फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मेलबर्न टेस्टच्या (Melbourne Test) पहिल्या दिवशी बॅटिंग आली तर ‘ऑल आऊट’ होऊ नये इतकीच भारतीय फॅन्सची अपेक्षा होती. भारताची पहिल्या दिवशी बॅटिंगही आली आणि भारतीय  (Team India)  ‘ऑल आऊट’ देखील झाली नाही. क्रिकेट फॅन्सची इच्छापूर्ती झाली. फक्त पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची संपूर्ण इनिंग संपून भारताला बॅटिंग करायला मिळेल असं फार कमी जणांना वाटलं असेल.

टीम इंडियाच्या बॅट्समन्सच्या अपयशामुळे नाही तर शंभर नंबरी खेळामुळे भारतीय बॉलर्सची कामगिरी या सीरिजमध्ये उठून दिसत आहे. या सीरिजपूर्वीच इशांत शर्मा (Ishant Sharma) आऊट झाला.  पहिल्या टेस्टनंतर मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) नंबर लागला. त्यामुळे मेलबर्नमध्ये भारतीय टीमच्या बॉलिंगची भिस्त ही जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोघांवर होती. या दोन्ही अनुभवी बॉलर्सनी टीमला निराश केलं नाही.

मेलबर्नमध्येच दोन वर्षापूर्वी झालेल्या टेस्टमध्ये बुमराहनं त्या सीरिजमधला सर्वोत्तम बॉल टाकत शॉन मार्शला आऊट केलं होतं. बुमराहच्या ‘त्या’ बॉलनंतर मेलबर्न टेस्टचं आणि पर्यायानं सीरिजचं चित्र बदललं होतं. दोन वर्षीपूर्वी बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मध्ये आठ विकेट घेणाऱ्या बुमराहनं यंदा पहिल्या इनिंगममध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं सुरुवातीलाच सध्या फॉर्मात नसलेल्या जो बर्न्सला आऊट केलं. बर्न्सच्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियन टीमला डेव्हिड वॉर्नरची असणारी गरज आणखी वाढली आहे. बुमराहनं फक्त बर्न्सला झटपट आऊट केलं नाही. तर सेट झालेल्या ट्रेव्हिस हेडला आऊट केलं. शिवाय मिचेल स्टार्क आणि फटकेबाजी करत असलेल्या नॅथन लायन यांनाही आऊट करत ऑस्ट्रेलियाचं शेपूट फार वळणार नाही याची काळजी घेतली.

( वाचा : ‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’ )

इशांत आणि शमीच्या अनुपस्थितीमध्ये एकटा पडलेल्या बुमराहला अश्विननं खंबीर साथ दिली. ‘भारतीय उपखंडाबाहेर अश्विन चालत नाही’ असा सतत आरोप करणाऱ्या टीकाकारांना चोख उत्तर देण्याचा निश्चय अश्विननं केला आहे. त्याने या पिचवर अ‍ॅडलेडपेक्षा जास्त बॉल वळत होता. भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला अश्विननं शून्यावर आऊट केलं. ऑफ स्पिनरनं उजव्या हातानं बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला लेग साईडला शॉट मारण्याच्या जाळ्यात अडकवून आऊट करणे ही क्रिकेटमधली परफेक्ट बॉलिंगची व्याख्या आहे. अश्विननं ती व्याख्या प्रत्यक्षात उतरवली. त्याचबरोबर अंपायरच्या मेहरबानीवर खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनलाही (Tim Paine) अश्विनने आऊट केले.

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

मेलबर्नमध्ये पदार्पणाची संधी मिळालेल्या मोहम्मद सिराजसाठीही (Mohammed Siraj) हा दिवस खास होता. त्याच्या बॉलिंगचा कॅप्टन रहाणेनं उत्तम उपयोग केला. सिराजनंही त्याला निराश केलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून या इनिंगमध्ये सर्वात जास्त रन्स काढणाऱ्या मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) सिराजनं आऊट केलं. सिराजने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये 9 ओव्हर्समध्ये 16 रन्स देत लाबुशेन आणि ग्रीन या दोन विकेट्स घेतला. सिराजसाठी क्रिकेटच्या हा प्रकार सर्वात योग्य मानला जातो. पहिल्या दिवसाच्या बॉलिंगमध्ये तरी सिराजनं सर्वांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

( वाचा : ‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज! )

भारतीय बॉलर्स आज हिट ठरले असतील तर कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सुपर हिट ठरला. तो स्वत:  कॅप्टन म्हणून नवा होता. त्याच्या टीमममध्ये ओपनर, फास्ट बॉलर आणि विकेट किपरही नवे होते. हे कमी म्हणून की काय अ‍ॅडलेडमधील नाचक्की देखील नवी होती. रहाणेनं या कशाचाही कॅप्टनसीवर परिणाम होऊ दिला नाही.

पिच उत्तम वळतंय हे लक्षात येताच त्याने अश्विनला 11 व्या ओव्हरमध्येच बॉलिंगला आणत सर्वांना धक्का दिला. स्लिप, लेग स्लिप फॉरवर्ड शॉर्ट लेग, सिली पॉईंट अशा प्रकाराची फिल्डिंग त्याने लावली होती. ही फिल्ड़िंग पाहून मॅच MCG वर सुरु आहे की इडन गार्डनवर असा प्रश्न कुणालाही पडला असेल. रहाणेच्या सकारात्मक मानसिकतेमुळेच ऑस्ट्रेलियाची टीम 195 रन्सवर ऑल आऊट झाली. या सीरिजमधील सलग दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला 200 च्या आत ऑल आऊट करण्यात टीम इंडियाला यश आले आहे.

टीम इंडियाच्या इनिंगमधील पहिल्या ओव्हरमध्ये मयांक अग्रवाल शून्यावर आऊट झाला. मयांक आऊट होताच भारतीय फॅन्सच्या भोवती पुन्हा एकदा 36 हा आकडा फेर धरुन नाचू लागला. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं पहिल्या दिवसाखेर आणखी पडझड होऊ न देता भारताला 1 आऊट 36 हा स्कोअर गाठून दिला आहे. भारतीय टीमचं या सीरिजमध्ये 36 शी नातं निर्माण झालं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना जाणवलेली ही आणखी एक महत्वाची गोष्ट होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: