
भारतानं ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच देशात टेस्ट सीरिजमध्ये पराभूत करुन नवा इतिहास घडवला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियानं (Team India) सर्व खेळाडूंसह खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत केलं. आता मायदेशात भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या टेस्ट सीरिजला पाच फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
भारत-इंग्लंड सीरिजचा इतिहास
कोलकातामध्ये 2001 साली झालेल्या टेस्टनंतर भारत – ऑस्ट्रेलिया सीरिजचं ग्लॅमर वाढलं. त्यानंतरच्या 20 वर्षात या दोन्ही देशात अनेक रंगतदार टेस्ट झाल्या आहेत. मैदानात आणि मैदानाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी घडलेल्या गोष्टींमुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट नेहमी चर्चेत असतं.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) टेस्ट सीरिजला अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासून इतिहास आहे. इंग्लंडची ज्या देशात वसाहत होती, तिथं त्यांनी क्रिकेट रुजवलं. इंग्लंडची सर्वात मोठी वसाहत असलेला भारत हा देश देखील त्याला अपवाद नव्हता. इंग्रजांनीच भारतीयांना क्रिकेट शिकवलं.
( वाचा : IND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो! )
भारतानं पहिली टेस्ट 1932 साली इंग्लंड विरुद्धच खेळली होती. भारतानं टेस्ट क्रिकेटमधील पहिला विजय हा देखील इंग्लंड विरुद्धच 1952 साली मिळवला. तर अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली टेस्ट सीरिज जिंकली. या विजयामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची दखल घेतली जाऊ लागली.
यापूर्वी इंग्लंड टीममधील प्रमुख खेळाडू भारत दौरा करणं टाळत. वसाहतीच्या मानसिकतेमध्ये जगणारे इंग्रज भारताच्या विजयानंतर ताळ्यावर आले. 1976 सालापासून इंग्लंडची अव्वल टीम भारतामध्ये येऊ लागली. तर 1971 नंतर तीनच वर्षांनी भारतीय टीमनं लॉर्डस टेस्टवर 42 रनमध्ये ऑल आऊट होत तळ गाठला होता. भारताची ती टेस्ट क्रिकेटमधील निचांकी धावसंख्या अगदी 2020 पर्यंत कायम होती.
( वाचा : लॉर्ड्स 1974 ते अॅडलेड 2020, दोन लज्जास्पद कामगिरीमधील अजब योगायोग! )
वर्ल्ड कपमध्ये घडली क्रांती
क्रिकेटला अधिक रंजक बनवण्यासाठी वन-डे क्रिकेटचा जन्म झाला. वन-डे क्रिकेटचे पहिले तीन वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये झाले. पहिल्या दोन वर्ल्ड कपमध्ये मिळून अवघी 1 मॅच जिंकणाऱ्या भारतीय टीमनं 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवला. कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टीमनं सर्वांचे अंदाज चुकवत थेट वर्ल्ड कप विजेतेपद पटकावलं. 1983 च्या सेमी फायनलमध्ये (Cricket World Cup 1983) भारतानं इंग्लंडचा 6 विकेट्सनं पराभव केला होता.
( वाचा : वाढदिवस स्पेशल : कपिल देव @ 175*; एका इनिंगनं बदलला संपूर्ण देश! )
1983 चा बदला इंग्लंडनं चार वर्षांनी 1987 मधील वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये घेतला. मुंबईत झालेल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडनं भारताला पराभूत केलं. त्यानंतर ग्रॅहम गुचची 1990 साली लॉर्ड्सवरील ट्रिपल सेंच्युरी, त्याच सीरिजमध्ये कपिल देवनं लगावलेले सलग चार सिक्सर, 1993 च्या सीरिजमध्ये भारतानं तीन स्पिनर्सचा वापर करुन इंग्लंडला दिलेला व्हाईट वॉश, राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्त्वाखाली 2007 मध्ये इंग्लंडमध्ये जिंकलेली सीरिज, त्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये मिळालेले व्हाईट वॉश, झहीर खानची दुखापत, धोनीनं टेस्ट सीरिजच्या पहिल्याच दिवशीच केलेली बॉलिंग, राहुल द्रविडची संपूर्ण सीरिजमध्ये एकाकी झुंज, विराट कोहलीचं सुरुवातीला अपयश आणि नंतर त्याच इंग्लंडमध्ये केलेला जिगरबाज खेळ, ऋषभ पंत आणि केएल राहुलची सेंच्युरी या सर्व या दोन देशांमधील क्रिकेटच्या न विसरणाऱ्या आठवणी आहेत.
( वाचा : SMAT: तामिळनाडूनं संपवला 14 वर्षांचा वनवास, बडोद्याला 7 विकेट्सनं पराभूत करत दिनेश कार्तिकची टीम चॅम्पियन! )
आता इंग्लंडसाठी स्वामित्वाची लढाई
मागच्या दहा वर्षात भारताला पराभूत करणारी इंग्लंड ही एकमेव विदेशी टीम आहे. इंग्लंडची टीम श्रीलंकेला (ENG vs SL) 2-0 असं पराभूत करुन भारतामध्ये दाखल झाली आहे. आशिया खंडातील वातावरणात ते गेल्या महिन्यापेक्षा जास्त आहेत. तसंच श्रीलंका सीरिजमध्ये नसलेल्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या दोन खेळाडूंच्या समावेशानं इंग्लंडची टीम चांगलीच प्रबळ झाली आहे.
ही सीरिज (IND vs ENG) जिंकली तर इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) फायनल गाठण्याची अंधूक आशा आहे. तर ऑस्ट्रेलियातील फॉर्म कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. जगाप्रमाणेच क्रिकेटवरील इंग्रजांचं राज्य केंव्हाच संपलं आहे. आता जागतिक क्रिकेटच्या आर्थिक नाड्या भारताच्या हातात आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम टीमला भारताच्या बेंच स्ट्रेंथनं पराभूत करत भारतानं मैदानावरची शक्ती दाखवली आहे. काही ब्रिटीशांना भारताचं यश खपत नाही आणि पचत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिज आता क्रिकेटवरील स्वामित्वाची लढाई झाली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.