
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पिंक बॉल (Pink Ball) टेस्टला मोठ्या थाटात सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या डिनर ब्रेकपूर्वीच इंग्लंडची संपूर्ण टीम 112 रनवर ऑल आऊट झाली. स्थानिक खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) हा या दिवसाचा हिरो ठरला. अक्षर पटेलनं 38 रन देऊन सहा विकेट्स घेतल्या. दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या ‘अक्षर’ची स्पिन बॉलिंग वाचताना (Axar Attack) इंग्लंडचे बॅट्समन अक्षरश: ‘निरक्षर’ वाटले.
टॉस जिंकला, पिटरसन हसला!
भारतीय पिचवर टॉसचं मोठं महत्त्व आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं टॉस जिंकला आणि अपेक्षेप्रमाणे बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ही सीरिज सुरु झाल्यापासून टीम इंडियाला उद्देशून हिंदीत ट्विट करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पिटरसन (Kevin Pietersen) यामुळे चांगलचा खूश झाला होता. त्यानं एक ट्विट करत भारतीय फॅन्सना चिडवण्याचा प्रयत्न केला.
क्षणभंगुर आनंद
पिटरसन आणि समस्त इंग्लंडला टॉस जिंकण्याचा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. शंभरावी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्मानं (Ishant Sharma) डॉम सिबलेला आऊट करत इंग्लंडला पुढं काय वाढून ठेवलं आहे याचा इशारा दिला.
विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिला बदल करताना स्थानिक हिरो अक्षर पटेलच्या हातात बॉल दिला. अक्षरनं पहिल्याच बॉलवर या सीरिजमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोला आऊट केलं. अक्षरची ती विकेट (Axar Attack) पाहून भारतानं तीन स्पिनर का खेळवले याचा अंदाज मैदानात येताना जो रुटला आला असावा
अहमदाबादच्या फिरत्या पिचवर झॅक क्राऊली (Zak Crawley) सहजपणे खेळत होता. त्यानं जो रुटच्या मदतीनं भारतीय बॉलर्सचं आक्रमण थोपवलं. क्राऊलीनं त्याची हाफ सेंच्युरी 68 बॉलमध्ये पूर्ण केली.स्पिन पिचवर कसं खेळायचं हे क्राऊली त्याच्या सहकाऱ्यांना दाखवत होते. दोन धक्क्यातून इंग्लंड बाहेर पडतय असं वाटत असतानाच आर. अश्विननं (R. Ashwin) जो रुटला आऊट केलं.
जो रुट आऊट झाल्यानंतर लगेच चांगलं खेळत असलेला क्राऊली देखील परतला. ओली पोपला अश्विननं ज्या पद्धतीनं आऊट केलं ते पाहून इंग्लंडचा हा ‘पोप’ या सीरिजमध्ये त्याच्यासमोर अश्विन बॉलिंगला आल्यावर ‘प्रार्थना’च करणार आहे.
( वाचा : IND vs ENG : वेलकम टू इंडिया (फायनली) इंग्लंड! )
बेन स्टोक्सनं मोठं काम केलं!
इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं एक मोठं काम केलं. तो या इनिंगमध्ये अश्विनला आऊट झाला नाही. त्याला अक्षर पटेलनं आऊट केलं. स्टोक्स परतल्यानंतर इंग्लंडच्या 200 चा टप्पा ओलांडण्याच्या आशा अंधूक झाल्या होत्या. त्या कधीही ठळक होणार नाहीत याची काळजी भारतीय स्पिनर्सनं घेतली. इंग्लंडला 112 रनवरच गुंडाळलं.
टेस्ट करियरमधील दुसरीच टेस्ट खेळणारा अक्षर पटेल हा या इनिंगमधील भारताचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं सहा विकेट्स (Axar Attack) घेतल्या. दोन टेस्टमधील तीन पैकी दोन इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी अक्षरनं दोनदा केली आहे. त्याचबरोबर त्याला आर. अश्विननं तीन विकेट्स घेऊन चांगली साथ दिली. इशांत शर्मानं एक विकेट घेतली.
( वाचा : वाढदिवस विशेष : अक्षर पटेल, हिंमतवाला बॉलर ! )
अक्षर पटेलनं 6 विकेट्स तर घेतल्याच. त्याचबरोबर इंग्लंडच्या 48.4 ओव्हर्सच्या इनिंगपैकी 21.4 ओव्हर त्यानं एकट्यानंच टाकल्या. एका बाजूनं सलग बॉलिंग करण्याची क्षमता असल्याचं त्यानं दाखवून दिलं. अक्षरनं हा भार पेलल्यानं विराट कोहलीला टीममधला तिसरा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरच्या हातात बॉल देण्याची गरज भासली नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.