फोट – ट्विटर/@root66

ऑस्ट्रेलियातील पिच आणि भारतामधील पिचमध्ये जितका फरक आहे, तितकाच फरक टीम पेनच्या (Tim Paine) ऑस्ट्रेलिया आणि जो रुटच्या (Joe Root) इंग्लंड टीममध्ये आहे. इंग्लंडचा कॅप्टन हा फक्त कॅप्टन म्हणून टीममध्ये जागा अडवत नाही तर स्वत:  आघाडीवर राहून खेळतो. रुटच्या भक्कम खेळामुळे इंग्लंडनं चेन्नई टेस्टच्या (Chennai Test) पहिल्या दिवसावर वर्चस्व राखलं आहे.

ब्रेकनंतरही विराटचा रेकॉर्ड कायम

कोरोना व्हायरसच्या ब्रेकमुळे  तब्बल 14 महिन्यांनी भारतामध्ये टेस्ट मॅच झाली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या टेस्टनंतर कौटुंबिक कारणामुळे ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतरही इंग्लंड विरुद्ध टॉस हरण्याचा विराटचा रेकॉर्ड कायम राहिला. इंग्लंड विरुद्ध सलग नवव्या टेस्टमध्ये विराट कोहली टॉस हरला आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं टॉस जिंकताच बॅटींगचा निर्णय घ्यायला काहीच वेळ लावला नाही.

ब्रिस्बेन टेस्टमध्ये (Brisbane Test) ऐतिहासिक विजय मिळवलेल्या टीम इंडियानं या टेस्टसाठी पाच बदल केले. ब्रिस्बेनमध्ये दुखापतीमुळे बाहेर बसावा लागलेल्या जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) ही भारतामधील पहिलीच टेस्ट आहे. जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या बुमराहनं भारतामध्ये टेस्ट मॅच खेळण्यासाठी तब्बल 3 वर्षांहून जास्त वाट पाहिली आहे.

( वाचा : IND vs ENG: स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वामित्वाची 89 वर्षांची लढाई! )

बुमराहला भारतामधील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली असती. पण, त्याच्या बॉलिंगवर रॉरी बर्न्सचा (Rory Burns) एक अवघड कॅच ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सोडला. बर्न्स आणि डॉम सिबले (Dom Sibley) या जोडीनं सुरुवातीच्या ओव्हर्स सावध खेळल्या. 2017 मध्ये बंगळुरुत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टेस्टनंतर पहिल्यांदाच कोणत्या विदेशी ओपनर्सनं भारतामध्ये टेस्ट मॅचमध्ये पहिल्या 20 ओव्हर्स खेळून काढल्या.

इंग्लंडला दोन धक्के

आर. अश्विनला (R. Ashwin) सुरुवातीला खेळून काढल्यानं आत्मविश्वास वाढलेल्या बर्न्सनं चूक केली. त्यानं अतिआत्मविश्वासात अश्विनला रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला आणि तो तिथंच फसला. त्यापाठोपाठ बुमराहनं डॅन लॉरेन्सला शून्यावर आऊट करत इंग्लंडची अवस्था 2 आऊट 63 अशी केली.

लंचनंतर बुमराह, अश्विन आणि इशांत या अनुभवी जोडीनं इंग्लंडचा रन रेट नियंत्रणात ठेवला होता. बुमराह-इशांतनं रिव्हर्स स्विंग करत कॅप्टन जो रुट आणि डॉम सिबलेला चकवण्याचा प्रयत्न केला.

रुटनं लंचनंतर सावध खेळून काढलं. मैदानात जम बसल्यानंतर त्यानं वॉशिंग्टन सुंदर आणि शादाब नदीमला लक्ष्य केलं. सुंदरला घरच्या मैदानात टेस्ट क्रिकेट काय असतं याची जाणीव झाली असेल. स्विपचा उत्तम वापर करणाऱ्या आणि स्पिन विरुद्ध सहज खेळणाऱ्या रुटनं सुंदरला लक्ष्य केलं. या मॅचपूर्वी जेमतेम दिड तास आधी टीममध्ये समावेश झालेल्या आणि ‘प्रत्येक टेस्ट ही शेवटची टेस्ट आहे’ या दडपणात खेळणाऱ्या शादाब नदीमला आपण आजच्या दिवसापुर्ती सवलत द्यायला हवी.

रुटचा ‘ड्रीम रन’  

जो रुट सेट झाल्यावर नेहमीच सहज रन काढतो. भारतामध्ये त्याची सातवी टेस्ट आहे. त्यानं सर्व सात टेस्टमध्ये किमान हाफ सेंच्युरी झळकावली आहे. पहिले 18 रन करण्यासाठी 63 बॉल घेणाऱ्या रुटनं पुढचे 82 रन 99 बॉलमध्ये पूर्ण केले.

( वाचा : Fan Corner : इंग्लंड सीरिजमध्ये विराट कोहली, जो रुटपेक्षा जास्त रन काढेल – आशुतोष रत्नपारखी )

शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी करणारा जो रुट हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील नववा तर इंग्लंडचा तिसरा बॅट्समन बनला आहे. त्यानं 164 बॉलमध्ये त्याच्या करियरमधील 20 वी सेंच्युरी पूर्ण केली. रुटची या वर्षातील ही सलग तिसरी सेंच्युरी आहे. यापूर्वी श्रीलंकेत झालेल्या टेस्टमध्ये त्यानं 228 आणि 186 रन केले होते. श्रीलंकेतील फॉर्म तो चेन्नईत देखील घेऊन आला आहे.  2021 या वर्षात रुटचा ड्रीम रन सुरु आहे. त्यानं पहिल्या तीन टेस्टमध्येच 500 पेक्षा जास्त रन केले आहेत.

बुमराहचा कमबॅक

जो रुटला इंग्लंडचा ओपनर डॉम सिबली यानं चांगली साथ दिली. श्रीलंकेतील पहिल्या तीन इनिंगमध्ये फक्त सहा रन करणारा सिबली चेन्नईत अगदी वेगळ्या पद्धतीनं खेळला. त्यानं एक बाजू खंबीर लावून धरली. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहनं त्याला 87 रनवर आऊट केलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा इंग्लंडनं 3 आऊट 263 रन केले होते.

जो रुट अजूनही 128 रनवर नाबाद आहे. आता पहिल्या इनिंगमध्ये 600 पेक्षा जास्त रन करण्याचं इंग्लंडचं लक्ष्य असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी इंग्लंडला ही सीरिज मोठ्या फरकानं जिंकायची आहे. इंग्लिश कॅप्टननं त्याच निश्चयानं पहिल्या दिवशी बॅटिंग केली. आता दुसऱ्या दिवशी रुटसह संपूर्ण इंग्लंड टीम मोठा स्कोअर करणार नाही, याची खबरदारी टीम इंडियाला घ्यावी लागेल.

टीम पेनची ऑस्ट्रेलिया आणि जो रुटची इंग्लंड टीम यांच्यात मेलबर्न आणि चेन्नईतील पिच इतका फरक आहे, याची जाणीव आता टीम इंडियाला नक्की झाली असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: