
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजला पाच फेब्रुवारीपासून चेन्नईत (Chennai) सुरुवात होत आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट या चेन्नईत होणार आहेत. चेन्नईच्या मैदानावरील टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड (Chennai Test Record) हा चांगला आहे.
अनेक क्षणांचे साक्षीदार
भारतानं 1952 साली चेन्नईमध्येच पहिल्यांदा टेस्ट विजय मिळवला होता. विशेष म्हणजे तेंव्हा देखील भारतानं इंग्लंडलाच पराभूत केलं होतं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील थरारक टाय टेस्ट चेन्नईतच झाली. याच मैदानावर सचिन तेंडुलकर आणि नवजोत सिंग सिद्धू यांनी शेन वॉर्नचा (Shane Warne) बागुलबुवा मैदानाच्या बाहेर भिरकावला. पाकिस्तानविरुद्ध 1999 साली सचिनचं झुंजार शतक याच मैदानावरचं. 2008 साली याच मैदानावर सेहवाग-सचिन-युवराज यांनी 387 रनचं टार्गेट चौथ्या इनिंगमध्ये पूर्ण केलं. भारतीय बॅट्समन्सनी झळकावलेल्या तीनपैकी दोन ट्रिपल सेंच्युरी देखील याच मैदानात आहेत. अशा अनेक रेकॉर्ड्सचं (Chennai Test Record) चेन्नईचं मैदान साक्षीदार आहे.
( वाचा : जेंव्हा, वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारतानं चेन्नई टेस्ट जिंकली होती! )
एकूण रेकॉर्ड काय?
भारतानं चेन्नईमध्ये एकूण 32 टेस्ट खेळल्या असून त्यापैकी 14 टेस्ट जिंकल्या आहेत. सहा टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असून 11 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत इतकचं नाही तर एक टेस्ट टाय देखील झाल्याचा रेकॉर्ड (Chennai Test Record) चेन्नईच्या मैदानावर झाला आहे.
इंग्लंड विरुद्धचा रेकॉर्ड काय?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये एकूण 9 टेस्ट झाल्या आहेत. यापैकी 5 टेस्ट टीम इंडियानं तर 3 टेस्ट इंग्लंडनं जिंकल्या आहेत, तर एक टेस्ट ड्रॉ झाली आहे. इंग्लंडला चेन्नईमध्ये 1985 नंतर एकदाही टेस्ट मॅच जिंकता आलेली नाही
मागील टेस्टमध्ये काय झालं?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2016 साली यापूर्वी चेन्नईत टेस्ट मॅच (Chennai Test Record) झाली होती. पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमधील ती शेवटची टेस्ट होती. इंग्लंडकडून पहिल्यांदा बॅटींग करताना मोईन अलीनं (Moeen Ali) सर्वात जास्त 146 रन काढले होते. त्याला सध्याचा इंग्लंड टीमचा कॅप्टन जो रुटनं 88 रन काढून साथ दिली होती. तसंच अन्य दोघांनीही हाफ सेंच्युरी झळकावली होती. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानं इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 477 पर्यंत मजल मारली.
संपूर्ण सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या शिलेदारांनी 477 चा पाठलाग अगदी सहज केला. के.एल. राहुल (KL Rahul) आणि करुण नायर (Karun Nair) ही कर्नाटकची जोडी जमली. राहुलची डबल सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. तर नायर हा भारताकडून ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा वीरेंद्र सेहवाग नंतरचा दुसराच बॅट्समन बनला. नायरनं 303 रन काढले. त्यामुळे टीम इंडियानं 7 आऊट 759 अशा भक्कम धावसंख्येवर पहिली इनिंग घोषित केली.
( वाचा : Fan Corner : इंग्लंड सीरिजमध्ये विराट कोहली, जो रुटपेक्षा जास्त रन काढेल – आशुतोष रत्नपारखी )
इंग्लंडची दुसरी इनिंग रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) माऱ्यापुढे कोसळली. जडेजानं 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या इनिंगमध्ये 207 पर्यंतच मजल मारता आली आणि भारतानं ती टेस्ट एक इनिंग आणि 75 रननं जिंकली.
भारताचा चेन्नई टेस्टमध्ये शेवटचा पराभव 1999 साली पाकिस्तानविरुद्ध झाला आहे. त्यामुळे इंग्लंडला भारताला चेन्नईत नमवण्यासाठी पर्वताएवढं भक्कम आव्हान पेलावं लागणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.