
टीम इंडियाचा विकेट किपर – बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याने अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुद्ध झळकावलेली सेंच्युरी एक तर तुम्हाला आवडली असेल नाही तर तुम्ही चूक असाल. भारताच्या या 23 वर्षांच्या तरुण खेळाडूसाठी 2021 वर्ष कमालीचं यशस्वी ठरत आहे. नुकत्याच संपलेल्या अहमदाबाद टेस्टमध्ये त्यानं 101 रनची अविस्मरणीय खेळी केली. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तिन्ही देशात टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावणारा तो अॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याच्या नंतर दुसराच विकेट किपर आहे.
पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तेंव्हा त्याच्या गुणवत्तेबद्दल कुणालाच शंका नव्हती. पण त्याची तुलना ही नेहमी पूर्ण भरात असलेल्या महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) केली गेली. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडून विकेट किपींगमध्ये काही चुका झाल्या. त्यामुळे अगदी भारतामधील मैदानात तो खेळत असताना ‘धोनी, धोनी’ अशी घोषणाबाजी करत प्रेक्षकांनी त्याची टिंगल केली.
या आयपीएलमध्येही तो भरात नव्हता. त्यातच दुखापतीमुळे तो काही मॅच खेळू देखील शकला नाही. मागील संपूर्ण वर्ष टीम इंडियातील जागेसाठी संघर्ष करणाऱ्या आणि टीकाकारांच्या कायम धारेवर असलेल्या ऋषभ पंत याच्या खेळात सुधारणा कशी झाली याचे रहस्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri on Pant) यांनी सांगितले आहे.
इंग्लंड विरुद्ध सीरिज जिंकल्यानंतर बोलताना शास्त्री यांनी पंतनं अहमदाबाद टेस्टमध्ये सुरुवातीला त्याच्या नैसर्गिक शैलीला मुरड घालून केलेल्या खेळाबद्दल प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर कोणता ‘कानमंत्र’ पंतच्या यशात निर्णयाक ठरला याचं उत्तरही दिलं आहे.
( वाचा : उत्तराखंडसाठी ऋषभ पंत आला धावून… त्याची कृती समजल्यावर तुम्हालाही वाटेल अभिमान! )
‘ऋषभ पंतनं शानदार खेळ केला आहे. पण हे सहज झालेलं नाही. आम्ही त्याला कठोर वागणूक दिली आहे. तू खेळाचा थोडा अधिक सन्मान करायला पाहिजे असं आम्ही त्याला स्पष्टपणे सांगितले होते. त्याचबरोबर थोडं वजन कमी करण्याची आणि विकेट किपींगवर अधिक परिश्रम घेण्याची सूचना देखील आम्ही त्याला दिली होती,’ अशी माहिती (Ravi Shastri on Pant) शास्त्रींनी दिली.
‘त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता आम्हाला माहिती होती. त्याने मागच्या काही महिन्यांमध्ये अगदी अथक परिश्रम केले. त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. कालची त्याची इनिंग याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
ती इनिंग दोन भागांमध्ये विभागली होती. सुरुवातीला त्यानं रोहित (रोहित शर्मा) सोबत पार्टरनरशिप केली. त्याने त्याच्या स्वभावाला मुरड घालत पहिले 50 रन केले. जे अतिशय अवघड आहे. 50 झाल्यानंतर त्यांनं त्याचा नैसर्गिक खेळ केला. त्याची विकेट किपींग देखील चांगली झाली आहे. तसेच वाशी (वॉशिंग्टन सुंदर) यानेही त्याला उत्तम साथ दिली,’’ असे शास्त्रींनी (Ravi Shastri on Pant) स्पष्ट केले.
( वाचा : सलग पाच सिक्सनंतर सहावा बॉल खेळताना काय विचार होता?, पोलार्डनं सांगितली ‘मन की बात’ )
अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतनं झळकावलेल्या सेंच्युरीबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. इंग्लंड विरुद्ध संपलेल्या चार टेस्टच्या सीरिजमध्ये पंतनं 54 च्या सरासरीनं 321 रन केले. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.