फोटो – ट्विटर/@cheteshwar1

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये झालेली टेस्ट (Sydney Test) मॅच पाहून जास्त कोण दमलं हे सांगणं अवघड आहे. दिवसभर बॉलिंग आणि फिल्डिंग करुन ज्यांचा घाम निघालेली ऑस्ट्रेलियन टीम दमली. जखमी असताना दिवसभर किल्ला लढवणारे भारतीय बॅट्समन दमले.

त्याचबरोबर रात्रभर उद्या मॅचचा निकाल काय लागणार? याची ज्यांनी काळजी केली. दिवसभरातल्या कामं मॅनेज करुन ज्यांनी मॅच पाहण्याची कसरत केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ पाहिल्यावर ज्यांचा रक्तदाब (Blood Pressure) वाढला. भारतीय खेळाडूंना झालेल्या जखमा पाहून जे हळहळले. शेवटी मॅचचा रिझल्ट पाहिल्यावर हा सारा मानसिक ताण गेल्याचं समाधनान ज्यांना मिळालं, ते भारतीय फॅन्स दमले. हे सांगणं खरोखरच अवघड आहे.

टीम ‘पेन’ ची (Tim Paine) माणसं विरुद्ध ‘Men in Pain’ अशी ही लढाई होती. या लढाईत आपला विजय झाला. ‘Men in Pain’ मोडमधल्या टीम इंडियानं सिडनी टेस्ट ड्रॉ केली. अजिंक्य रहाणेच्या टीमसाठी हा निकाल विजयासारखा आहे.

पहिला धक्का, सकारात्मक उत्तर!

भारतीय टीम इतिहास रचण्यापासून 309 रन्स दूर आहे, असं ‘आम्ही’  रविवारच्या मॅच रिपोर्टमध्ये म्हंटलं होतं. पाचव्या दिवशी हे टार्गेट कोणत्याही टीमसाठी अवघड आहे. जखमी वॉर्ड झालेल्या टीम इंडियासाठी हे आणखी खडतर आव्हान होतं. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या भारताच्या सर्वात अनुभवी जोडीनं पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला. सकाळी लवकर अजिंक्य रहाणे आऊट झाला.

अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर हनुमा विहारीच्या (Hanuma Vihari) जागी ऋषभ पंतला (Rishabh Pant) बढती देण्यात आली. पंतनं पहिल्या दीड सत्रामध्ये (सेशन) आणि हनुमा विहारीनं नंतरच्या दीड सत्रामध्ये खेळ केला. त्यांचा हा खेळ एकत्र पाहिला तर हा एक सकारात्मक आणि नियोजनपूर्वक केलेला बदल होता, हे लक्षात येतं.

ऋषभ पंतवर सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी बॅटिंगला येताना दडपण होतं. त्यानं पहिल्या दिवशी विकेट किपिंगमध्ये माती केली होती. तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट किपिंग करु शकला नाही. हे सारं माग सारण्यासाठी या 23 वर्षाच्या खेळाडूकडून पुन्हा एकदा ‘व्वा पंत!’ इनिंगची गरज होती. ती त्यानं पूर्ण केली. पहिले 5 रन करण्यासाठी 33 बॉल घेणाऱ्या पंतनं नंतर हात मोकेळे केले. पंतनं ऑस्ट्रेलियावर प्रतिहल्ला चढवला. त्याच्या हल्ल्यामुळे टीम पेनला सतत बॉलर बदलावे लागले. नॅथन लायन या त्यांच्या सर्वात अनुभवी स्पिनरवर हल्ला चढवला. तसंच त्यानं मिचेल स्टार्कलाही सोडलं नाही. ‘फक्त कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये आहे’ या पात्रतेवर दोन वर्ष काढणाऱ्या टीम पेननं पंतचे दोन कॅच सोडून त्याला मदत केली.

चेतेश्वर पुजारानं पहिल्या इनिंगमध्ये 176 बॉलमध्ये 50 रन काढले होते. ती त्याची सर्वात स्लो हाफ सेंच्युरी होती. पुजारानं त्याच्या दुसऱ्या आणि मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये 77 रन काढण्यासाठी 205 बॉल घेतले. ही पुजाराची सर्वात लांब चौथ्या इनिंगमधील खेळी आहे. त्याच्या या लांब खेळीनं मॅच वाचली. पंतचा हल्ला आणि पुजाराचा संयम या दोन परस्पर विरोधी टोकाच्या शैलीनं टीम इंडियानं पाचव्या दिवशी दीड सेशन खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 148 रन्सची भागिदारी केली. टीम इंडियासाठी चौथ्या इनिंगमधील ही सर्वोच्च भागिदारी आहे.    

( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )

फोटो – व्हायरल

लक्ष्मण- द्रविड = विहारी = अश्विन

हे हेडिंग वाचून अतिशयोक्ती वाटेल. पहिल्या जोडीची आणि दुसऱ्या जोडीची तुलना एरवी शक्य नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण 11 जानेवारी 2021 हा दिवस वेगळा होता. 2001 च्या कोलकाता टेस्टमध्ये द्रविड-लक्ष्मणनं संपूर्ण दिवस खेळला होता. त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी विहारी – अश्विन जोडीनं निम्मा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशी ‘आम्ही सर्वस्व पणाला लावू हे अश्विनचे शब्द फक्त हेडलाईनसाठी नव्हते. तर ते अंत:करणापासून आले होते.

( वाचा : IND vs AUS: टीम इंडिया इतिहासापासून 309 रन दूर! )

अश्विन- विहारी जोडीनं 42.4 ओव्हर्स म्हणजे 256 वैध बॉल बॅटिंग करत 62 रन्सची पार्टरनरशिप केली. नॅथन लायननं 46 ओव्हर बॉलिंग केली. त्यांना सुरुवातीलाच नवा बॉल खेळावा लागला. पॅट कमिन्स आग ओकत होता. जोश हेजलवूडला रिव्हर्स स्विंगची मदत मिळत होती. ‘कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये आहे’ या तत्वावर खेळणारा टीम पेन हा स्लेजिंग करत होता. मॅथ्यू वेड त्यांच्या अंगावर थ्रो करत होता. सिडनी 2008 च्या टेस्टमधील बकनर आणि कंपनीची आठवण करुन देणारे अंपायर्स ऑस्ट्रेलियन टीमच्या ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’कडं दुर्लक्ष करत होते.

विहारीचे स्नायू दुखावले होते. अश्विनच्या अंगावर बॉल टाकत त्याला भाजून काढलं जात होतं. त्यांच्यानंतर एक हात फॅक्चर झालेला सहकारी ( रवींद्र जडेजा) बॅटिंगला येणार होता. ऑस्ट्रेलियाच्या घशात विजयाचा घास गेला होता. यापैकी कोणतीही एक गोष्टही आव्हानात्मक होती. अश्विन आणि विहारी जोडीनं ही सर्व आव्हानं एकत्र पेलली. त्यांनी सिडनी टेस्ट ड्रॉ केली.

सिडनीतील या खेळवर दिवसभरात अनेक लेख आले आहेत. सोशल मीडियावरही मंडळी चांगल्या पद्धतीनं व्यक्त झाली आहेत. जगातील सर्वात मोठा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं ट्विटरवर व्यक्त केलीली भावना आजच्या दिवसाचं सार सांगते.

सचिन तेंडुलकरचं हे ट्विट हीच ‘Cricket मराठी’ ची भावना आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) खेळ पाहून मोठा झालेल्या, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिकत असलेले त्याचे सर्व शिष्य सिडनीमध्ये खेळले. या शिष्यांनी द्रविडच्या वाढदिवशी त्याला गुरूदक्षिणा दिली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: