फोटो – सोशल मीडिया

दक्षिण आफ्रिकेची टीम (South Africa Cricket Team) गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच बदलातून जात आहे. टीम निवडीतील कोटा पद्धती, प्रमुख खेळाडूंची निवृत्ती त्याचबरोबर बोर्डाचा कारभार यामुळे आफ्रिका क्रिकेट संकटात सापडलं आहे. आफ्रिका क्रिकेटला या संकटातून मात करण्याचा मार्ग दिसू लागला आहे. भारताविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिज (India vs South Africa Test Series) जिंकून आफ्रिकन टीमनं आशा जागवली आहे. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) एका तरूण खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) प्रमाणे खेळणारा हा खेळाडू बेबी एबी (Baby AB) म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

भारताविरुद्ध धमाका

दक्षिण आफ्रिकेची वर्ल्ड कपमधील पहिली मॅच भारताविरुद्ध (India U19 vs South Africa U19)  होती. या मॅचमध्ये आफ्रिकेचा 45 रनने पराभव झाला. टीम इंडियाने दिलेल्या 233 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना आफ्रिकेची टीम 187 रनवरच ऑल आऊट झाली.

आफ्रिकेच्या इनिंगमध्ये डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने 6 फोर आणि 2 सिक्ससह सर्वाधिक 65 रन केले. ब्रेविसचा स्ट्रेट ड्राईव्ह, रिव्हर्स स्वीप हे आणि अन्य शॉट्स हे डीव्हिलियर्ससारखेच आहेत. त्याचबरोबर त्याच्या जर्सीचा नंबर देखील डीव्हिलियर्सप्रमाणे 17 आहे. ब्रेविसनं या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी बेबी एबी (Baby AB) असे पोस्टर झळकावत त्याचे अभिनंदन केले.

कोण आहे बेबी एबी?

ब्रेविस हा दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 वर्ल्ड कपमधील टॉप ऑर्डर बॅटर आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या T20 स्पर्धेत या 18 वर्षांच्या खेळाडूने 25 बॉलमध्ये 46 रनची खेळी केल्याने तो फोकसमध्ये आला. या खेळीनंतर आफ्रिकन क्रिकेटमधील भावी सुपरस्टार अशी त्याची ओळख बनली आहे.

फक्त 44 बॉलमध्ये 149 रन! डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन?

ब्रेविस हा डीव्हिलियर्सचा मोठा फॅन आहे. विशेष म्हणजे तो डीव्हिलियर्सच्या शाळेचाच विद्यार्थी आहे. त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात डीव्हिलियर्स आला होता तेव्हा त्याला भेटण्याची आणि त्याच्याकडून क्रिकेटमधील काही अविस्मरणीय गोष्टी ऐकण्याची संधी त्याने सोडली नाही. लॉक डाऊनच्या काळात तो डीव्हलियर्सच्या नियमित संपर्कात होता. आपल्या क्रिकेट बद्दलच्या सर्व शंकांना त्याने सविस्तर उत्तर दिल्याचे ब्रेविसने ‘इएसपीएन क्रिकइन्फोला’ सांगितले आहे.

IPL खेळण्याची इच्छा

ब्रेविस लेग स्पिनर देखील आहे. आफ्रिकेचा ऑल राऊंडर होण्याची त्याची इच्छा आहे. त्याचबरोबर त्या T20 लीगमध्ये विशेषत: इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. आयपीएलमध्ये खेळणे हे आपलं स्वप्न असल्याची भावना त्याने (Baby AB) बोलून दाखवली आहे.

भारताविरुद्धच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला असला तरी ब्रेविसनं त्यात दमदार खेळ केला होता. आफ्रिकेच्या युगांडा आणि आयर्लंड विरुद्धच्या मॅच आणखी बाकी आहेत. या मॅच जिंकून आफ्रिकेला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

आफ्रिकेची या स्पर्धेतील कामगिरी ही ब्रेविसच्या बॅटींगवर अवलंबून आहे. त्याची बॅटींग जितकी चालेल तितका आफ्रिकेला या स्पर्धेत आणि ब्रेविसला भविष्यात फायदा होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये बारीक लक्ष ठेवून असणाऱ्या आयपीएल टीम त्याला (Baby AB) करारबद्धही करू शकतात.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: