्ताननं टीम इंडिया आणि न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकला आणि मॅचही जिंकली. इंग्लंडनंही महत्त्वाच्या मॅचमध्ये टॉस जिंकत गटात अव्वल क्रमांक पटकावला.

इंग्लंडप्रमाणेच पाकिस्ताननंही सेमी फायनलमध्ये टॉस गमावला. त्यानंतर त्यांनी देखील इंग्लंड प्रमाणेच सावध बॅटींग करत सुरूवात केली. मधल्या टप्प्यात दोन्ही टीमचे रन निघाले नाहीत. शेवटच्या टप्प्यात इंग्लंडपेक्षा पाकिस्ताननं जोरात फटकेबाजी केली. इंग्लंडकडून सेमी फायनलमध्ये मोईन अलीनं (Moein Ali) T20 वर्ल्ड कपमध्ये पहिली हाफ सेंच्युरी झळकावली होती. तर पाकिस्तानकडून ते काम फखर झमाननं (Fakhar Zaman) केले. त्यामुळे पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 177  रनचं लक्ष्य ठेवले.

प्रतिस्पर्धी टीममुळे नाही फक्त 5 सेकंदांमुळे टीम इंडियाची चॅम्पियनशिप धोक्यात!

‘बेस्ट फर्स्ट ओव्हर’ आणि वॉर्नरचा प्रतिहल्ला

क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जाणे ही नवी गोष्ट नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेल्यानंतर बॅटींग करणारी टीम साहजिकच सावध खेळते. पण या मॅचमध्ये शाहिन आफ्रिदीनं (Shaeen Shah Afridi) पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतली. आणि ती विकेट आफ्रिदीनं घेतल्यानं कशी बेस्ट होती, आणि ती कशी बेस्ट ओव्हर आहे, हे सांगण्याची सोशल मीडियावर स्पर्धा सुरु झाली. एखादं काम अनेकजण सुरू करतात, पण त्याचा शेवट ते कसं करतात, यावर बरचं यश अवलंबून असतं. आफ्रिदीच्या बाबतीत हेच घडलं.

आरोन फिंच पहिल्या ओव्हरमध्ये आऊट झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियानं खांदे पाडले नाहीत. डेव्हिड वॉर्नरनं (David Warner)  मिचेल मार्शसोबत (Mitchell Marsh) पॉवर प्लेचा फायदा उचलला. मार्श 28 रन काढून आऊट झाला. त्याला शादाब खाननं (Shadab Khan) आऊट केलं. त्यानंतर शादाबच्या पुढच्या तीन ओव्हर्समध्ये स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल आऊट झाले. यापैकी वॉर्नर सेट झाला होता. 29 बॉलमध्ये 49 रनवर खेळणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच विकेट किपर मोहम्मद रिझवाननं त्याचा कॅच घेतल्याचं अपिल अंपायरनं मान्य केलं. त्या बॉलवर वॉर्नरनं रिव्ह्यू का घेतला नाही? हा प्रश्न होता.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा व्हिलन ठरणार टीमचा आधार

M फॅक्टरचा फटका

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 62 रनची आवश्यकता होती. त्यांची निम्मी टीम आऊट झाली होती. मार्कस स्टॉईनिस (Marcus Stoinis) आणि मॅथ्यू वेड (Mathhew Wade) ही त्यांची शेवटची बॅटर्सची जोडी मैदानात होती. या दोघांनीही या स्पर्धेत फारशी बॅटींग केली नव्हती. पाकिस्तानची मॅचवर घट्ट पकड आहे, असंच सर्वांना वाटत होतं.

स्टॉईनिस आणि वेड हे दोघेही ऑस्ट्रेलियाचे क्लिन हिटर (Mathhew Wade Inning) आहेत, ही गोष्ट अनेक जण विसरले होते. त्यांनी हार न मानता संघर्ष करण्यास सुरूवात केली. 16 व्या ओव्हरमध्ये एका फोरसह 12 रन आले. 17 व्या ओव्हरमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह 13 रन निघाले. बाबर आझमनं 18 वी ओव्हर या स्पर्धेत फारशा फॉर्मात नसलेल्या हसन अलीला दिली. हसनच्या ओव्हरमध्ये 15 रन निघाले. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 22 रनची आवश्यकता होती.

…आणि पाकिस्ताननं वर्ल्ड कप टाकला

सुरुवातीला शांत खेळणाऱ्या मॅथ्यू वेडनं हसन अलीच्या 18 व्या ओव्हरपासून फटकेबाजी सुरु केली होती. पाकिस्तानकडून 19 वी ओव्हर टाकण्यासाठी त्यांचा बेस्ट बॉलर आफ्रिदी आला. पहिल्या बॉलला एकही रन निघाला नाही. दुसऱ्या बॉलला स्टॉईनिसनं एक रन काढून वेडला स्ट्राईक दिली. त्यानंतर आफ्रिदीनं एक वाईड बॉल टाकला.

आफ्रिदीच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मॅचचा टर्निंग पॉईंट आला. मॅथ्यू वेडनं मारलेला बॉल (Mathhew Wade Inning) पकडण्यासाठी हसन अली वेगानं धावला, पण तो जवळपास बॉलच्याही पुढं गेला. वेडचा बॉल हसन अलीच्या बोटांना लागून खाली पडला. हसन अलीनं ती कॅच सोडली. 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये हर्षल गिब्जनं स्टीव्ह वॉचा कॅच पकडण्यात अशीच घाई करत चूक केली होती. गिब्जनं तो कॅच सोडला, आणि पुढे आफ्रिकेला वर्ल्ड कप विजेतेपदही सोडावं लागलं. हसन अलीच्या बाबतीतही तेच घडलं.

मॅथ्यू वेडनं त्यानंतर या जीवदानाचा फायदा घेत पाकिस्तानचा ‘जगात भारी’ बॉलर असलेल्या आफ्रिदीला एक नाही, दोन नाही तर सलग तीन सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाला विजय (Mathhew Wade Inning) मिळवून दिला. त्यानं शेवटच्या ओव्हरची कटकट ठेवलीच नाही.

पुन्हा M फॅक्टरनं पाकिस्तानचा घात

पाकिस्तानच्या या पराभवानं 11 वर्षांपूर्वी त्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. त्यावेळी देखील पाकिस्तानचा M फॅक्टरनं म्हणजेच M पासून नाव सुरू होणाऱ्या माईक हसीनं (Mike Hussey) एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या तोंडातील फायनलचा घास काढून घेतला होता.

2010 च्या सेमा फायनलमध्ये (T20 World Cup 2010) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 192 रनचे आव्हान दिले होते. हसी 13 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 105 अशी नाजूक होती. त्यानंतर हसीने खेळाची सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा असलेला पाकिस्तानचा लेगस्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) मॅचची शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 18 रन हवे होते. मिचेल जॉन्सनने पहिल्या बॉलवर एक रन काढून हसीला स्ट्राईक दिली. त्यानंतरच्या चार बॉलवर हसीने 6,6,4 आणि 6 अशी 3 सिक्स आणि 1 फोरचा वर्षाव करत 22 रन काढले आणि ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपची फायनल गाठून दिली. त्या मॅचमध्ये हसीने फक्त 24 बॉलमध्ये 3 फोर, 6 सिक्स आणि 250 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 60 रन काढले.

 विशेष म्हणजे मॅथ्यू वेड (Mathhew Wade Inning) हा देखील माईक हसीप्रमाणेच डावखुरा बॅटर आहे. आणि वेड देखील हसी प्रमाणे टीम अडचणीत असताना सातव्या क्रमांकावर बॅटींगला आला होता. आता T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. या लढतीत कुणीही जिंकलं तरी T20 क्रिकेटला नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची धुलाई, धोनीचा खास मित्र आणि मिस्टर क्रिकेट!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: