फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) चौथी आणि निर्णायक टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा बराच खेळ पावसामुळे वाया गेला. पावसापूर्वी जो खेळ झाला त्यात रोहित शर्माचं (Rohit Sharma) आऊट होणं हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा बनला.

रोहित कधी आऊट झाला?

टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 369 रनवर रोखलं. त्यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल (Shubhman Gill) फक्त 7 रन काढून आऊट झाला. गिल आऊट झाल्यानंतर रोहितनं भारतीय इनिंगची सूत्रं हाती घेतली. रोहित त्याच्या नैसर्गिक पद्धतीनं खेळत होता. ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्सच्या डावपेचांना त्याच्याकडं उत्तर दिसत होतं. तो 6 चौकाराच्या मदतीनं 73 बॉलमध्ये 44 वर पोहचला होता. परदेशातील पिचवर ओपनर म्हणून त्याची दुसरी हाफ सेंच्युरी फक्त एका सिक्सनं दूर होती.

त्याचवेळी भारतीय इनिंगच्या 20 व्या ओव्हरमध्ये या इनिंगमधला 74 वा बॉल खेळताना रोहित शर्मा आऊट झाला. तो सिक्स मारताना सीमारेषेजवळ (बाऊंड्री लाईन) आऊट झाला नाही. तर ब्रिस्बेनमध्ये शंभरावी टेस्ट खेळणाऱ्या नॅथन लायनच्या (Nathan Lyon) बॉलिंगची दिशा बिघडवण्याच्या उद्देशानं त्याला पुढं येऊन खेळण्याच्या नादात तो आऊट झाला.

कोण झालं नाराज?

रोहितला अशा पद्धतीनं आऊट झालेलं पाहून बहुतेक भारतीय फॅन्स नाराज होणं स्वाभाविक आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही रोहितवर टीका केली आहे. “या प्रकारचा बेजबाबदार फटका (शॉट) खेळण्याची गरज काय होती? डीप स्केवर लेगवर फिल्डर उभा आहे. दोन बॉलपूर्वीच तू फोर मारला आहेस. त्यानंतर या प्रकारचा शॉट कोण खेळतं? तू एक वरीष्ठ खेळाडू आहेस. या पद्धतीच्या फटक्याला कोणतंही कारण नाही. तू विकेट बहाल केली आहेस.’’ अशी टीका गावस्कर यांनी केली आहे.

( वाचा : IND vs AUS : ब्रिस्बेनमध्ये 1046 विरुद्ध 13 या विषम लढाईला सुरुवात! )

रोहितनं काय दिलं उत्तर?

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर ऑलनाईन प्रेस कॉन्फरन्सला पत्रकारांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी रोहित आला होता. त्यामुळे साहजिकच त्याच्या विकेटचा विषय निघाला. त्यावेळी रोहित काय म्हणाला, हे समजून घेणं आवश्यक आहे.

“तो शॉट अचानक कुठुनही आला नाही. मी यापूर्वी देखील अशा पद्धतीनं शॉट मारला आहे. असं काही झालं तर तो खराब शॉट वाटतो. पण, मी त्यावर जास्त विचार करत नाही.  क्रिजवर असताना टीमसाठी जास्त उपयोग कसा होईल याकडं माझं लक्ष असतं. तुम्ही कधी आऊट होता. कधी तुमचा शॉट बाऊंड्री लाईनच्या पार जातो. प्रामाणिकपणं सांगायचं तर माझं आऊट होणं हे दुर्दैवी होतं. मी सांगितलं तसं तो माझा शॉट आहे, आणि मी तो यापुढे देखील खेळणार आहे.’’ या शब्दात रोहितनं ‘त्या’ शॉटचा बचाव केला आहे.

रोहित चुकला का?

रोहित शर्मा या सीरिजमधला सर्वात आत्मविश्वासानं खेळणारा ओपनिंग बॅट्समन आहे. शुभमन गिलपेक्षा जास्त. त्याचबरोबर भारताच्या नवोदीत बॉलर्सना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनरपेक्षाही जास्त आत्मविश्वासनं तो ही मालिका खेळत आहे. त्याच्या तीन्ही इनिंगमध्ये तो कुठेही चाचपडताना दिसला नाही. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्यानं त्याचा खेळ बदलला नाही. त्यानं त्याच्या पद्धतीनं हाफ सेंच्युरी झळकावली.

( वाचा : Explained: रोहित शर्माच्या एन्ट्रीचा टीम इंडियाला कसा होणार फायदा? )

काही जणांना रोहित त्याच्या नैसर्गिक पद्धतीनं खेळला की प्रॉब्लेम असतो. काहींना पुजारानं त्याचा स्वाभाविक खेळ केला तरी प्रॉब्लेम असतो. टेस्ट क्रिकेटच नाही तर कोणतंही क्रिकेट म्हणजे कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम नाही, जिथं सर्व काही अगदी ऑर्डरप्रमाणे होईल.

भारताविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड असलेल्या नॅथन लायनची बॉलिंग खेळण्याची टीम इंडियाची एक निश्चित योजना आहे. लायनला बॉलिंग करताना स्थिर होऊ द्यायचं नाही ही ती योजना आहे. त्याचा मैदानाताला प्रभाव त्याच्याविरुद्ध आक्रमक खेळल्यानंच कमी होणार आहे. दोनदा तो प्रयत्न फसल्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) सिडनी टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी झाला. त्यानं 97 रन काढले. त्यानंतर दिवसभर सातत्यानं बॉलिंग करुनही लायनला भारतीय बॅट्समनवर वरचढ होता आलं नाही. भारतीय टीमच्या या योजनेमुळेच ऑस्ट्रेलियन मैदानात सुरु असलेल्या सीरिजमध्ये लायनला टीम इंडियावर नेहमीसारखा वरचष्मा गाजवता आला नाही.

( वाचा : स्मिथ-वॉर्नर नाही तर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचा आहे टीम इंडियाला मोठा धोका! )

 रोहितचं शॉट सिलेक्शन त्याच योजनेचा भाग होता. त्यामध्ये काहीच चूक नव्हती. लायन हा हुशार बॉलर आहे. समोरचा बॅट्समन बचावात्मक खेळत असला तरी त्याला चकवण्याची त्याच्याकडं क्षमता आहे. इथं त्यानं रोहितला आक्रमक शॉट खेळण्याच्या नादात चकवलं.

रोहितनं त्याच्या स्वभावधर्माला अनुसरुन लायन विरुद्ध जुगार खेळला. ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये तो फसला किंवा लायननं त्याला फसवलं. हा जुगार नेहमीच फसेल असं नाही. कारण, याच नैसर्गिक शैलीतून रोहितनं मागील नऊ टेस्टमध्ये तीन सेंच्युरी झळकावल्या आहेत, ही वस्तुस्थिती कधीही विसरता कामा नये.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: