फोटो – ट्विटर

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यापूर्वीच (India Tour of Australia) वेगवेगळी भाकितं करण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंची जुनी सवय आहे. या सीरिजपूर्वी आणि विशेषत: पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी अनेक भाकितं केली होती. टीम इंडियानं मेलबर्नमधील ‘बॉक्सिंग डे’ (Boxing Day) टेस्ट जिंकत या दिग्गजांची बोलती बंद केली आहे.

शेन वॉर्न (Shane Warne)

ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) हा रिटायमेंटनंतरही वाचाळपणासाठी प्रसिद्ध आहे. पहिल्या टेस्टमध्ये त्यानं चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडिया पराभूत झाली आणि वॉर्न आणखी चेकाळला. मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियाचा फडशा पाडेल असं भविष्य वॉर्ननं केलं होतं.

( वाचा : ‘टेस्ट क्रिकेट कसं खेळायचं?’, शेन वॉर्न आणि स्टीव्हन स्मिथ यांची परस्पर विरोधी मतं )

मार्क वॉ (Mark Waugh)

ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर. त्यांचा एकेकाळचा खडूस कॅप्टन स्टीव्ह वॉ  (Steve Waugh) चा जुळा भाऊ असलेला मार्क सध्या निवड समिती सदस्य आहे. अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाची दुसरी  इनिंग 36 रन्सवर संपुष्टात आल्यानंतर ‘मार्क वॉ’ ने टीम इंडियाला किरकोळात काढलं होतं.

“अजिबात शक्यता नाही. अ‍ॅडलेडमध्ये ते (टीम इंडिया) जिंकू शकत होते. विराट कोहली ती टेस्ट खेळत होता. माझ्या मते तेथील परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल होती. मला आता वाटत नाही, ते कमबॅक करतील. पहिली टेस्ट तीन दिवसांमध्ये हरल्यानंतर तर अजिबात नाही.’’ असा ठाम दावा मार्क वॉ नं मेलबर्न टेस्टपूर्वी केला होता. प्रत्यक्षात मेलबर्न टेस्टमध्ये टीम इंडिया नाही तर मार्क वॉ ची ऑस्ट्रेलियाची टीम चार दिवसांमध्ये पराभूत झाली आहे.

( वाचा : Explained: मेलबर्न टेस्टमधील भारताचा विजय का खास आहे? )

रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन. महान खेळाडू असलेला रिकी पॉन्टिंग मॅच जिंकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे किमान भारतीयांना तरी वेगळं सांगण्याची गरज नाही. पॉन्टिंगनंही मार्क वॉ प्रमाणेच ऑस्ट्रेलिया भारताला व्हाईटवॉश देईल असा अंदाज व्यक्त केला होता.

“ही क्लीन स्वीप साठी चांगली संधी आहे. मेलबर्नमध्येही आपल्याला निकाल मिळेल अशी आशा करु या. आपण त्यामध्ये यशस्वी झालो तर भारताला सीरिजमध्ये कमबॅक करणे अतिशय अवघड होईल,’’ असं पॉन्टिंग मेलबर्न टेस्टपूर्वी म्हणाला होता. पॉन्टिंगचा त्याच्या देशाच्या टीमनं  मेलबर्नमध्ये अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे आता पॉन्टिंग ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरच भडकला आहे.

( वाचा : जस्टीन लँगरचा जीव वाचवण्यासाठी पॉन्टिंग इनिंग घोषित करणार होता! )

भारताच्या पराभवाचं भाकित करणाऱ्या खेळाडूंचे दात घशात गेल्यानंतर सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल करण्यात आले.

मायकल वॉन (Michael Vaughan)

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन त्याच्या वक्तव्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. ‘टीम इंडिया या सीरिजमधील सर्व टेस्ट हरणार’ अशी भविष्यवाणी वॉननं केली होती. पहिल्या टेस्टमधील ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर त्यानं त्याची तातडीनं आठवण करुन दिली होती. मेलबर्नमध्ये वॉनला देखील टीम इंडियानं खेळातून उत्तर दिले.

( वाचा : अजिंक्य रहाणेच्या अविस्मरणीय सेंच्युरीवर जळणाऱ्या ब्रिटीश मीडियाला वासिम जाफरने दिलं खणखणीत उत्तर! )

टीम इंडियानं खेळातून उत्तर दिलं. त्याचबरोबर भारताचा माजी ओपनर वासिम जाफरनं (Wasim Jaffer) त्याचा ट्विटरवरही समाचार घेतला.

मायकल वॉन अजूनही ऑस्ट्रेलिया ही सीरिज 3-1 नं जिंकेल असा दावा करत आहे. वॉनचं हे भाकित देखील टीम इंडियाचा मेलबर्नमधला खेळ पाहात धोक्यात आले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: