फोटो – सोशल मीडिया

वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag)आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला तेंव्हा तो फक्त मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचमध्ये यशस्वी होईल असं मानलं जात असे. प्रत्यक्षात सेहवाग निवृत्त झाल्यानंतर त्यानं वन-डे पेक्षा टेस्ट क्रिकेटवर जास्त प्रभाव टाकला होता. सेहवागला टेस्टमध्ये ओपनिंगला पाठवण्याची सौरव गांगुलीची चाल चांगलीच यशस्वी झाली. पहिल्या बॉलपासून वेगाने रन्स जमवणे, एकाच सत्रात पाच दिवसाच्या खेळाची दिशा बदलणे आणि चांगली सुरुवात करुन टीमला सूस्थितीमध्ये पोहचवणे ही कामं सेहवागनं अनेकदा केली आहेत.

वीरेंद्र सेहवागच्या टेस्टमधील सातत्यपूर्ण खेळाला 2003 च्या मेलबर्न टेस्टमध्ये (Melbourne Test) सुरुवात झाली. मेलबर्न टेस्टच्या पहिल्याच दिवशी त्याने अविस्मरणीय 195 रन्स काढले होते. भारत ती टेस्ट हरला, पण सेहवागची ती खेळी आजही क्रिकेट फॅन्सच्या -हदयात कोरली गेलेली आहे. मेलबर्न टेस्टमध्ये आजवर कोणत्याही पाहुण्या देशाच्या खेळाडूने सेहवागपेक्षा जास्त स्ट्राईक रेटने टेस्ट सेंच्युरी केलेली नाही.

( वाचा : ॲडलेडच्या आठवणी : वीरेंद्र सेहवागनं सहा तास संयमी खेळून टाळला होता भारताचा पराभव! )

पहिल्या टेस्टमध्ये अनपेक्षित पराभव आणि दुसरी टेस्ट ड्रॉ झाल्याने मेलबर्नमधील तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्स अधिक आक्रमक होते. सेहवाग-आकाशा चोप्रा जोडीनं पहिले सत्र शांतपणे खेळून काढले. मैदानात सेट झाल्यावर सेहवागने मेलबर्नमध्ये ‘बॉक्सिंग डे’ च्या दिवशी गर्दी केलेल्या प्रेक्षकांना अविस्मरणीय खेळाची मेजवानी दिली. ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्सना त्याने मैदानाच्या चारही दिशांना पिटाळले.

सेहवागने 233 बॉल्समध्ये 25 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 195 रन्स काढले. सायमन कॅटिचला सिक्सर मारुन डबल सेंच्युरी करण्याचा त्याचा प्रयत्न थोडा कमी पडला आणि तो आऊट झाला. एखादा भारतीय बॅट्समन परदेशात विशेषत:  भारतीय उपखंडाच्या बाहेर टेस्ट मॅचमध्ये इतकी आक्रमक इनिंग खेळू शकतो हे भारतीयांना यापूर्वी कधी माहितीच नव्हते. सेहवागने ते त्या दिवशी पहिल्यांदाच भारतीय फॅन्सना दाखवले.

वीरेंद्र सेहवाग @ 195

रन्सबॉल्स
1-5078
51-10066
101-15056
151-19532

सेहवागने पहिले 50 रन्स 78 बॉल्समध्ये तर दुसरे 50  रन्स 66 बॉल्समध्ये पूर्ण केले. सेंच्युरीनंतर त्याचा वेग आणखी वाढला. त्यापूढील 50 रन्स तर त्याने 56 बॉल्समध्ये केले. 150 रन्स पूर्ण झाल्यावरही सेहवागचा वेग मंदावला नाही उलट तो आणखी वाढला. त्याने त्यानंतरचे 45 रन्स फक्त 32 बॉल्समध्ये काढले होते.

( वाचा : वाचा सविस्तर : 26 डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या मॅचला ‘बॉक्सिंग डे’ का म्हणतात? )

वीरेंद्र सेहवागने 2003 च्या मेलबर्न टेस्टमध्ये पाचवी टेस्ट सेंच्युरी झळकावली. त्यापूर्वीची त्याची एकही टेस्ट सेंच्युरी मोठी नव्हती. त्यापूर्वी सेहवागने एकदाही टेस्ट मॅचमध्ये 150 रन्स काढले नव्हते. मेलबर्नमधील त्या खेळीनंतर सेहवागला टेस्टमध्ये मोठी इनिंग खेळण्याची सवय लागली. त्याने टेस्ट करियरमध्ये एकूण 14 वेळा 150 पेक्षा जास्त रन्स केले. टेस्टमध्ये सर्वाधिक वेळा 150 रन्स काढणाऱ्या भारतीय बॅट्समन्सच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर सेहवागचाच नंबर आहे. रिकी पॉन्टिंगची डबल सेंच्युरी आणि सेकंड इनिंगमध्ये कोसळण्याची नेहमीची सवय यामुळे भारताने मेलबर्न टेस्ट गमावली, पण टेस्टमधील मॅच विनर वीरेंद्र सेहवागचा जन्म त्याच पराभवात झाला होता.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: