फोटो – ट्विटर, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ते इंग्लंड पर्यंत पसरलेल्या क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाचं अंगण असलेलं गाबा किंवा इंग्लंड क्रिकेटचं घर असलेलं लॉर्ड्स दोन्ही देशात टीम इंडियानं यजमानांना लोळावलं आहे. टीम इंडियानं गेल्या 9 महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये मिळवलेल्या यशात एक समान धागा आहे. तो धागा म्हणजे मोहम्मद सिराज (Mohammed Siraj). टेस्ट क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाल बॉलनं सिराजनं (Siraj Factor) सर्व प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचा इशारा दिला आहे.

पदार्पणात चमकदार कामगिरी

मोहम्मद सिराजनं मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर महिन्यात बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वीच्या टेस्टमध्ये टीम इंडिया 36 रनवर ऑल आऊट झाली होती. त्या हादऱ्यातून सावरणाऱ्या टीममध्ये सिराजनं चमकदार कामगिरी केली. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक रन काढलेल्या मार्नस लाबुशेनला आऊट केलं. सिराजनं मेलबर्न टेस्टमध्ये 5 विकेट्स घेतल्या. पदार्पणातील टेस्टचा विचार केला तर ही चांगली कामगिरी होती.

गाबामध्ये गर्जना

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होती. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षात कधीही पराभव झाला नव्हता. त्यामुळे गाबा हा ऑस्ट्रेलियाचा ‘अजिंक्यगड’ होता. सिडनी टेस्ट ड्रॉ होत असताना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) आर. अश्विनला गाबामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं.

ऑस्ट्रेलियन टीमच्या अहंकाराच्या फुग्याला टीम इंडियानं टाचणी लावली. ब्रिस्बेन टेस्टमध्ये 3 विकेट्सनं विजय मिळवत ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा सीरिज जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सिराजनं 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी सिराजनं (Siraj Factor) केली.

मोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता!

लॉर्ड्सचा लाल बादशाह

गाबा ऑस्ट्रेलियाचा किल्ला होता. तर लॉर्ड्स हे इंग्लंडचे अंगण होते. लॉर्ड्सवर टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब होता. यापूर्वी फक्त दोनदा (1986 आणि 2014) टीम इंडियानं लॉर्ड्सवर टेस्ट जिंकली होती. अनुभवी जेम्स अँडरसन आणि फॉर्मातील जो रूट यांच्या जोरावर इंग्लंड लॉर्ड्समध्ये जिंकेल असाच सर्वांचा अंदाज होता.

इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सिराजनं जीव तोडून बॉलिंग केली. त्यानं दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी चार अशा 8 विकेट्स घेतल्या. तो इनिंगमध्ये हॅट्ट्रिकवर होता. मोईन अली आणि सॅम करन हे इंग्लंडचे ऑलराऊंडर त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये लागोपाठच्या बॉलवर आऊट केले. त्यानंतर शेवटच्या तासाचा खेळ सुरु झाला आणि विराटनं सिराजच्या हातात बॉल दिला. सिराजनं कॅप्टनला निराश केलं नाही. त्यानं एकाच ओव्हरमध्ये मैदानात सेट झालेला बटलर आणि अँडरसनला आऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

फास्ट बॉलर्सच्या जीवावर भारताला हरवण्याचे दिवस आता संपले आहेत. टीम इंडियाचे फास्ट बॉलर्स हे अव्वल दर्जाचे आहेत. हे गेल्या काही वर्षात वारंवार सिद्ध झाले आहे. हे सिद्ध करण्यात लाल बादशाह मोहम्मद सिराजचा (Siraj Factor) मोठा वाटा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: