फोटो – ट्विटर/फॉक्स क्रिकेट

Catches Win Matches! असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हंटलं जातं. चांगल्या कॅच इतकचं महत्त्व रन आऊटला देखील आहे. थेट स्टंपचा वेध घेणारा फिल्डर असेल तर त्याच्या जवळ गेल्यावर रन काढताना बॅट्समन एकदा विचार करतो. क्रिकेटमधील काही रन आऊट हे बरेच गाजले आहेत. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये जॉन्टी ऱ्होड्सनं केलेला भन्नाट रन आऊट आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्या थ्रो मुळेच जॉन्टीची आणि दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डिंगची क्रिकेट विश्वाला ओळख झाली. फार लांब जाण्याची गरज नाही. 2019 च्या वर्ल्ड कप उपांत्य फेरीत (सेमी फायनल) मार्टीन गप्टीलनं (Martin Guptill) थेट  थ्रो करत महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) रन आऊट केलं होतं. त्या रन आऊटचा विषय निघाला की आजही अनेकांच्या छातीत बारीक कळ उमटते.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) एक चपळ फिल्डर म्हणून ओळखला जातो. राजकोटच्या मैदानात त्यानं लहानपणी फिल्डींगसाठी भरपूर घाम गाळला आहे. त्याचं क्रिकेट पाहताना ते वारंवार जाणवतं. मागील वर्ल्ड कपमध्येही त्यानं अनेक मॅचमध्ये बारावा खेळाडू म्हणून जीवतोड फिल्डिंग करत छाप पाडली आहे. मेलबर्न टेस्टमध्येही जडेजानं मॅथ्यू वेडचा (Mathhew Wade) एक जबरदस्त कॅच शुभमन गिलशी धडक झाल्यानंतरही पकडला होता.

जडेजाचा दिवस!

सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जडेजानं सुरुवातीला मार्नस लाबुशाने (Marnus Labschange) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ही जोडी फोडली. त्यानंतर जसप्रीत बुमराहसह ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन ठराविक अंतरानं परत पाठवले. जडेजानं पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेत मोठा स्कोर करण्याच्या ऑस्ट्रेलियन टीमच्या योजनेवर मर्यादा आणली होती.

( वाचा : IND vs AUS: स्मिथच्या सेंच्युरीनंतर जडेजा आणि गिलमुळे टीम इंडियाचं कमबॅक! )

स्मिथचा संघर्ष!

जडेजानं चार विकेट्स घेतल्या असल्या तरी स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या बाजूनं खेळत होता. नॅथन लायन आऊट झाल्यानंतर अकराव्या क्रमांकावर आलेल्या जोश हेजलवुडच्या मदतीनं स्मिथनं वेगानं रन्स जमवण्यास सुरुवात केली होती. सेंच्युरी पूर्ण केलेला स्मिथ संपूर्ण रंगात आला होता. त्याची बॉलवर नजर बसली होती. मैदानात त्यानं घट्ट पाय रोवले होते आणि नेहमीप्रमाणे तो भारतीय बॉलर्सवर वरचढ होऊन खेळत होता.

… आणि स्मिथ आऊट!

त्यावेळी बुमराहाचा आत येणारा बॉल स्मिथननं त्याच्या अगदी नैसर्गिक अशा अनैसर्गिक पद्धतीनं फाईन लेगला लगावला. डीप मिड विकेटला उभा असलेला जडेजानं अत्यंत वेगानं बॉलच्या दिशेनं धाव घेतली. तिकडं स्मिथही दुसऱ्या रन्ससाठी आकांतानं पळत होता. बॉलपासून लांब असलेला जडेजा थ्रो करेपर्यंत आपण दुसरा रन पूर्ण करु असा स्मिथचा साधा हिशेब होता. तोच त्याचा साधा हिशेब चुकला. जडेजानं अगदी बंदुकीतून गोळी निघावी, किंवा  अस्सल नेमबाजानं अचूक लक्ष्यभेद करावा तशा पद्धतीने थेट स्टंपवर थ्रो करत स्मिथनला रन आऊट केलं.

‘हे माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’

रवींद्र जडेजानंही दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर या रन आऊटला आपलं आजवरचं सर्वश्रेष्ठ फिल्डिंग प्रदर्शन असल्याचं म्हंटलं आहे. चार विकेट्स पेक्षा हे रन आऊट मी पुन्हा पुन्हा ( रिवाइंड करुन) पाहील, असं जडेजानं सांगितलं आहे. जडेजाच्या या रन आऊटमुळेच 375 च्या दिशेनं धावणारी ऑस्ट्रेलियाची गाडी 338 रन्सवर थांबली. समान दर्जाच्या दोन टीममध्ये सुरु असलेल्या या अटीतटीच्या टेस्टमध्ये हा 30-25 रन्सचा फरक खूप महत्त्वाचा ठरु शकतो.  

( वाचा : सर रवींद्र जडेजा, धोनी आणि विराटनंतर खास रेकॉर्ड करणारे तिसरे भारतीय! )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: