
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या अनुभवी जलाज सक्सेनानं (Jalaj Saxena) केलेलं एक ट्विट इंग्लंडचा चौथ्या टेस्टमधील पहिल्या दिवसाचा खेळ सांगण्यासाठी पुरेसं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) झालेली तिसरी टेस्ट दोन दिवसांमध्ये संपल्याच्या धक्क्यातून इंग्लंडची टीम बाहेर पडलीच नाही. इंग्लंड बॅट्समनला भारताच्या दौऱ्यावर नेहमी त्रास देणाऱ्या स्पिन फोबियानं (Spin Phobia) चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी चांगलंच डोकं वर काढलं.
अहमदाबादचं पिच हे बॅटींगसाठी चांगलं होतं असं फक्त जलाज सक्सेना किंवा ‘Cricket मराठी’ म्हणत नाही. तर, इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन ( Michael Vaughan) यानं देखील याच आशयाचं ट्विट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्पिन पिच बनवण्यावर भारताला नावं ठेवणाऱ्या वॉननं देखील हे पिच बॅटींगला उपयुक्त असल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे.
अक्षर पटेलचा धक्का
या सीरिजमधील दोन टेस्टमध्येच 18 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलच्या (Axar Patel) हातामध्ये विराट कोहलीनं पहिल्यांदा बॉल दिला आणि इंग्लंडचा स्पिन फोबिया (Spin Phobia) सुरु झाला. डॉम सिबले याला अक्षरनं पहिल्या ओव्हरमध्येच आऊट केलं. अहमदाबादच्या मैदानात सलग तीन टेस्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेत अक्षरनं एक अनोखी हॅट्ट्रिक पूर्ण केली. सिबलेचा दुसरा साथीदार झॅक क्राऊलीनं अक्षरची स्पिन आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) याची स्टंपमगील बडबड यामुळे वैतागून एक खराब शॉट खेळाला आणि फसला.
सिराजनं दिले धक्के
जसप्रीत बुमराहनं (Jaspreet Bumrah) वैयक्तिक कारणामुळे चौथ्या टेस्टमधून माघार घेतली. त्यामुळे मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. सिराजनं जो रुट (Joe Root) याला फक्त 5 रनवर आऊट करत इंग्लंडला मोठ्या अडचणीत आणलं. त्यापाठोपाठ लंचनंतर जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याला आऊट करत इंग्लंडच्या पार्टरनरशिपला ब्रेक घातला. बेयरस्टोनं बेन स्टोक्स (Ben Stokes) सोबत चौथ्या विकेटसाठी 48 रनची पार्टरनरशिप केली. चेन्नईतील पहिल्या टेस्टमध्ये 578 रन केल्यानंतर एकदाही इंग्लंडच्या बॅट्समन्सना 50 रनची पार्टरनरशिप करता आलेली नाही.
( वाचा :IND vs ENG : इंग्लंडमध्येही दोन दिवसांत टेस्ट संपल्या आहेत, जोफ्रा आर्चरचा घरचा आहेर )
स्टोक्सचा संघर्ष
मागील दोन टेस्टमध्ये अश्विनच्या (Ravichandran Ashwin) बॉलिंगवर सातत्यानं फसत असलेल्या बेन स्टोक्सनं या टेस्टमध्ये एकाकी संघर्ष केला. स्टोक्स येताच विराटनं अश्विनला बॉलिंगला आणलं. अश्विनच्या आठ ओव्हरच्या स्पेलमधील 48 पैकी 41 बॉल स्टोक्सनं खेळले. त्यापैकी 38 बॉलमध्ये या आक्रमक बॅट्समननं एकही रन काढला नाही.
स्टोक्सनं अश्विननं बांधून ठेवल्याचा राग कदाचित मोहम्मद सिराजवर काढला असावा. सिराजनं एक बाऊन्सर टाकल्यानं स्टोक्सनं सिराजला उद्देशून शेरेबाजी केली. त्यामुळे सिराजच्या मदतीला विराट कोहलीला यावं लागलं. त्यामुळे स्टोक्स आणि विराटमध्ये शाब्दिक चकमक झाली, अखेर अंपायरच्या मध्यस्थीनं हा वाद थांबला. या वादानंतरही स्टोक्सनं निर्धारानं बॅटींग केली. त्यानं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर त्याला वॉशिंग्टन सुंदरनं आऊट केलं.
पुन्हा स्पिन फोबिया
इंग्लंडच्या बॅट्समनला असलेला स्पिन फोबिया (Spin Phobia) टी ब्रेकनंतर पुन्हा एकदा वर आला. आर. अश्विननं तीन आणि अक्षर पटेलनं दोन विकेट घेत इंग्लंडची पहिली इनिंग 205 रनवर संपुष्टात आणली. दहाव्या विकेटसाठी जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांनी 16 रनची पार्टरनरशिप केल्यानंच इंग्लंडला पाच इनिंगनंतर 200 चा टप्पा ओलांडता आला.
भारताची खराब सुरुवात
इंग्लंड प्रमाणे भारताची सुरुवात देखील खराब झाली. शुभमन (Shubman Gill) याला जेम्स अँडरसननं शुन्यावर आऊट केलं. या दौऱ्यातील सात इनिंगमध्ये शुभमननं फक्त एकदाच हाफ सेंच्युरी केली आहे. अन्य सहा इनिंगमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर हा 15 आहे. टीम इंडियातील वाढती स्पर्धा पाहता या तरुण बॅट्समनला या सीरिजमधील शेवटच्या इनिंगमध्ये चांगला खेळ करावा लागेल.
जेम्स अँडरसन (James Anderson) यानं टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बॅट्समनला शून्यावर आऊट करण्याच्या ग्लेन मॅग्राच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोन्ही बॉलर्सनं आत्तापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये 104 वेळा बॅट्समन्सना शुन्यावर आऊट केलं आहे. स्पिन फोबियाचा त्रास सहन केलेल्या इंग्लंडसाठी दिवस संपताना झालेला अँडरसनचा रेकॉर्ड ही एक चांगली गोष्ट होती.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.