फोटो – सोशल मीडिया

दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये सारंच नवं होतं. क्रिकेटचा फॉरमॅट नवा होता. बॉल आऊटचा प्रकार नवा होता. टीम इंडियाचा कॅप्टन नवा होता. त्याचबरोबर थेट वर्ल्ड कप फायनलमध्ये एखाद्या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळणे देखील नवं होतं. 2007 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पदार्पण केलेला भारताचा आक्रमक ऑल राऊंडर युसूफ पठाणनं (Yusuf Pathan) निवृत्ती जाहीर केली आहे. युसूफनं देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट या तिन्ही ठिकाणी आपल्या खेळानं छाप टाकली आहे. त्याच्या निवृत्तीनिमित्त पाहूया युसूफच्या काही अविस्मरणीय खेळी

56 रन आणि 3 विकेट्स : IPL फायनल 2008

T20 वर्ल्ड कप विजेतेपदानंतर भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा सुरु होण्यावर शिक्कामोर्तब झालं. युसूफला पहिल्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) करारबद्ध केलं होतं. शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या त्या टीममध्ये  तरुण आणि मोठी कामगिरी करण्यासाठी धडपड करत असलेल्या खेळाडूंचा समावेश होता. युसूफ त्यापैकी एक.

राजस्थान रॉयल्सनं सर्वांचा अंदाज चुकवत स्पर्धेची फायनल गाठली. फायनलमध्ये राजस्थान समोर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचं (CSK) आव्हान होतं. त्या मॅचमध्ये युसूफनं पहिल्यांदा बॉलिंग करताना 4 ओव्हरमध्ये 22 रन देत तीन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे चेन्नईच्या पाच पैकी तीन विकेट्स युसूफनं घेतल्या होत्या. त्यानंतर बॅटींग करताना युसूफनं राजस्थानकडून सर्वात जास्त 56 रन काढले. त्याने ही खेळी 39 बॉलमध्ये केली होती. युसूफच्या या खेळीमुळे राजस्थाननं पहिल्या आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटाकावलं. पहिल्या आयपीएस फायनलच्या ‘मॅन ऑफ द मॅच’ अर्थातच युसूफ पठाण (Yusuf Pathan) होता.

इराफानसोबत पार्टरनरशिप : वि. श्रीलंका, 2009

युसूफ पठाण आणि त्याचा लहान भाऊ इरफान पठाण (Irafan Pathan) हे दोघं एकत्र टीम इंडियाकडून खेळले. श्रीलंकेविरुद्ध 2009 साली झालेल्या T20 मध्ये पठाण बंधूंनी कमालीची पार्टरनरशिप करुन भारताला विजय मिळवून दिला होता.

श्रीलंकेने पहिल्यांदा बॅटिंग करत भारतासमोर विजयासाठी 172 रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 7 आऊट 117 अशी झाली होती. त्यानंतर पठाण बंधूंची जोडी जमली. या दोघांनी 25 बॉलमध्ये 59 रनची पार्टरनरशिप करत भारताला 3 विकेट्सनं विजयी केले.

( वाचा : Explained : रवीचंद्र अश्विन का आहे बॉलर्समधील व्हिव रिचर्ड? )

 37 बॉलमध्ये 100:  वि. मुंबई इंडियन्स  2010

आयपीएल 2010 मध्ये (IPL 2010) मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या लढतीमध्ये युसूफ पठाणची (Yusuf Pathan) वादळी इनिंग पाहयला मिळाली होती. मुंबई इंडियन्स पहिल्यांदा बॅटींग करताना राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 213 रनचं अवघड आव्हान ठेवलं होतं.

या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना युसूफनं फक्त 37 बॉलमध्ये 9 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीनं 100 रन काढले होते. आयपीएल इतिहासातील ते सर्वात वेगवान शतक होते. पुढे ख्रिस गेलनं 2013 साली युसूफचा हा रेकॉर्ड मोडला.

सर्वात वेगवान सेंच्युरी : वि. महाराष्ट्र 2010

विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध खेळताना युसूफने फक्त 40 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. महाराष्ट्राच्या 231 रनचा पाठलाग करताना युसूफ 23 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला होता. त्यानं 37 व्या ओव्हरमध्ये मॅच संपवली. या दरम्यानच्या काळात त्यानं 42 बॉलमध्ये 8 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीनं नाबाद 108 रन काढले होते. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात वेगवान सेंच्युरी असून युसूफचा हा रेकॉर्ड आज 11 वर्षांनतरही कायम आहे.

( वाचा : इशांत शर्मा @ 100 : ‘वो तो है अलबेला, हजारों में अकेला’! )

चौथ्या इनिंगमध्ये 536 चं टार्गेट पूर्ण : वि. दक्षिण विभाग 2010

पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग यांच्यात झालेली ही फायनल युसूफच्या तडाखेबंद डबल सेंच्युरीमुळे गाजली. दक्षिण विभागानं चौथ्या इनिंगमध्ये विजयासाठी 536 रनचं अतिशय अवघड आव्हान ठेवलं होतं. युसूफनं 190 बॉलमध्ये 210 रनची नाबाद खेळी करत हे सर्वात मोठं आव्हान पूर्ण केलं.

7 आऊट 98 नंतर सेंच्युरी:  वि. दक्षिण आफ्रिका 2011

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरीन वन-डे मध्ये भारताचा पराभव झाला, पण युसूफनं (Yusuf Pathan) टीमची लाज वाचवली होती. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करत भारतासमोर विजयासाठी 251 रनचं आव्हान ठेवलं होतं. त्याला उत्तर देताना भारताची अवस्था 19.1 ओव्हरमध्ये 7 आऊट 98 अशी झाली होती.

युसूफनं त्या अडचणीच्या परिस्थितीमध्या त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरमधील सर्वोत्तम इनिंग खेळली. युसूफनं 70 बॉलमध्ये 8 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीनं 105 रन काढले. त्यानं झहीर खान सोबत नवव्या विकेटसाठी 100 रनची पार्टरनरशिप केली. युसूफ आऊट झाल्यानंतर डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल या आग ओकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी अक्षरश: सुटकेचा निश्वास सोडला होता.   

( वाचा : क्रिकेटची अनेक ‘स्टेशन’ पार करणाऱ्या ‘दावणगिरी एक्स्प्रेस’ ची विश्रांती )

15 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी: वि. सनरायझर्स हैदराबाद 2014

कोलकातामध्ये झालेल्या य मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादकडे डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर असा अनुभवी बॉलिंग अटॅक होता. या माऱ्यापुढं युसूफनं 15 बॉलमध्येच हाफ सेंच्युरी झळकावत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान हाफ सेंच्युरीची नोंद केली होती. पुढे, केएल राहुलनं 2018 साली 14 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी करत हा विक्रम मोडला.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: