
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये दोन बदल झाले आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) जागी अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. रोहितची काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाच्या (Team India) टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून निवड झाली. त्यामुळे तो अंतिम 11 मध्ये खेळणार हे त्याच दिवशी निश्चित झालं होतं. तो कुणाच्या जागेवर खेळणार हा प्रश्न होता? मयंक अग्रवालच्या खराब फॉर्ममुळे टीम मॅनेजमेंटसमोरच्या अडचणी कमी झाल्या.
( वाचा : Explained: रोहित शर्माच्या एन्ट्रीचा टीम इंडियाला कसा होणार फायदा? )
भारतीय टीममधील दुसरी निवड ही अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. उमेश यादव (Umesh Yadav) जखमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागेवर दिल्लीच्या नवदीप सैनीची (Navdeep Saini) निवड झाली आहे. या जागेसाठी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि टी. नटराजन (T. Natarajan) ही दोन नावं सैनीपेक्षा जास्त चर्चेत होती. या तिघांपैकी शार्दूलकडं देशांतर्गत क्रिकेटचा जास्त अनुभव आहे. तर, नटराजन आधी आयपीएल (IPL 2020) आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादीत ओव्हर्समधील कामगिरीमुळे चर्चेत होता. या दोघांना मागं टाकत सैनीवर टीम मॅनेजमेंटनं सिडनी टेस्टसाठी विश्वास दाखवला आहे.
…म्हणून सैनीला पसंती!
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये या सीरिजमधील मर्यादीत ओव्हर्सची मॅच सिडनीमध्ये झाली होती. त्यावेळी सिडनीमधील पिच सपाट होते. सपाट पिचवर ज्याच्याकडं जास्त वेग आहे, असा बॉलर फायदेशीर ठरु शकतो. सैनीकडं चांगला वेग आहे. त्यामुळे तो सिडनीमध्ये टीमला उपयुक्त ठरु शकतो.
भारताचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहरानंही (Ashish Nehra) सैनीची निवड व्हायला हवी असं मत याच आधारावर व्यक्त केलं होतं. “या ऑस्ट्रेलियन टीममधील खेळाडू हे रिकी पॉन्टिंग किंवा मॅथ्यू हेडनसारखं शॉर्ट पिच बॉल सहज खेळू शकत नाहीत. सैनीकडं शॉर्ट पिच बॉल चांगल्या पद्धतीनं टाकण्याची क्षमता आहे. नटराजनला आपण रेड बॉल क्रिकेटमध्ये कधी पाहिलेलं नाही. सैनीनं मोहम्मद सिराज प्रमाणे भारत A कडून चांगली कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या आधारावर सैनीची टीम इंडियात निवड झाली आहे,’’ असं नेहरानं स्पष्ट केलं होतं.
( वाचा : वाढदिवस स्पेशल : कपिल देव @ 175*; एका इनिंगनं बदलला संपूर्ण देश! )
“सैनी हा टीम मॅनेजमेंचची पहिली पसंती आहे. शार्दूल आणि नटराजन यांची निवड ही बदली खेळाडू म्हणून झाली आहे. त्यामुळे तर्काच्या आधारावर सैनीची निवड व्हायला हवी’’, याची आठवणही नेहरानं करुन दिली होती.
टीम मॅनेजमेंटनं देखील या सर्व तर्काच्या आधारे सैनीची टीममध्ये निवड केली आहे. सैनी आता जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या फास्ट बॉलर्ससह सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाकडून खेळता दिसणार आहे.
भारताची अंतिम 11 – अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत ( विकेट किपर), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.