फोटो – सोशल मीडिया

स्वत:वर विश्वास, मनात जिद्द आणि टीमसाठी सर्वस्व ओतून खेळण्याची इच्छाशक्ती असेल तर अद्भुत खेळी करता येते हे आर. अश्विननं (Ravichandran Ashwin) दाखवून दिलं आहे. अश्विननं मागच्याच महिन्यात सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) शारीरिक दुखापतींची पर्वा न करता हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत 42.4 ओव्हर्स म्हणजे जवळपास निम्मा दिवस खेळून काढला होता. त्यानंतर आता घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर त्यानं आठव्या क्रमांकावर येत सेंच्युरी झळकावली. मॅचविनर अश्विनच्या (Matchwinner Ashwin) या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर घट्ट पकड मिळवली आहे. आता उरलेल्या दोन दिवसात इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी 429 रन्स करायचे असून त्यांच्या सात विकेट्स बाकी आहेत.

( वाचा : ‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य! )

कधी आला होता अश्विन?

फिरत्या चेन्नई पिचवर भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या सेशनमध्ये आपण पाच विकेट्स फक्त 52 रनमध्ये गमावल्या होत्या. भारताची अवस्था सहा आऊट 106 अशी होती. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) एका बाजूनं उभा होता. त्याला साथ देण्यासाठी मॅचविनर अश्विनची (Matchwinner Ashwin) मैदानात एन्ट्री झाली.

एखाद्या सिनेमात आधी सर्व जण मार खातात त्यानंतर एक सामान्य भासणारा माणूस एन्ट्री घेतो. आधीचे रथी महारथी पडलेले असताना ‘आता हा सामान्य माणूस काय करणार?’ असा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला असतो. सामान्यातलं असामान्यत्व हेच त्याचं हिरो असण्याचं मुख्य लक्षण असतं. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर हाच सामान्य खेळाडू आणि मॅचविनर खेळाडू यामधील फरक आहे. सहा आऊट 106 असा स्कोअर झालेला असताना मॅचविनर अश्विन (Matchwinner Ashwin) मैदानात उतरला.

( वाचा : IND vs ENG : वेलकम टू इंडिया (फायनली) इंग्लंड! )

विराटची क्लास इनिंग!

अश्विननं सुरुवातीला कोहलीला साथ दिली. पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झालेल्या विराटनं या अडचणीच्या क्षणी हाफ सेंच्युरी झळकावली. टेस्ट करियरमधील त्याची ही 25 वी हाफ सेंच्युरी. या हाफ सेंच्युरीला विराट स्वत: कसं लेखतो याची कल्पना नाही. आमच्यासाठी मात्र ही टॉप क्लास इनिंग आहे.

सुरुवातीला संयमी खेळत असलेल्या कोहलीनं नंतर स्पिनर्सना अंगावर घेतलं. त्यामुळे अश्विनला मैदानात स्थिरावण्यास मदत झाली. खूप काळापासून प्रतिक्षेत असलेल्या सेंच्युरीकडं कोहलीची वाटचाल सुरु होती. त्यावेळी 62 रनवर तो ‘अंपायर कॉल’चा बळी ठरला.

विराट आऊट झाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलेल्या इंग्लंडच्या बॉलर्सना त्रस्त करायला चेन्नईचा स्थानिक हिरो आर. अश्विन मैदानात होता. त्यानं 2017 नंतर पहिल्यांदाच  हाफ सेंच्युरी पूर्ण केली होती. तब्बल 40 टेस्टनंतर आलेला हा योग अश्विन सहज जावू देणार नव्हता. त्यानं तळाच्या बॅट्समन्सच्या मदतीनं इंग्लंडवर हल्ला केला.

( वाचा : IND vs ENG : चेन्नईच्या फिरत्या पिचवर, रोहित शर्माच्या सेंच्युरीनं टीम इंडियाची आघाडी )

भारताची नववी विकेट पडली त्यावेळी अश्विन त्याच्या पाचव्या टेस्ट सेंच्युरीपासून 23 रन दूर होता. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) मैदानात उतरला तेंव्हा लवकर तो अश्विनसह परतणार असं सर्वांना वाटलं होतं. पण सिनेमात हिरो सोबत मारामारी करताना सामान्य माणसाच्या अंगातही बळ संचारतं तसंच इथं सिराजच्या बाबतीत झालं.

सिराजनं अडवलेल्या प्रत्येक बॉलला चेन्नईच्या प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत होता. इंग्लंडनं नवा बॉल घेतला. त्यावेळी अश्विननं जॅक लीचची ओव्हर सहज खेळत 90 चा टप्पा ओलांडला. त्यानंतर मोईन अलीला एक शानदार सिक्सर खेचला. या सिक्सरनंतर लगेच त्यानं आणखी एक चौकार खेचत ही मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय फॅनला त्याला मानवंदना देण्यासाठी उभं केलं.

अश्विनच्या आनंदाप्रमाणेच दुसऱ्या बाजूनं मोहम्मद सिराजनं केलेलं सेलिब्रेशन देखील सर्वांच्या कौतुकाचा विषय आहे. मित्राच्या सहकाऱ्या आनंदात बेभान होणारा सोबत असेल तर त्याच्या जोडीनं सर्व काही करता येतं. सिराजचं ते सेलिब्रेशन पाहून सर्वांना तसंच वाटलं असेल.

स्पिन पिचवर खेळताना ट्विट करुन किंवा दुसऱ्यांच्या ट्विट्सला लाईक करुन भागत नाही. तर उत्तम तंत्र असावं लागतं. हे पहिल्या दिवशी रोहित शर्मानं आणि दुसऱ्या दिवशी कोहली-अश्विननं दाखवून दिलं आहे. इंग्लंडचे खेळाडू यापासून धडा घेणार की पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे “आमच्याकडं या आमच्या पिचवर जिरवतो’  ही भावना उराशी कवटाळून बसणार हे पाहावं लागेल.

( वाचा : खेळता येईना पिच वाकडे : चेन्नईला नावं ठेवण्यापूर्वी जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा )

जगात काहीही होऊ शकतं हे 2020 नं दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता 2021 मध्ये इंग्लंडची टीम यापासून नोट्स घेईल अशी सकारात्मक आशा अश्विनच्या छान खेळीनं भरलेल्या सकारात्मक दिवशी करायला हरकत नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: