फोटो – ट्विटर/ नवलदीप सिंग

ऑस्ट्रेलियातील कोव्हिड प्रोटोकॉल्स (COVID- 19 protocols) तोडल्याचा आरोप असलेल्या पाच खेळाडूंना पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डांनं (BCCI) घेतला आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत (Rishabh Pant), शुभमन गिल (Shubhman Gill), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) या पाच खेळाडूंवर हा प्रोटोकॉल्स मोडल्याचा आरोप आहे. त्यामुळे या सर्वांना आता विलगीकरणात (Isolation)  राहवं लागणार आहे.

“या खेळाडूंनी जाणीवपूर्वक प्रोटोकॉल मोडलेला नाही. तिसऱ्या टेस्टपूर्वी भारतीय टीमला अस्थिर करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन मीडिया आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून’ केला जात आहे, अशी BCCI भूमिका आहे, असं वृत्त PTI नं BCCI मधील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिले आहे.

काय आहे प्रकरण?

टीम इंडियाचा मॅलबर्नमधील फॅन नवलदीप सिंग (Navaldeep Singh) यांनी हे पाच खेळाडू हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यानंतर या खेळाडूंचं बिल दिल्याबद्दल ऋषभ पंतनं आपली गळाभेट घेतली असाही त्यानं ट्विटरवर दावा केला होता. यानंतर हा सर्व वाद सुरु झाला.

या प्रकरणाला वादाचं स्वरुप येताच नवलदीप यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण देत पंतनं गळाभेट न घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसंच आपल्या ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाल्याबद्दल माफी मागितली.

काय आहे नियम?

ऑस्ट्रेलियातील सध्याच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना शहरातील हॉटेलमध्ये बसून जेवण करण्याची परवानगी नाही. ते हॉटेलच्या बाहेर उभं राहून पार्सल घेऊ शकतात. तसंच सार्वजनिक ठिकाणी एखाद्या अनोळखी व्यक्तीस भेटण्याची किंवा त्याला स्पर्श करण्याचीही परवानगी नाही. हा व्हिडीओ समोर येताच क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा केली. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्याचं जाहीर केलं.

या खेळाडूंची चौकशी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि BCCI एकत्र करणार आहे, असं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं जाहीर केलं आहे. मात्र ही चौकशी कधी पूर्ण होणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या पाच खेळाडूंना आता वेगळं राहवं लागणार आहे. तसंच अन्य खेळाडूंच्या शिवाय सराव करावा लागेल. त्यांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवण्याची शक्यताही काही ऑस्ट्रेलियन मीडियानं व्यक्त केली आहे.

BCCI नं फेटाळले आरोप

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा संयुक्त चौकशी करण्याचा प्रस्ताव BCCI नं फेटाळला आहे. ‘’या प्रकरणात भारतीय खेळाडूंनी जाणीवपूर्वक नियम मोडलेला नाही. बाहेर रिमझिम पाऊस असल्यानंच खेळाडू आतमध्ये जेवण्यासाठी गेले. तिसऱ्या टेस्टपूर्वी भारतीय टीमला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असेल तर हा दुर्दैवी प्रकार आहे.’’ असं BCCI च्या अधिकाऱ्यानं PTI शी बोलताना सांगितले आहे.

पुन्हा मंकीगेट?

भारतीय खेळाडूंच्या बाबतीमध्ये एकाच दिवसात या सर्व घडामोडी घडल्यानं ऑस्ट्रेलियाचा हा पुन्हा ‘मंकीगेट’चा प्रकार आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. भारतीय टीमच्या 2007-08 च्या दौऱ्यात सिडनी टेस्टमध्ये हे प्रकरण घडले होते. भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन अँण्ड्यू सायमंड्स याने केला होता.

( वाचा : काय आहे भारत-ऑस्ट्रेलियातील सर्वात वादग्रस्त ‘मंकीगेट’ प्रकरण? )

हरभजनने आपल्याला उद्देशून ‘मंकी’ हा वर्णद्वेषी शब्द वापरल्याचा सायमंड्सचा दावा होता. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाला ‘मंकीगेट’ असे म्हंटले जाते. या प्रकणात सामनाधिकारी माईक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन टेस्टची बंदी घातली होती. या बंदीला BCCI नं आव्हान दिलं.  ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टात ICC च्या कमिशनसमोर झालेल्या सुनावणीत हरभजन निर्दोष असल्याचं सिद्ध झालं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: