फोटो – सोशल मीडिया

T20 हा वेस्ट इंडिज टीमच्या नैसर्गिक शैलीला साजेशा क्रिकेटचा प्रकार आहे. ही टीम कधी फॉर्मात येऊन समोरच्या टीमचा फडशा पाडेल किंवा त्यांच्यासमोर लोटांगण घालेल याचा काही नियम नाही. या टीममध्ये अनेक सुपरस्टार आहेत, पॉवर हिटर आहेत, T20 क्रिकेटचे सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. गतविजेती आणि दोनदा हा वर्ल्ड कप जिंकणारी एकमेव टीम असलेली वेस्ट इंडिज (T20WC West Indies Preview) यंदाही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

वेस्ट इंडिजची बॅटींग पॉवर

वेस्ट इंडिजच्या बॅटींग ऑर्डरमधील प्रत्येक खेळाडू हा एकहाती मॅच जिंकून देऊ शकतो. T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 22 सेंच्युरी आणि 1000 पेक्षा जास्त सिक्स मारणारा युनिवर्स बॉस ख्रिस गेल (Universe Boss Chris Gayle) या टीममध्ये आहे. एव्हिन लुईस (Evin Lewis) हा वेस्ट इंडिजचा दुसरा ओपनरही सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी झळकावणाऱ्या 3 बॅटरपैकी तो आहे. त्याचा स्ट्राईक रेट 158.03 असून हा वेस्ट इंडिजच्या अन्य कोणत्याही बॅटरपेक्षा जास्त आहे. तर सरासरी देखील 30 पेक्षा जास्त आहे. या वर्षात सर्वात जास्त रन करणाऱ्या या वेस्ट इंडिजच्या प्लेयरपासून प्रतिस्पर्धी टीमना सांभाळून राहावं लागणार आहे.

वेस्ट इंडिजच्या मागील 2 वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये जी भूमिका मार्लस सॅम्युल्सनं बजावली होती ती भूमिका यंदा शिमरन हेटमायरला (Shimron Hetmyer) करायची आहे. आयपीएल स्पर्धेत उत्तम स्ट्राईक रेटनं हेटमायरचं स्पिन बॉलिंग खेळण्याचं त्याचं तंत्र चांगंलंय. यूएईच्या पिचवर खेळण्याचा अनुभव आणि फॉर्म दोन्ही गोष्टी सोबत असलेला हेटमायर वेस्ट इंडिजसाठी निर्णायक ठरु शकतो.

वेस्ट इंडिजकडं कदाचित T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर असलेले कायरन पोलार्ड (Kieron Pollarad) आणि आंद्रे रसेल (Andre Russsell) (T20WC West Indies Preview) आहेत. यापैकी कोणताही एक जण मैदानात असेल तर कितीही मोठं टार्गेट सेफ नसतं. वेस्ट इंडिजकडं तर दोघंही आहेत. फिनिशर्समधली इतकी श्रीमंती कोणत्याही देशाकडं नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज बॅटींग करत असताना शेवटचा बॉल पडेपर्यंत प्रतिस्पर्धी टीमला मैदानात कोणतीही ढिलाई परवडणारी नाही.

वेस्ट इंडिजची बॉलिंग पॉवर

अनुभवी रवी रामपॉलला (Ravi Rampul) त्याच्या सीपीएलच्या फॉर्मच्या जोरावर सहा वर्षांच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा जुगार वेस्ट इंडिजनं केलाय. रामपॉलसाठी त्यांनी जेसन होल्डरला पहिल्या 15 मध्ये स्थान दिलेलं नाही. हा खूप मोठा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी रामपॉलवर असेल. ओशने थॉमस हा चांगली स्पीड असलेला बॉलर वेस्ट इंडिजकडं आहे. पण त्याचा फिटनेस त्याला कधी दगा देऊ शकतो. त्याशिवाय गेल्या वर्षभरात डावखुरा फास्ट बॉलर ओबेड मकॉय हा देखील गेल्या वर्षभरात वेस्ट इंडिज टीममध्ये स्थिरावलेला बॉलर त्यांच्याकडं आहे.

वेस्ट इंडिजच्या डेथ बॉलिंगची जबाबदारी अनुभवी ड्वेन ब्राव्होवर (Dwayne Bravo) आहे. अनेक अनुभवी खेळाडूंना त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना अपयश येत असताना ब्रोव्हो डेथ बॉलिंगमध्ये आजही बिनतोड आहे. त्याच्या स्लोअर बॉलवर फारसे रन निघत नाहीत. शेवटच्या टप्प्यात त्याला फटकेबाजी करणे कोणत्याही बॅटरसाठी अवघड आहे. आजवरचे सर्व T20 वर्ल्ड कप खेळलेल्या ब्राव्होचा हा शेवटचा T20 वर्ल्ड कप आहे. त्यात टीमला तिसरं विजेतेपद (T20WC West Indies Preview) जिंकून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

T20 World Cup 2021 Australia Preview: ऑस्ट्रेलियापुढे उत्तर कमी आणि प्रश्न जास्त

आंद्रे रसेल (संपूर्ण फिट असेल) आणि कायरन पोलार्ड या दोन बॉलर्सना कोणतीही प्रतिस्पर्धी टीम हलकी लेखणार नाही. रसेल डेथ ओव्हर्समध्ये ब्राव्होला मदत करु शकतो. तर जमलेली जोडी फोडण्याचं कसब अनुभवी पोलार्डकडं आहे.  

बेस्ट फिल्डर

फॅबियन एलन दुखापतीमुळे आऊट झाल्यानं आता कॅप्टन कायरन पोलार्डच वेस्ट इंडिजचा बेस्ट फिल्डर आहे. त्याच्या फिल्डिंगचं कौशल्य सर्वांनीच आयपीएस स्पर्धेत वारंवार पाहिलंय.

X फॅक्टर

वेस्ट इंडिजला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्याची भिस्त ही कॅप्टन पोलार्डवर आहे. हुशार, कल्पक आणि उत्तम मॅन मॅनेजर असलेला पोलार्ड सहकाऱ्यांना सर्वोत्तम खेळ करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठीही प्रसिद्ध आहे. शेवटच्या ओव्हर्समधील हाणामारी, कॅप्टन म्हणून बॉलिंगमधील बदल, गरज पडली तर जमलेली जोडी फोडण्यासाठी पुढे येणं आणि मैदानातील कोणत्याही बाजूला उभा राहून आलेला कसलाही कॅच घेणं या सर्व गोष्टी पोलार्ड सातत्यानं करतो. त्यामुळेच त्याला T20 क्रिकेटमध्ये मोठी मोठी मागणी असते. पोलार्डचं यंदा सीपीएल आणि आयपीएल विजेतेपद हुकलंय. तो ही सर्व कसर पाच वर्षांनी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20WC West Indies Preview) भरुन काढू शकतो.

T20 World Cup South Africa Preview: ‘अंडर रडार’ दक्षिण आफ्रिका किती मोठा धमाका करणार?

अडचणीच्या बाजू

ख्रिस गेलचा फॉर्म. गेल 2016 च्या वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिजसाठी फक्त 8 आंतरराष्ट्रीय T20 खेळला आहे. तसंच त्यानं या प्रकारात वेस्ट इंडिजकडून पाच वर्षांपूर्वी शेवटची हाफ सेंच्युरी झळकावलीय. 42 वर्षांचा गेल हा या वर्ल्ड कपमधील सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहे. त्याची पुढचा T20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा असली तरी वय आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी गेलच्या हातातून निसटत आहेत.

निकोलस पूरनचा फॉर्म आणि आंद्रे रसेलचा फिटनेस ही देखील वेस्ट इंडिजची काळजीची गोष्ट आहे. वेस्ट इंडिजचा व्हाईस कॅप्टन असलेल्या पूरननं सीपीएलमध्ये चांगला खेळ केला होता. पण आयपीएलमध्ये तो साफ अपयशी ठरला. तो हेटमायर प्रमाणेच स्पिन बॉलिंग चांगलं खेळू शकणारा प्लेयर आहे. मिडल ओव्हर्समध्ये पूरन क्लिक होणं वेस्ट इंडिजसाठी खूप आवश्यक आहे. तसं झालं नाही तर टीमचं नियोजन बिघडू शकतं.

T20 WC New Zealand Preview: फॉर्मातील टीमला विजेतेपदाचा चान्स!

आंद्रे रसेल टीममध्ये असेल तर वेस्ट इंडिजला बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीमध्येही एक अतिरिक्त ऑप्शन मिळतो. पण तो फिटनेसमुळे शेवटच्या काही आयपीएल मॅच खेळला नाही. त्याचा फिटनेस हे एक खूप मोठं कोडं आहे. तो कधीही फिल्डिंग करताना अनफिट होऊन बाहेर जाऊ शकतो. फॅबियन एलन दुखापतीमुळे बाहेर पडल्यानं वेस्ट इंडिजची लोअर ऑर्डर रसेलवर जास्तच अवलंबून आहे.

वेस्ट इंडिजच्या बॉलिंग अटॅकमधील ब्राव्हो सोडता एकही नाव विश्वासर्ह नाही. त्या सर्वांच्या बॉलिंगवर भरपूर रन निघू शकतात. रसेल फिटनेसमुळे प्रत्येक मॅचमध्ये चार ओव्हर टाकेल याची खात्री नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या बॅटरला प्रत्येक मॅचमध्ये 20 ते 30 रन अतिरिक्त करावे लागतील. मोठ्या मॅचमध्ये या अतिरिक्त प्रेशरमध्ये वेस्ट इंडिजची बॅटींग ऑर्डर कोसळली तर वेस्ट इंडिजचं तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं (T20WC West Indies Preview) स्वप्न भंग पावू शकते.

वेस्ट इंडिजचे वेळापत्रक

दिनांकप्रतिस्पर्धी टीम
23 ऑक्टोबरइंग्लंड
26 ऑक्टोबरदक्षिण आफ्रिका
29 ऑक्टोबरबांगलादेश
4 नोव्हेंबरश्रीलंका
6 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया

वेस्ट इंडिजची टीम:  एव्हिन लूईस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड,  शिमरन हेटमायर, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, रवी रामपॉल, ओबेड मकाय, हेडन वॉल्श ज्यूनिअर, लेंडल सिमन्स, अकील हुसेन आणि ओशने थॉमस

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: