फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी T20 मॅच (India vs England T20I) ही विराट कोहली (Virat Kohli) आणि जोस बटलर (Jos Buttler) या दोन सहज फटकेबाज बॅट्समनची लढाई होती. या मॅचमध्ये या दोघांनी मिळून 98 बॉलमध्ये नाबाद 160 रन काढले. तर दोन्ही टीममधील उर्वरित 9 जणांनी मिळून 132 बॉलमध्ये 137 रन काढले. शेवटी विराटच्या नाबाद 77 रनवर बटलरचे नाबाद 83 रन भारी पडले. इंग्लंडने तिसरी T20 आठ विकेट्सनं जिंकली आणि या सीरजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. त्याचबरोबर बटलरनं भारताविरुद्ध एक रेकॉर्डही (Buttler Record) केला आहे.

‘पॉवर प्ले’ मध्ये मॅच ठरली

T20 क्रिकेटमध्ये अनेकदा निर्धारित ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरही मॅचचा निकाल लागत नाही. इथे ‘पॉवर प्ले’मध्येच मॅच निश्चित झाली होती. भारताने पहिल्या 6 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये राहुल, रोहित आणि इशान या तीन टॉप बॅट्समनच्या बदल्यात 24 रन केले. तर इंग्लंडनं जेसन रॉयच्या बदल्यात 54 रन केले होते.

इंग्लंडच्या या कामगिरीचं श्रेय जोस बटलरला आहे. पहिल्या 3 ओव्हरनंतर तो 6 बॉलमध्ये 7 रन काढून खेळत होता. सहाव्या ओव्हरनंतर ‘पॉवर प्ले’ संपला तेंव्हा थेट 17 बॉलमध्ये नाबाद 43 वर पोहचला होता. या मॅचमध्ये 18 व्या ओव्हरपर्यंत खेळून शेवटपर्यंत नाबाद राहणाऱ्या बटलरनं त्याचे निम्मे रन हे पॉवर प्ले मध्येच काढले होते.

( वाचा : IND vs ENG : विराटची डोकेदुखी वाढली, घ्यावा लागणार कठोर निर्णय )

बटलरला बेअरस्टोची साथ

विराट कोहलीचा बराच काळ पॉवर प्लेमध्ये तीन विकेट पडल्यानं इनिंग सावरण्यात गेला. त्यातच विराटच्या कॉलमुळे ऋषभ पंत (Rishabh Pant) रन आऊट झाल्यानं भारताची इनिंग आणखी गडबडली.

बटलर त्या बाबतीत सुदैवी ठरला. डेव्हिड मलान आऊट झाल्यानंतर त्याला जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) हा खंबीर साथीदार मिळाला. त्याने बटलरसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 77 रनची पार्टरनरशिप केली. त्यात बेअरस्टोचा वाटा हा 40 रनचा होता. बेअरस्टोनं काही खणखणीत फोर लगावत रनरेट कधीही वाढू दिला नाही.

विराट कोहली शो

विराट कोहली रंगात असतो त्यावेळी त्याच्या बॅटींगचा मैदानात घुमणारा नाद हा एखाद्या संगीतासारखाच असतो. विराट पहिल्या 29 बॉलमध्ये 28 रन इतका संथ खेळत होता. त्यानंतरच्या 17 बॉलमध्ये त्याने 49 रन काढले. त्यामुळे त्याची ही संथ खेळी आता कुणालाही लक्षात राहणार नाही. यामध्ये त्याने 8 फोर आणि 4 सिक्स मारले. भारताच्या 3 बॅट्समना आऊट करणाऱ्या आणि 148 किमी प्रती तास वेगाने बॉलिंग करणाऱ्या मार्क वुड (Mark Wood) याला विराटने 69 मीटर लांब मारलेला सिक्स ‘किंग कोहली’ परत आलाय हे सांगायला पुरेसा होता.

विराटने हार्दिक पांड्यासोबत सहाव्या विकेटसाठी 70 रनची पार्टरनरशिप केली. यामध्ये हार्दिक सारख्या आक्रमक हिटरचा वाटा हा 17 रनचा होता.

( वाचा : IND vs ENG: किशनची कमाल, कोहलीचा हल्ला! भारताने घेतला इंग्लंडचा बदला )

बटलरचा रेकॉर्ड

जोस बटलरने नाबाद 83 रन काढत इंग्लंडला मॅच जिंकून दिलीच. त्याचबरोबर एक रेकॉर्ड देखील केला. एका आंतरराष्ट्रीय T20 मॅचमध्ये भारताविरुद्ध सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड बटलरनं (Buttler Record)  केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड इऑन मॉर्गनच्या नावावर (71 रन) होता. बटलरचा हा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील देखील सर्वोच्च स्कोअऱ आहे. यापूर्वी त्याचा 77 हा सर्वोच्च स्कोअर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या वर्षी त्याने 77 रन केले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: