फोटो – ट्विटर, आयसीसी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका सध्या 1-0 ने मागे आहे. सेंच्युरियन या बालेकिल्ल्यात आफ्रिकेचा पराभव झाला. आफ्रिकन क्रिकेटला मागच्या आठवड्यात बसलेला हा सर्वात मोठा धक्का नाही. आफ्रिकेचा विकेट किपर-बॅटर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) वयाच्या 29 व्या वर्षीच टेस्ट क्रिकेटमधून घेतलेली रिटायरमेंट हा आफ्रिकन क्रिकेटला भारताविरुद्ध्या पराभवापेक्षा जास्त मोठा धक्का आहे. आफ्रिकन क्रिकेटमधील दुष्टचक्राचा (South Africa Cricket Problem) डी कॉक हा आणखी एक बळी आहे.

का आहे धक्का?

दक्षिण आफ्रिकन टेस्ट क्रिकेट व्यवस्थेतील डी कॉक हा एकमेव ग्लोबल चेहरा होता. एक चपळ विकेट किपर आणि आक्रमक बॅटर अशी त्याची जगभरात ओळख होती. त्याचे विकेट किपर म्हणून असलेले आकडे हे गिलख्रिस्ट संगकाराच्या रांगेतील आहेत. बॅटर म्हणून असलेली 38 ची सरासरी ही अस्थिर क्रिकेट व्यवस्था असलेल्या टीमसाठी खूप मोठी होती.  तो 54 टेस्ट्स खेळला. 100 टेस्ट सहज पूर्ण करण्याची त्याची क्षमता होती. पण, त्याने टेस्ट क्रिकेट थांबवण्याचा निर्णय घेतला.

डी कॉकने हा निर्णय जाहीर करताना कौंटुबिक कारण दिले आहे. हे तेवढेच कारण नाही, हे क्रिकेट विश्वातील प्रत्येकालाच माहिती आहे. T20 वर्ल्ड कप दरम्यान (T20 World Cup 2021) जे घडलं ते पाहाता तो या पद्धतीचा निर्णय घेऊ शकतो, हे लक्षात आले होते. त्यानंतरही क्रिकेट साऊथ आफ्रिकेला (Cricket South Africa) त्याला थांबवता आले नाही. या क्रिकेटचा कारभार पाहाता तो थांबवण्यासाठी पुरेसे प्रयत्न (South Africa Cricket Problem) झालेच नाहीत, असे समजण्यास जागा आहे.

जुने दुखणे

क्रिकेट वर्ल्ड कप 2015 च्या सेमी फायनलमध्ये (Cricket World Cup 2015) खेळाडूंच्या आधारावर टीमची निवड झाली. त्यामुळे आफ्रिकेने वर्ल्ड कप फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी गमावली. त्यापेक्षाही डी व्हिलियर्सच्या (AB de Villiers) तडकाफडकी रिटायरमेंटसाठी देखील त्या मॅचमधील जखम कारणीभूत ठरली.

2015 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर आफ्रिकन क्रिकेट टीमची घडी विस्कटली. मागील वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019)  टीम एकत्र दिसलीच नाही. त्यानंतर 2020 हे वर्ष बोर्डाच्या गोंधळामुळे वाया गेले. तर 2021 मध्ये Black Lives Matter प्रकारानंच आफ्रिकन क्रिकेट (South Africa Cricket Problem) जास्त चर्चेत राहिले.

‘ती’ धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचं कारण?

फाफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) टेस्ट क्रिकेटमधून मागील वर्षी रिटायरमेंट घेतली. तो लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी उपलब्ध होता. कॅरेबीयन प्रीमियर लीग (CPL) आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खोऱ्यानं रन करूनही बोर्डाच्या अटींची पूर्तता न केल्यानं त्याची वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नाही.

जगभरातील T20 लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा इम्रान ताहीर (Imran Tahir) देशासाठी T20 खेळण्यास उपलब्ध आहे. त्यानंतरही टीम निवडताना ताहीरचा का विचार केला जात नाही  याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळालेले नाही. T20 वर्ल्ड कपमध्येही गुडघ्यावर बसण्याचा निर्णय खेळाडूंवर लादला होता. त्याबाबत खेळाडूंच्या मताची पर्वा केली जाणार नाही, हे आफ्रिकन बोर्डानं डी कॉकला दाखवून दिले होते.

भविष्यातील वन-डे आणि T20 टीम निवडतानाही डी कॉकला एखादे विशिष्ट कारण देऊन बाजूला ठेवले तर आश्चर्य वाटणार नाही. खेळाडूंची बाजू घेण्यासाठी, त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आफ्रिकन बोर्ड काम करत नाही. एखाद्या खेळाडूनं स्वत: हात पाय मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पंख छाटले जातील हे बोर्डाने वारंवार दाखवले (South Africa Cricket Problem) आहे.

दुष्टचक्र थांबणार का?

दक्षिण आफ्रिकेच्या सध्याच्या क्रिकेट व्यवस्थेतील नॉर्खियाला दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केले आहे. रबाडा, डेव्हिड मिलर, एडेन मार्करम, शम्सी, एन्गिडी, मार्को जेन्सन हे खेळाडू यापूर्वी आयपीएल खेळले आहेत. त्यांना पुन्हा आयपीएल टीम करारबद्ध करण्याची दाट शक्यता आहे. केशव महाराज, डीन एल्गार इंग्लिश कौंटीमध्ये खेळले आहेत. अन्य लीगमध्ये देखील ते खेळू शकतात.

दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या आर्थिक शक्तीपेक्षा बाहेरच्या T20 लीगची शक्ती जास्त आहे. फॉर्म आहे तोपर्यंत या लीगमध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न हे खेळाडू करणार हे उघड आहे. आफ्रिकन क्रिकेटमध्ये सध्या त्यांना लगेच पर्याय उपलब्ध नाही.

क्रिकेट साऊथ आफ्रिका अडचणीत, डायरेक्टर स्मिथ आणि हेड कोच बाऊचरची नोकरी धोक्यात!

इंग्लंड क्रिकेट बोर्डाप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना भक्कम पॅकेज देऊन वार्षिक करार करणे अथवा वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासारखे त्यांना फ्रि लान्सर होण्याची परवानगी देणे हे दोन पर्याय क्रिकेट साऊथ आफ्रिकेकडं आहेत. बोर्डाने हेकटपणा सोडून यापैकी एक पर्याय वापरला तरच दक्षिण आफ्रिका क्रिकेटची या दुष्टचक्रातून सुटका (South Africa Cricket Problem) होऊ शकेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.