फोटो – ICC

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिज दोन टेस्टनंतर ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. मेलबर्न टेस्टनंतर आठ दिवसांच्या ब्रेक नंतर सिडनी (Sydney) टेस्ट सुरु झाली आहे. वार्षिक परीक्षेत काही पेपरनंतर गणिताच्या पेपरच्या तयारीसाठी मोठा ब्रेक द्यावा असा हा प्रकार होता. या सीरिजमधली फसलेली ‘गणितं’ सोडवून सिडनीतील ‘समीकरणं’ जुळवण्यासाठी  आठ दिवसांचा अवधी मिळाला.

ऑस्ट्रेलियाच्या टीमला सध्या पराभवाची जास्त धास्ती आहे. ऐकेकाळी दुसऱ्या देशांना त्यांच्या मैदानात हरवणारी ऑस्ट्रेलियन टीम आता ‘ब्रिस्बेनमध्ये भारतानं खेळवावं मग आम्ही हरवू’ अशी स्वप्न पाहत आहे. या टेस्टमध्ये त्यांनी दोन बदल केले. जो बर्न्स आणि ट्रेविस हेड या दोघांना काढून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि विल पुकोव्हस्की (Will Puckovski) यांना टीममध्ये घेतलं. 1985 -86 च्या न्यूझीलंड सीरिजनंतर (AUS vs NZ) पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियानं एका मालिकेत चार ओपनर्स वापरले आहेत. पहिल्या दोन टेस्टमध्ये प्रमुख बॉलर्सच्या दुखापतीनंतरही झुंजणाऱ्या भारतीय बॉलर्सच्या दहशतीचा हा परिणाम आहे.

वॉर्नरचा ‘फिटनेस’ उघड!

बॉर्डर-गावस्कर सीरिजमध्ये यंदा पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नर खेळला. त्यामुळे ‘मागच्या सीरिजमध्ये आमचे स्मिथ-वॉर्नर नव्हते’. या ऑस्ट्रेलियन रडगाण्यातील उत्तरार्ध आता बंद झाला आहे. डेव्हिड वॉर्नर शंभर टक्के फिट नाही हे त्याचं ‘रनिंग बिटविन द विकेट’ पाहताना जाणवत होते. मोहम्मद सिराजचे (Mohammed Siraj) दोन बॉल सलग निर्धाव (मेडन) खेळल्याचं प्रेशर त्याला भोवलं आणि तो चेतेश्वर पुजाराकडं कॅच देऊन 5 रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियातील टेस्ट मॅचमध्ये तब्बल 1517 दिवसांनी पहिल्यांदाच दोन अंकी रन करण्यात वॉर्नरला सिराजमुळे अपयश आलं.

( वाचा : क्रिकेटमधील मोजकेच दिवस शिल्लक असल्याची डेव्हिड वॉर्नरची कबुली! )

पाऊस आणि पंतनं ओतलं ‘पाणी’

डेव्हिड वॉर्नर आऊट झाल्यानंतर भारतीय बॉलर्सना मॅचवर पकड घेण्याची संधी होती. मात्र सुरुवातीला ती पावासानं मिळू दिली नाही. पावसामुळे पहिल्या दिवसाचा 35 ओव्हर्सचा खेळ वाया गेला. त्यानंतर भारताचा विकेटकिपर ऋषभ पंतच्या (Rishabah Pant) खराब किपींगचा टीमला फटका बसला.

ऋषभ पंतनं सिडनीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीची जवाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे त्यानं सुरुवातीला आर. अश्विनच्या (R. Ashwin) बॉलिंगवर पुकोव्हस्कीचा सोपा कॅच सोडला. त्यावेळी तो 26 रन्सवर खेळत होता.

आर. अश्विनला निराश केल्यानंतर पंतनं मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर पुकोव्हस्कीचा कॅच सोडला. सिराजचा बॉल पुकोव्हस्कीच्या बॅटला लागून हवेत उंच उडाला. पंतनं मागे सूर मारत तो पकडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बॉल हातातून निसटला. पंतनं पुन्हा एकदा प्रयत्न केला पण त्याला यश मिळाले नाही.

अखेर पुकोव्हस्कीला भारताकडून सिडनी टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीनं (Navdeep Saini) 62 रन्सवर आऊट केलं. त्यापूर्वी त्यानं टेस्ट क्रिकेटमधील पहिल्याच इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. त्याचबरोबर मार्नस लबुशेन (Marnus Labuschange) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 100 रन्सची पार्टरनरशिप केली. या मालिकेत एकदाही 200 च्या पुढं न गेलेल्या ऑस्ट्रेलियन टीमसाठी ही पार्टरनरशिप महत्वाची आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियाचे पहिले पन्नास रन्स करण्यासाठी 140 बॉल्स घेतले. त्यानंतर स्थिर झाल्यावर पुढचे पन्नास रन्स 58 बॉल्समध्ये पूर्ण केले.

पुकोव्हस्की-लाबुशेन पार्टरनरशिपनं स्टीव्हन स्मिथला (Steve Smith) देखील वेळ दिला. स्मिथला अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळाला. सतत क्रिकेटचा विचार करणाऱ्या स्मिथनं त्याच्या बेडरुममध्ये डोळ्यासमोर आणलेला खेळ मैदानातही केला. या मालिकेत त्यानं पहिल्यांदाच चौकार लगावला. पहिल्यांदाच दोन आकडी रन केले. स्मिथ दिवसअखेर 31 रन्सवर नाबाद आहे. तर, या मालिकेत सातत्यानं चांगली सुरुवात केल्यानंतर मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरलेला त्याचा शिष्य लबुशेन 67 रन्सवर त्याला साथ देत आहे.

( वाचा : आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर! )

सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी नव्या जोमानं मैदानात उतरण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. भारताविरुद्ध या सीरिजमध्ये न चाललेल्या स्मिथला आणि ऑस्ट्रेलियन टीमला झटपट गुंडाळण्यात भारताला यश आलं तर चौथ्या इनिंगमध्ये खेळण्याचा भारतावरचा दबाव दुसऱ्या दिवशी थोडा कमी होईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: