फोटो – ट्विटर/@cricketcomau

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये (Sydney) सुरु असलेल्या टेस्टमधील दुसरा दिवस दोन्ही टीमसाठी संमिश्र ठरला. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियन टीमनं सर्वोच्च स्कोअर केला. दोन टेस्टमध्ये फेल गेलेल्या स्टीव्हन स्मिथनं (Steve Smith) सेंच्युरी लगावली. ऑस्ट्रेलियाचा 2 आऊट 206 असा स्कोअर असतानाही टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पुढच्या आठ विकेट्स 106 रन्समध्ये घेतल्या. त्याचबरोबर सावध सुरुवात करत मॅचमध्ये कमबॅक केलं.

सर रवींद्र जडेजा!

मार्नस लाबुशेन (Marnus Labuschange) आणि स्टीव्हन स्मिथ (Steven Smith ) या जोडीनं दुसऱ्या दिवशी सकाळी शांतपणे आत्मविश्वासानं खेळायला सुरुवात केली. पावसाचा थोडा अडथळा आला, पण तरीही त्यांची जोडी सेट झाली होती. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं एकदाही पार न केलेला 200 चा आकडा त्यांनी दोन विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केला. मोठी सेंच्युरीची सवय असलेला आणि याच मैदानात न्यूझीलंड विरुद्ध मागच्या वर्षी डबल सेंच्युरी झळकावलेल्या लाबुशेन 90 च्या पुढं गेला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या मदतीला रवींद्र जडेजा धावला. जडेजानं पहिल्या दिवशी तीन ओव्हरच बॉलिंग केली होती. त्याचा दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) पूर्ण वापर केला. जडेजाच्या बॉलिंगवर राहाणेनं एक शार्प कॅच घेत लाबुशेनला परत पाठवलं.

लाबुशेन आऊट झाल्यानंतर ‘भारताला ब्रिस्बेनमध्ये या’ अशी आव्हानात्मक भाषा करणारा मॅथ्यू वेड (Matthew Wade) खेळायला आला. रवींद्र जडेजाला आव्हान देण्याच्या नादात त्याचं ब्रेन फेड झालं आणि तो 12 रन्सवर आऊट झाला. मेलबर्नप्रमाणे इथंही तो स्पिनर्सवर हल्ला चढवण्याच्या नादात आऊट झाला.

( वाचा : स्मिथला कॅप्टन केले तर टीम चांगला खेळ करेल, ऑस्ट्रेलियाच्या व्हाईस कॅप्टनचं मत )

वेड आऊट झाल्यानंतर स्मिथनं मॅचची सूत्र हातामध्ये घेतली. बुमराहनं कॅमेरुन ग्रीन आणि टीम पेनला आऊट केलं. पण तरीही स्मिथ खेळत होता. स्मिथनं त्याची टेस्ट क्रिकेटमधील 27 वी सेंच्युरी 201 बॉल्समध्ये 13 फोरच्या मदतीनं पूर्ण केली. स्मिथनं 16 महिन्यानंतर टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली आहे. तर ऑस्ट्रेलियात तीन वर्षांनी सेंच्युरी झळकावण्यात त्याला यश आलं. बाजूला विकेट पडत असतानाही स्मिथ खेळत होता. त्याला आऊट करणं भारतीय बॉलर्सला अवघड होत होतं. त्या परिस्थितीमध्ये ‘सर रवींद्र जडेजा फिल्डर म्हणून टीमच्या मदतीला धावले. त्यांनी एक अविस्मरणीय असा थेट थ्रो केला आणि स्मिथला आऊट करत ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 338 रन्सवर संपवली.

    शुभमन गिलनं केलं प्रभावित

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) ही जोडी पहिल्यांदाच भारतासाठी टेस्टमध्ये ओपनिंग करण्यासाठी उतरली होती.  हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र खेळत होते. त्यांनी सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) च्या खेळपट्टीवर (पिच) वानखेडे सारखा खेळ केला. दोन महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहितनं ऑस्ट्रेलियाच्या फास्ट त्रिकुटाचा चांगला सामना केला. नॅथन लायनला सिक्सर खेचला. या सिक्सरसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100  सिक्सर लगावणारा रोहित हा पहिला बॅट्समन बनला.

( वाचा : Explained: रोहित शर्माच्या एन्ट्रीचा टीम इंडियाला कसा होणार फायदा? )

रोहितसोबत खेळत असलेल्या शुभमन गिलनं आत्मविश्वासानं खेळ केला. मेलबर्न टेस्टमधील पहिल्या इनिंगसारखं त्याला इथं जीवदानाची मदत मिळाली नाही. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी त्याला आखुड टप्प्याचे (शॉर्ट लेंथ) बॉल टाकले गिलनं त्याचा आदर केला. योग्य वेळी त्याचा ट्रेडमार्क असलेला बॅकफुट फोरही लगावाला.

गिल 50 रन्स काढून आऊट झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं उरलेल्या 12.5 ओव्हर्समध्ये फक्त 11 रन्स काढले. टेस्ट क्रिकेट ही संयमाची परीक्षा असते. आता तिसऱ्या दिवशी कोणती टीम अधिक संयम दाखवते त्यावरच या टेस्टचं आणि कदाचित सीरिजचही भवितव्य निश्चित होणार आहे.    

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: