फोटो – ट्विटर, आयसीसी

एखाद्या देशाचे वासे फिरले की काय होतं हे अफगाणिस्ताननं यावर्षी अनुभवलं आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानातील सैन्य मागं काढून घेतलं. त्यानंतर ‘ब्रेथलेस’ गाण्यातही पॉझ असेल इतक्या वेगात गेली काही वर्ष बिळात लपून बसलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी देश ताब्यात घेतला. जीवाच्या भीतीनं लाखो अफगाणिस्तानींनी वाट्टेल त्या मार्गांनी देश सोडला. महिलांना एकट्यानं बाहेर फिरणं ही साधी गोष्ट तिथं सर्वात अवघड बनलीय. त्यामुळे महिलांनी आयसीसीनं मान्यता दिलेली क्रिकेट मॅच खेळणं ही तर आता कवी कल्पना बनलीय. या सर्व परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानची क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी (T20 WC Afghanistan Preview) दाखल झाली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा खेळ पाहणं हाच देशवासियांनी क्षणभराचा विरंगुळा असेल. पण, ही टीम विरंगुळा म्हणून नाही तर क्रिकेट विश्वातील बड्या टीमना धक्का देण्यासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. या टीममध्ये T20 क्रिकेटचा अनुभव असलेले तरुण क्रिकेटपटू असून त्यांचा दिवस असला तर ते कोणत्याही क्रिकेट टीमला हरवू शकतात. प्रॅक्टिस मॅचमध्ये वेस्ट इंडिजला (Afghanistan vs West Indies) सहज हरवत त्यांनी ते दाखवूनही दिलं आहे.

अफगाणिस्तानची सुपर पॉवर

स्पिन बॉलिंग ही अफगाणिस्तानची सुपर पॉवर आहे. राशिद खान (Rashid Khan) हा फक्त अफगाणिस्तानचा नाही तर T20 क्रिकेटचा सूपरस्टार आहे. त्याच्या लेग स्पिनमध्ये वेग आणि गुगली या दोन्हीचंही मिश्रण असून ते हमखास विकेट घेण्यासाठी पुरेसं आहे. राशिदच्या चार ओव्हर्स या प्रतिस्पर्धी टीमनं बाजूला ठेवलेल्या असतात, हे प्रत्येक T20 लीगमध्ये दिसलं आहे.

अफगाणिस्तानच्या टीममध्ये (T20 WC Afghanistan Preview) राशिद खान हा एकच धोकायदक स्पिनर नाही. मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman ) हा ऑफ स्पिनरही त्यांच्या टीममध्ये आहे. वयाच्या 20 व्या वर्षीच 150 T20 मॅचमध्ये 165 विकेट्स घेण्याचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. जगभरातील T20 लीगचा अनुभव असलेला मुजीब राशिदला पूरक भूमिका बजावू शकतो.

T20 World Cup 2021 Australia Preview: ऑस्ट्रेलियापुढे उत्तर कमी आणि प्रश्न जास्त

राशिद आणि मुजीबसोबतच शांत डोक्याचा कॅप्टन मोहम्मद नबी अफगाणिस्तानच्या स्पिन बॉलिंग आणखी टोकदार करतो. 36 वर्षांचा नबी हा अफगाणिस्तानचा आजवरचा सर्वात वृद्ध कॅप्टन आहे. त्याच्याकडं मोठा अनुभव असून तो आक्रमक बॅटरना रोखण्यासाठी पुरेसा असल्याचं त्यानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये दाखवून दिलंय.

अफगाणिस्तानची बॅटींग पॉवर

अनुभवी मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) हा या वर्ल्ड कपमध्ये देखील टीमला भक्कम सुरूवात करुन देण्यासाठी सज्ज आहे. शहजादमध्ये मोठी इनिंग खेळण्याची आणि त्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. यंदा त्याला साथ देण्यासाठी 19 वर्षांचा विकेटकिपर रहमनउल्लाह गुरबझ (Rahmanullah Gurbaz) आणि हरजतउल्लाह झझाई (Hazratullah Zazai) हे तरुण बॅटर अफगाणिस्तानकडं (T20 WC Afghanistan Preview) आहेत.

यापैकी गुरबझ हा आयर्लंड विरुद्ध ‘मॅन ऑफ द सीरिज’ होता. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये त्यानं 7 सिक्ससह 45 बॉलमध्ये 87 रन केले होते. गुरबझप्रमाणेच झझाईचा स्ट्राईक रेट देखील 140 पेक्षा जास्त आहे. हे दोघं किती आक्रमक सुरूवात करुन देतात त्यावर मिडल ऑर्डरमध्ये नजीबउल्लाह झरदान आणि मोहम्मद नबीचं काम सोपं होणार आहे.

अफगाणिस्तानकडं हसमतउल्लाह शाहिदी हा आणखी एक बॅटर आहे. वन-डे टीमचा नियमित सदस्य असलेला हसमतउल्लाह टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी झळकावणारा अफगाणिस्तानचा एकमेव क्रिकेटपटू आहे. तो T20 क्रिकेटमध्ये बराच खाली खेळतो. असं असलं तरी त्याची सरासरी 37 आहे. त्यामुळे तो मिडल ऑर्डरचा भक्कम आधार होऊ शकतो.

हशमतउल्लाह शाहिदीने इतिहास रचला, टेस्ट क्रिकेटमध्ये 200 करणारा अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटपटू

बेस्ट फिल्डर

बेस्ट लेग स्पिनर आणि लोअर डाऊनमधील हिटर असलेला राशिद खानच अफगाणिस्तानचा बेस्ट फिल्डर आहे. बाऊंड्री लाईनचं रक्षण करणे आणि वेगानं अडवलेला बॉल क्षणात अडवून परत योग्य दिशेला फेकण्याची त्याची क्षमता आहे.

X फॅक्टर

कैस अहमद (Qais Ahmad) हा आणखी एक 21 वर्षांचा स्पिनर अफगाणिस्तानकडं आहे. होबार्ट हुरिकेन्सकडून या वर्षी बिग बॅश लीग पदार्पणातच त्यानं 4 विकेट्स घेत जगाचं लक्ष वेधलं. त्यानंतर त्यानं इंग्लंडमधील T20 ब्लास्ट ही स्पर्धा देखील गाजवली. तो आजवर एकच आंतरराष्ट्रीय मॅच खेळला असून यामध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्यात. तरुण अहमदनं कॅप्टन नबीला स्पिन बॉलिंगमध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध करुन दिलाय.

अडचणीची बाजू

अफगाणिस्तानची स्पिन बॉलिंग (T20 WC Afghanistan Preview) दुसऱ्या जगातील असली तरी फास्ट बॉलिंग तशी नाही. नवीन उल हक हा एक आशादायी फास्ट बॉलर त्यांच्याकडं आहे. पण त्याला फार अनुभव नाही. त्यामुळे फास्ट बॉलर्सच्या 6 ते 8 ओव्हर्स प्रतिस्पर्धी टीम टार्गेट करु शकतात.

टॉप ऑर्डरमधील गुरबझ आणि हरजतउल्लाह यांच्या स्किलची मोठ्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच परीक्षा होणार आहे. टॉप ऑर्डर लवकर कोसळली तर असगर अफगाण आणि मोहम्मद नबीच्या खांद्यावर बॅटींगची जबाबदारी येईल. हे दोघंही एकसारख्याच पद्धतीचे बॅटर आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला 160-180 किंवा त्यापेक्षा मोठा स्कोअर करणे अवघड होऊ शकते. या परिस्थितीमध्ये स्पिन बॉलर्सवरची जबाबदारी आणि दबाव आणखी वाढणार आहे.

T20 WC New Zealand Preview: फॉर्मातील टीमला विजेतेपदाचा चान्स!

अफगाणिस्तानतील तालिबान राजवटीत महिलांना दुय्यम वागणूक मिळत असल्यानं ऑस्ट्रेलियानं त्यांच्या विरुद्ध टेस्ट खेळण्यास नकार दिलाय. तालिबानी दहशतवाद्यांची मर्जी कधी फिरेल आणि ते क्रिकेटबद्दल नवा फतवा काढतील याचा नेम नाही. त्यामुळे आगामी काळात या टीममधील सर्व खेळाडूंना एकत्र पुन्हा खेळताना कधी पाहायला मिळेल हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. श्रीलंका, बांगलादेश या सारख्या देशांना मागं टाकत अफगाणिस्ताननं या वर्ल्ड कपचं थेट तिकीट मिळवलं. आता अफगाणिस्तानच्या क्रिकेटसाठी त्यांच्या देशवासियांसाठी हे खेळाडू यत्न करतील यात शंका नाही. बड्या टीमला धक्का देण्याची क्षमता असलेली अफगाणिस्तान (T20 WC Afghanistan Preview) ही या वर्ल्ड कपमधील एक धोकादायक टीम आहे.

अफगाणिस्तानचे वेळापत्रक

दिनांकप्रतिस्पर्धी टीम
25 ऑक्टोबरस्कॉटलंड
29 ऑक्टोबर पाकिस्तान
31 ऑक्टोबर नामिबिया
3 नोव्हेंबर भारत
7 नोव्हेंबर न्यूझीलंड

अफगाणिस्तानची टीम : अहमद शहजाद, हरजउल्लाह झझाई, रहमनउल्लाह गुरबझ, नजीबउल्लाह झरदान, मोहम्मद नबी, करीम जनत, असगर अफगाण, राशिद खान, नवीव उल हक, मुजीब उर रहमान, फरीद अहमद, हमीद हसन, कैस अहमद, हसमतउल्लाह शाहिदी आणि उस्मान घानी            

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.