फोटो – ट्विटर /ICC

अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियानं (Team India) इंग्लंडचा 1 इनिंग आणि 25 रननं पराभव केला. या पराभवानंतर जो रुटला (Joe Root) एक समाधान वाटलं असेल ते म्हणजे अखेर ही सीरिज संपली. आता आपल्याला आणखी एक टेस्ट भारतामध्ये इतक्यात तरी खेळायची नाही. घरातल्या मैदानावर वर्चस्व काय असतं हे भारतीय टीमनं पुन्हा एकदा दाखवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) फायनलमध्ये प्रवेश करुन (India in WTC Final) दाखवून दिलं आहे.

पहिल्या इनिंगमध्ये 160 रनची पिछाडी भरुन काढून भारतीय टीमला अडचणीत आणण्यासाठी इंग्लंडकडं तब्बल अडीच दिवस होते. पण त्यांची टीम अडीच सोडा दोन सेशन देखील पूर्ण खेळू शकली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्याच्या निर्धारानं भारातामध्ये जो रुटची टीम आली होती. पहिली टेस्ट मोठ्या फरकानं जिंकून त्यांनी सुरुवात चांगली केली. नंतर ते शिखरावरुन घरंगळत खाली आहे. (India in WTC Final)

अश्विन आणि अक्षरचं वर्चस्व

संपूर्ण सीरिजमध्ये इंग्लंडला सतावणाऱ्या रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या जोडीनं ही टेस्ट जास्त लांबू दिली नाही. सीरिजच्या शेवटच्या इनिंगमध्ये दोघांनीही पाच-पाच विकेट्स घेतल्या.

या सीरिजमध्ये अश्विननं एकूण 4 टेस्टमध्ये 32 तर अक्षरनं त्याच्यापेक्षा एक टेस्ट कमी खेळत 27 विकेट्स घेतल्या. आर. अश्विनच्या परीक्षेची तयारी करुन आलेल्या इंग्लिश बॅट्समन्सना अश्विनचा पेपर सोडवता आला नाहीच. तर अक्षर हा त्यांच्यासाठी अगदी अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय ठरला.

लंचपूर्वीच्या तीन ओव्हर्स इंग्लंडच्या बॅट्समन्सनी खेळून काढल्या, पण लंचनंतर त्यांनी लगेच आऊट होण्याची रांग लावली. इंग्लंडची अवस्था अगदी 6 आऊट 65 अशी झाली होती. त्यावेळी डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) यानं प्रतिकार केल्यानं इंग्लंडनं शंभरी ओलांडली.

( वाचा : अश्विन, ‘अक्षर’ स्पिन बॉलर्ससमोर इंग्लंड पुन्हा निरक्षर! )

बॅट्समन्सची निराशा

इंग्लंडच्या बॅट्समन्सना पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगनंतर भारतीय बॉलर्सनी डोकं वर काढूच दिलं नाही. नंतरच्या सात इनिंगपैकी फक्त एकाच इनिंगमध्ये त्यांना कसाबासा 200 चा आकडा (205) पार करता आला.

पहिल्या टेस्टच्या चौथ्या इनिंगनंतर थेट चौथ्या टेस्टमध्ये डॅन लॉरेन्स  यानं दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या. तर बेन स्टोक्सनं एक हाफ सेंच्युरी केली.

वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ खेळ

त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यानं त्याच्या नावाप्रमाणेच सुंदर खेळ करत सर्वांची मनं जिंकली. सुंदर आणि अक्षर पटेलनं सकाळच्या अवघड सत्रात सहज बॅटींग केली.

ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सुंदर सातत्यानं चांगला खेळ करत आहे. सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या सुंदरनं चार टेस्टमध्येच तीन हाफ सेंच्युरी केल्या आहेत. यामध्ये त्याची प्रत्येक हाफ सेंच्युरी ही (62, 85* आणि 96*) ही पहिल्यापेक्षा मोठी आहे. सलग दोनदा त्याला सर्व जोडीदार संपल्यानं सेंच्युरी न झळकावता परत यावं लागलं आहे.

21 वर्षाच्या सुंदरनं बॅटींगमध्ये आजवर परिपक्व खेळ केला आहे.  त्याच्या पहिल्या टेस्ट सेंच्युरीची प्रतीक्षा लांबली आहे. पण त्याचा खेळ पाहता तो दिवस फार दूर नाही. त्याचबरोबर त्याचं मुख्य काम असलेल्या बॉलिंगमध्ये आणखी सुधारणा केली तर सुंदर हा नक्कीच ‘लंबी रेस का घोडा’ ठरु शकतो.

( वाचा : शार्दुल ‘सुंदर’ खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा ‘ टीम पेन’ )

पराभवानंतर कमबॅक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सीरिजमध्ये भारतीय टीमनं पहिल्या पराभवानंतर जबरदस्त कमबॅक करत दिमाखात सीरिज जिंकली. त्याचबरोबर आता स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश (India in WTC Final) केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या टेस्ट क्रिकेटमधील दिग्गज टीमना पाठोपाठच्या सीरिजमध्ये पिछाडीवर असताना हरवण्याची किमया भारतीय टीमंनं केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये सर्वात जास्त 32 विकेट्स आणि एका सेंच्युरीसह 189 रन करणारा आर. अश्विन हा ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरला आहे.

विराट कोहलीच्या या टीमनं आपण टेस्ट क्रिकेटमधील बेस्ट टीम असल्याचं दाखवून दिलं आहे. आता त्याचबरोबर ही टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी आता फक्त न्यूझीलंडला एक धक्का देण्याची गरज आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: