फोटो – ट्विटर/BCCI

घरामध्ये वास्तूप्रवेश करताना पेलाभर दूध/पाणी/धान्य सांडले जाते त्याच पद्धतीनं टीम इंडियाला (Team India) एखादी सीरिज सुरु होताना पहिली मॅच सांडण्याची सॉरी हरण्याची सवय लागली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज, भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज आणि सध्या सुरु असलेली टी-20 सीरिज या तिन्ही ठिकाणी भारतीय टीमने पहिली मॅच गमावल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्या पराभवाचा हिशेब चुकता केला आहे. पहिली मॅच खेळणारा इशान किशन (Ishan Kishan) आणि कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या दोघांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर (Kishan Kohli Show) भारताने दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

‘हे आपण पूर्वी पाहिले आहे’

झारखंडचा विकेट किपर बॅट्समन टॉप ऑर्डरला खेळायला येतो आणि आक्रमक खेळून मॅच जिंकून देतो. हे आपण पूर्वी पाहिले आहे. इशान किशनने ते पुन्हा एकदा दाखवले. आयपीएल स्पर्धेतील (IPL 2020) त्याचा फॉर्म त्याने कायम ठेवला. पहिली मॅच, रनचा पाठलाग, समोर नंबर 1 टीम, जोडीदार शून्यावर आऊट या कशाचाही परिणाम त्याने स्वत:वर होऊ दिला नाही.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच बॉलवर जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) फोर मारुन खाते उघडले. त्यानंतर तो थांबला नाही. आयपीएल स्पर्धेत मुक्तपणे फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देण्याचं धोरण टीम इंडियाने अखेर सुरु केलं आहे. त्याचा फायदा या मॅचमध्ये झाला.

इशान किशनने सेट व्हायला आणि फटकेबाजी करायला वेळ घेतला नाही. त्याने सुरुवातीलाच इनिंगचा टेम्पो सेट केला. इशान किशनने फक्त 28 बॉलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पहिल्या T20 मॅच हाफ सेंच्युरी करणारा तो अजिंक्य रहाणेनंतरचा दुसरा भारतीय आहे. इशानने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 94 रनची पार्टरनशिप (Kishan Kohli Show) केली. किशन आऊट झाला तेंव्हा मॅच भारताच्या आवाक्यात आली होती.

( वाचा : ON THIS DAY : द्रविड-लक्ष्मण दिवस भर खेळले आणि ऑस्ट्रेलियाची XX XXली )

कोहलीची क्लास!

विराट कोहलीवर या मॅचमध्ये मोठं प्रेशर होतं. त्याला इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज फार चांगली गेली नव्हती. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पहिल्यांदाच सलग दोनदा शून्यावर आऊट होऊन तो हॅट्ट्रिक चुकवण्यासाठी मैदानावर उतरला त्यावेळी भारताचं खात उघडण्यापूर्वीच एक विकेट गेली होती.

कोहलीनं पहिला रन अत्यंत तडफेनं पूर्ण केला. त्यानंतर त्याने त्याच्या नेहमीच्या मेथडने इनिंग बांधली. आधी इशान किशन आणि नंतर ऋषभ पंत या दोघांनाही त्याने मुक्तपणे फटकेबाजी करु दिली. त्यानंतर त्याने मॅचच्या शेवटी जे दोन फटके मारले ते त्याच्या मोठेपणाची, सुपर क्लासची साक्ष देणारे होते. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3 हजार रनचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.

इंग्लंडच्या इनिंगमध्ये काय झाले?

यापूर्वी टॉस हरल्याने पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. जोस बटलरला (Jost Buttler) भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) शून्यावर आऊट केले. जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांनी इनिंग सावरली पण मोठा स्कोअर करण्यात दोघांनाही अपयश आले.

( वाचा : भुवनेश्वर कुमार, स्विंगच्या राजाला दुखापतींचा शह! )

भारतीय बॉलर्सनी शेवटच्या पाच ओव्हरमध्ये चांगला मारा करत 35 रन दिले. शार्दूल ठाकूरची (Shardul Thakur) शेवटची ओव्हर खास ठरली. त्यामध्ये त्याने 6 रन देत बेन स्टोक्सची विकेट मिळवली. मागील आयपीएलपासून शार्दूलचा खेळ कमालीचा सुधारला आहे. याचा प्रत्यय वारंवार येत आहे.

इंग्लंडनं विजयासाठी दिलेलं 165 रनचं आव्हान पुरेसं नव्हतं. किशन – कोहलीच्या हाफ सेंच्युरीने (Kishan Kohli Show) ते तोकडं ठरलं.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: