फोटो – DNA

क्रिकेट विश्वात एकेकाळी श्रेष्ठत्वाची पताका फडकवणाऱ्या ऑस्ट्रेलियन (Australia) टीमला ही बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) सीरिज कायमची लक्षात राहणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम भरात होती, त्यावेळी ते सर्वांना सगळीकडं हरवत असत. त्या काळातही टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजमध्ये वारंवार फेस आणला होता.

 या ऑस्ट्रेलियन टीममध्ये ती बातच नाही. ‘कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये आहे’ या तत्वावर एकानं या टीममध्ये जागा अडवली आहे. ‘ब्रिस्बेनमध्ये या मग हरवतो’ अशी या टीमचे खेळाडू हवा करत होते. त्यांना भारतीय टीमनं पहिल्या इनिंगमध्ये बॅकफुटवर ढकललं आहे.

शार्दुल – ‘सुंदर’ प्रवास!

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) फक्त 21 वर्षांचा आहे. तो  तीन वर्षांपूर्वी शेवटचं लाल बॉलनं प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) खेळला आहे. तो तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मधील बॅटिंगमुळे ओळखला जातो. त्याला पूर्वीपासून बॅट्समन व्हायचं होतं, पण तो ऑफ स्पिनर बनला.

 आजही त्यानं त्याच्यातला बॅट्समन जिवंत ठेवला आहे. त्याच्या या बॅटिंग स्कीलवर विश्वास ठेवून विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीनं त्याला एका मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या आधी बॅटिंगला पाठवलं होतं. तो प्रयोग फसला. आज त्यानं पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये त्याचा बॅटिंगमधला दर्जा दाखवून दिला.

मुंबईकर शार्दुल ठाकूल (Shardul Thakur) या टेस्ट सीरिजसाठी सातव्या क्रमांकाचा बॉलर होता. यापूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्यानं समाधानकारक बॉलिंग केली. त्यानंतर सुरु झालेल्या या मोठ्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याला फक्त तीन मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचमध्ये संधी मिळाली.

आयपीएल आणि ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही ठिकाणी अवघड परिस्थितीमध्ये त्याला बॉलिंग करावी लागली. थ्रो बॉलर म्हणून तो या टेस्ट टीममध्ये होता. त्याला नेटमध्ये प्रॅक्टीस करताना अशी किती बॅटिंग मिळाली असेल? तरीही त्यानं त्याच्यातील खेळण्याची जिद्द कायम ठेवली. त्यामुळेच टीम इंडियाच्या कॅप्टनला ही इनिंग संपल्यानंतर ‘तुला परत मानलं रे ठाकूर’ अशी दाद द्यावी लागली.

‘नेट’ बॉलर्सनी दाखवलं ‘भोक’

सुंदर आणि शार्दुल हे दोघंही टेस्ट सीरिजसाठी नेट बॉलर होते. त्यांना सर्व प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं ब्रिस्बेनच्या टेस्ट टीमममध्ये अक्षरश: ढकलण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला ते सांगण्याची सोय नाही. कमिन्स, हेजलवुड, स्टार्क आणि लायन हे त्यांचे चारही प्रमुख बॉलर ही टेस्ट खेळत आहेत. यापैकी एकही टीमच्या बाहेर नाही.

ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर ही जोडी एकत्र आली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीमच्या डोळ्यासमोर मोठी आघाडी होती. यापूर्वीची ऑस्ट्रेलियन टीम ही संधी कोणत्याही परिस्थितीत सोडत नसे. ही टीम पेनची (Tim Pain)  ऑस्ट्रेलियन टीम आहे. या टीमला सलग दुसऱ्या टेस्टमध्ये भारताच्या शेवटच्या बॅटिंग करु शकणाऱ्या जोडीनं त्यांच्या कॅप्टनचं नाव दिलं. म्हणजेच ‘पेन’ दिला.

( वाचा : ‘होय, मी मुर्ख ठरलो’, सर्व बाजूनं अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची कबुली! )

शार्दुलनं घेतली शाळा, सुंदरनं केला विक्रम!

शार्दूल ठाकूरनं पॅट कमिन्सला (Pat Cummins) आल्या आल्या सिक्सर घेत त्याची शाळा घेतली. रोहित शर्मासारखा तो नॅथन लायन विरुद्ध फसला नाही. त्यानंतर त्यानं टेस्ट क्रिकेटमधील पहिली हाफ सेंच्युरी देखील झोकात पूर्ण केली.

वॉशिंग्टन सुंदरला ब्रिस्बेन टेस्टच्या दोन दिवस आधीपर्यंत आपण खेळू असं वाटलंही नसेल. तो आज 1911 नंतर ऑस्ट्रेलियात पदार्पणातील टेस्टमध्ये सातव्या क्रमांकावर येऊन हाफ सेंच्युरी करणारा पहिला बॅट्समन बनला आहे. परदेशात सातव्या क्रमांकावर पदार्पण करुन हाफ सेंच्युरी झळकवणारा तो राहुल द्रविड (Rahul Dravid) नंतरचा दुसरा बॅट्समन आहे.

शार्दुल-सुंदर जोडीनं 36 ओव्हर्स एकत्र बॅटिंग केली. टीम पेननं खराब DRS घेत त्याची परंपरा पुढं चालवली. त्यांनी सातव्या विकेटसाठी 123 रन्सची पार्टनरशिप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रन्सची आघाडी घेता आली. यापूर्वी इतिहासात दोन वेळा ऑस्ट्रेलियाच्या टीमनं पहिल्या इनिंगमध्ये भारतावर 33 रन्सची आघाडी घेतली आहे. त्या दोन्ही टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

ब्रिस्बेनमधील पुढील दोन दिवसांचं हवामान पाहता, भारतीय टीमचा एक हात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आहे. तर एक पाय आयसीसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC Test Championship) फायनलमध्ये आहे. या दोन्ही पैकी एकही गोष्ट झाली नाही तरी ही शार्दुल-‘सुंदर’ पार्टरनरशिप सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे, हे निश्चित.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: