फोटो – Mumbai Indians/ICC

रहस्यमय पुस्तक, सिनेमा किंवा वेब सीरिजची कथा, फँटसी विश्व या सर्वांवर मात करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये आहे. लांबलचक दौरा, जवळपास अर्ध वर्ष घराबाहेर दूर, कोरोनाची भीती, बायो बबलमध्ये राहिलेले खेळाडू, लज्जास्पद नामुष्की, दुखापती, शिवीगाळ आणि सर्वात शेवटी ‘ब्रिस्बेनमध्ये या मग बघू’ ही धमकी….

या सर्व संकटानंतर 32 वर्षांचा इतिहास, पावसाची शक्यता, खेळपट्टीच्या (पिच) भेगा, नंबर 1 टेस्ट बॉलर, स्वयंघोषित नंबर 1 टेस्ट अटॅक, ‘Verbal Diarrhea’ झालाय असं वाटावं या स्तरावर जाऊन बडबड करणारे कॉमेंट्रेटर्स, मालिकेतील शेवटची टेस्ट शेवटचा दिवस, शेवटचे सत्र, शेवटच्या काही ओव्हर्स हे सर्व पार केल्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजचा शेवट काय झाला? – ‘होय आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!’

( वाचा : ब्रिस्बेन टेस्ट: विराट कोहलीच्या जन्मावेळी जे घडलं, ते त्याच्या मुलीच्या जन्मानंतरही होणार? )

पाचव्या दिवशी काय-काय घडलं?

ऑस्ट्रेलिया विराट कोहलीच्या (Virat Kohli) जन्मावेळी म्हणजेच नोव्हेंबर 1988 मध्ये शेवटचं ब्रिस्बेनमध्ये हरलं होतं. 32 वर्ष आणि 11 हजार दिवसांपेक्षा जास्त इतिहासाचं ओझं हे भारतीय टीमवर नाही तर भारतीय फॅन्सवर जास्त होतं, अशी पाचव्या दिवशी सकाळी परिस्थिती होती.

भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) लगेच आऊट झाला. शुभमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या बाजूनं सेट होऊन खेळत होता. पाचवा दिवस, ब्रिस्बेनचं मैदान, 300 पेक्षा जास्त टार्गेट यापैकी कशाचाही गिलवर परिणाम झाला नाही. गिलनं मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) एकाच ओव्हरमध्ये 20 रन काढले. आपण भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज पाहत आहोत की सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा (Syed Mushtaq Ali Trophy 2021) अशी शंका निर्माण व्हावी या पद्धतीनं गिल खेळत होता.बरं, हे सर्व कुठं ऑस्ट्रेलियात. जिथं बाऊंड्री लाईन जितकी लांब असते तेवढ्या वेळात माणूस दादरवरुन माहीमला जाईल.

( वाचा : Brisbane Test: शुभमन गिलची सेंच्युरी हुकली पण गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! )

पुजारा झाला पाया!

शुभमन गिल खेळत असताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) एक बाजू खंबीरपणे लावून उभा होता. खरं तर पुजारानं एक बाजू खंबीरपणे लावून धरली होती, म्हणूनच गिल मुक्तपणे खेळू शकत होता. पुजारनं सिडनी प्रमाणे ब्रिस्बेन टेस्टमध्येही चौथ्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. गिलच्या हाणामारीमुळे दमलेल्या ऑस्ट्रेलियन बॉलर्सना अक्षरश: हतबल करण्याचं काम पुजारानं केलं.

 पुजारानं या सीरिजमध्ये 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया सीरिजसारख्या दोन सेंच्युरी झळकावल्या नाहीत.  त्यानं तब्बल 928 जास्त बॉल खेळले. पहिल्या टेस्टमध्ये 36 रन्सवर ऑल आऊट झालेल्या भारतीय टीमनं त्यानंतर सर्व इनिंगमध्ये दीर्घ काळ बॅटिंग केली. त्यामध्ये पुजारानं रचलेल्या या पायाचा खंबीर वाटा आहे. आयपीएल आणि T20 क्रिकेटच्या झगमगटामध्येही एक खेळाडू या प्रकारे स्वत:ला गाडून घेऊन खेळतो, हे खास आहे. त्यामुळेच टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकून परत येत आहे.

( वाचा : चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार! )

पंत झाला कळस!

ऋषभ पंत (Rishabh Pant) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याची तुलना थेट महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) केली गेली. त्याचं वय, अनुभव त्याला मिळालेल्या संधी यापैकी कशाचाही विचार झाला नाही. त्याच्या खराब विकेट किपिंमुळे टीकाकारांना आयतं कोलित मिळालं. आयपीएलमधील खराब फॉर्ममुळे ते आणखी चेकाळले. त्यांनी पंतचं पार्सल पॅक करण्याची भाषा सुरु केली होती.

पंतच्या ऑस्ट्रेलिया सीरिजमधील खेळानं यापैकी काही जण तरी सुधारतील अशी आशा आहे. उरलेले काही किमान आणखी काही दिवस तरी शांत बसतील, अशी व्यवस्था झाली आहे. ब्रिस्बेनमध्ये एकवेळ होती तेंव्हा शेवटच्या 20 ओव्हर्समध्ये 100 रन हवे होते. नवा बॉल होता. समोर चार अव्वल बॉलर्स होते. ऑस्ट्रेलियातील टेस्टमध्ये आपली टीम तर एकेकाळी मायकेल क्लार्कच्या बॉलिंगवरही गंडली होती.

पंत हा नव्या दमाचा आणि नव्या विचाराचा खेळाडू आहे. त्याला या प्रकारच्या इतिहासानं काही फरक पडत नाही. तो दिल्लीचाच असल्यानं ऑस्ट्रेलियन्स फॅन्सना कदाचित वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) नातेवाईकही वाटू शकतो. सेहवाग आणि पंतचं रक्ताचं नातं नसेल, पण त्यांच्या बॅटिंगचा रक्तगट एकच आहे.

( वाचा : IND vs AUS: शार्दुल ‘सुंदर’ खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा ‘ टीम पेन’ )

पंतनं शेवटच्या सत्रामध्ये मॅच नियंत्रणाबाहेर जाऊ दिली नाही. आयुष्यातील पहिली टेस्ट खेळणाऱ्या 21 वर्षांच्या वॉशिंग्टन सुंदरनं (Washington Sundar) त्याला चांगली साथ दिली. सुंदरच्या बॅटिंगनं या टेस्टमध्ये तरी कुठंही रवींद्र जडेजाची कमतरता जाणवली नाही.

1988 आणि 2021

ऑस्ट्रेलियानं ब्रिस्बेनमध्ये यापूर्वीची शेवटची टेस्ट 1988 साली हरली होती. ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या त्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये ग्रिनीच, हेन्स, रिचर्डसन, रिचर्ड्स, हूपर, लोगी,  दुजाँ, मार्शल, अ‍ॅम्ब्रोज, वॉल्श आणि पॅटरसन हे 11 खेळाडू होते. या टीममधला प्रत्येक खेळाडू महान होता. त्यांच्याकडं भक्कम इतिहास होता.

यंदा ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणारी टीम महान आहे. या टीममधल्या नव्या पोरांनी स्मिथ आणि वॉर्नरसह खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमला त्यांच्याच देशात अगदी त्यांच्या ब्रिस्बेनमध्ये जाऊन पाणी पाजलं.

ही 21 व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट सीरिज होती. 2005 मधील अ‍ॅशेस किंवा अन्य कोणत्याही सीरिजपेक्षा सर्वोत्तम. टीमवरील सर्व संकटांनंतरही या सीरिजचा निकाल काय लागला?, ‘होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading