फोटो – ट्विटर, आयसीसी

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England vs Sri Lanka) या सलग दोन दिवस झालेल्या मॅच या T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दोन टीमची परिस्थिती सांगण्यासाठी पुरेशा आहेत. टीम इंडिया प्रमाणे इंग्लंडची टीम देखील पहिल्यांदाच बॅटींग करत होती. दोन्ही टीमची पहिल्या 10 ओव्हर्समध्ये अवस्था सारखी होती. तरीही इंग्लंडनं त्या अडचणीतून उसळी मारत मॅच जिंकली. टीम इंडियाचा पाय आणखी खोलात रूतला. विशेष म्हणजे इंग्लंडनं हे सलग दोन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला करुन दाखवलं (England Show) आहे.

दोन वर्षांपूर्वी काय झालं होतं?

इंग्लंडमध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत (Cricket World Cup 2019)  टीम इंडिया फॉर्मात होती. राऊंड रॉबिन स्पर्धेत नंबर 1 पटकावत भारतीय टीमनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. वर्ल्ड कप विजेतेपदापासून टीम फक्त 2 पावलांवर होती. त्यावेळी टीम इंडियाची गाठ न्यूझीलंडशी (India vs New Zealand Cricket World Cup 2019) पडली.

पावसामुळे ती वन-डे मॅच दोन दिवस झाली. न्यूझीलंडनं टीम इंडियासमोर विजयासाठी 240 रनचं टार्गेट ठेवलं. भारतीय टीमचा दर्जा पाहाता हे टार्गेट अशक्य मुळीच नव्हतं. पहिला तास शांत खेळून काढणे आवश्यक होते. ते जमले नाही. टीम इंडियाची अवस्था आधी 3 आऊट 5 होती. ती लवकरच 4 आऊट 24 आणि नंतर 5 आऊट 71 झाली. त्यावेळी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ही जोडी मैदानात होती.

धोनी बॅटींगला आला तेव्हा 23 ओव्हर्सचाच खेळ झाला होता. 27 ओव्हरमध्ये 169 रनचं आव्हान अवघड झालं असलं तरी ते अशक्य नव्हतं. तेव्हा धोनीसारख्या जागतिक दर्जाच्या आणि मोठ्या मॅचच्या प्रेशरचा ‘य’ अनुभव असलेल्या खेळाडूनं बॉलला एक रन काढणे आवश्यक होते. धोनीनं बॉल ब्लॉक करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या 8 ओव्हर्समध्ये फक्त 21 रन निघाले. आवश्यक रनरेट आणखी वाढला. त्या दबावात हार्दिकला रिस्क घ्यावी लागली.तो आऊट झाला.

त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) त्याच्या वन-डे कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळे मॅच जवळ आणली असं आपल्याला वाटलं. पण आपण फायनलपासून फक्त 1 विकेट दूर आहोत, हे न्यूझीलंडला माहिती होतं. जडेजा सुंदर खेळी करुन आऊट झाला. त्यानंतर धोनीही परतला आणि टीम इंडियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं.  

इंग्लंडनं तेव्हा काय केलं?

इंग्लंडची टीम 29 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2019 Final)  खेळत होती. त्यामुळे एकाही खेळाडूला वर्ल्ड कप फायनलचा अनुभव असणे शक्य नव्हते. न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत साधारणपणे भारताविरुद्ध केला होता तितकाच म्हणजे 241 चा स्कोअर केला.

242 रनचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 23 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 83 होती. त्यांनी 35 व्या ओव्हरमध्ये 150 रन पूर्ण केले. बेन स्टॉक्स (Ben Stokes) आणि जोस बटलर (Jos Buttler) या जोडीवर घरच्या प्रेक्षकांसमोर मॅच जिंकण्याचा दबाव होता. या दबावात त्यांनी धोनीसारखे बॉल अडवले नाहीत. त्यांनी मोठी रिस्क घेतली नाही. त्यांनी बॉलला रन काढले. 45 व्या ओव्हरमध्ये ही जोडी फुटली. बटलर आऊट झाला. त्यावेळी इंग्लंडचे 196 रन होते. त्यानंतर आणखी सात रनची भर पडल्यानंतर ख्रिस वोक्स आऊट झाला. वर्ल्ड कप फायनल न्यूझीलंडच्या बाजूनं झुकली होती. पण बेन स्टोक्सनं जिद्द सोडली नाही. त्यानं आधी मॅच टाय केली. सुपर ओव्हरमध्येही टाय केली आणि नंतर नियमांच्या आधारावर वर्ल्ड कप जिंकला. मोठ्या मॅचमध्ये सकारात्मक बॅटींग कशी करायची याचं ते उदाहरण (England Show) होतं.

जिद्द, संघर्ष, गुणवत्तेची कमाल, वर्ल्ड कप व्हिलन बनला देशाचा हिरो!

यंदा काय झालं?

दोन वर्षांनी T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पुन्हा एकदा न्यूझीलंड (India vs New Zealand 2021 T20 World Cup) विरुद्ध मॅच होती. या मॅचमध्ये सुरुवातीच्या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे जगातील अव्वल बॅटर ब्लॉक झाले. ते मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाले.

ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक बॅटींगचा मोठा गवगवा आहे. आयपीएल स्पर्धांमुळे त्यांना मोठं ग्लॅमर होतं. त्यांनाही मोठे फटके मारता आले नाहीत. जडेजानं कसंबसं 110 पर्यंत पोहचवलं. त्यानंतर न्यूझीलंडनं 111 चं टार्गेट आरामात पूर्ण केलं.

T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम

इंग्लंडने पुन्हा काय केलं?

टीम इंडियाप्रमाणेच इंग्लंडचीही श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा बॅटींग होती. या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीमला पहिल्यांदा बॅटींग करताना झगडावं लागतंय. इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. पहिल्या आठ ओव्हरनंतर इंग्लंडनं टीम इंडिया इतकेच म्हणजेच 3 आऊट 41 रन केले होते. त्यानंतर निर्धारित ओव्हर्समध्ये टीम इंडिया 7 आऊट 110 रनच करु शकली. इंग्लंडनं 4 आऊट 163 रन केले.

जोस बटलरनं सुरुवीतीला अगदी बॉलला रन या सूत्रानं खेळ केला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये रौद्र रूप धारण करत 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन काढले. अजिबात फॉर्मात नसलेल्या इयन मॉर्गननं (Eoin Morgan) त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडनं श्रीलंकेचा पराभव केला आणि सलग 4 विजयासह सेमी फायनल (England Show) गाठली.

इंग्लंड क्रिकेटला नव्या युगात नेणारा मिस्टर 360!

वर्ल्ड कप फायनलमध्ये जे स्टोक्स-बटलर जोडीनं केले. ते धोनीला जमले नाही. त्यामुळे हार्दिक आणि जडेजावर प्रेशर आले. टीम इंडियाचा पराभव झाला. यंदाही आठ ओव्हरनंतर  बटलर-मॉर्गन जोडीनं केलं ते आठ ओव्हरनंतर टीम इंडियाकडून खेळणाऱ्या विराट-पंत जोडीला जमलं नाही. त्यानंतरच्याही जोडीला करता आले नाही. टीम इंडियाच्या सलग दोन आयसीसी स्पर्धांमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर लगेच झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं त्याच परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर कसं बाहेर पडायचं हे टीम इंडियाला दाखवून दिलं आहे. टीम इंडिया किमान पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तरी यामधून बोध घेणार का? हा खरा प्रश्न (England Show) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: