फोटो – ट्विटर / BCCI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मेलबर्नमध्ये झालेली पहिली टेस्ट टीम इंडियानं (Team India) 8 विकेट्सनं जिंकली. अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) झालेल्या पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर भारतानं हा विजय मिळवत 4 टेस्टच्या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मेलबर्नमधील भारताच्या विजयाचे शिल्पकार कोण आहेत पाहूया…

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

या टेस्टपूर्वी टीम इंडियाला सर्वांनी मोडीत काढलं होतं. ऐतिहासिक नामुष्कीनंतर पुढची टेस्ट खणखणीत जिंकणाऱ्या कोणत्याही कॅप्टनला विजयाचं श्रेय हे सर्वात प्रथम द्यायला हवं. अजिंक्य रहाणेनं हे श्रेय कॅप्टनसी आणि बॅटिंग या दोन्ही प्रकारामध्ये मिळवलं आहे.

रहाणेनं सुरुवातीपासूनच पाच बॉलर्सचा आग्रह धरला. मेलबर्नमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादव (Umesh Yadav) जखमी झाल्यानंतर त्याच्या या आग्रहाचं मोल जाणवले. पहिल्या इनिंगमध्ये अश्विनकडे लवकर बॉल देणे, लबुशेन-हेड जोडी जमल्यावर बुमराहला बॉलिंग, सिराजचा वापर, रन आऊट झाल्यानंतर जडेजाचं केलेलं सांत्वन प्रत्येक बाबतीत रहाणेनं त्याच्यातील उत्तम कॅप्टनचं दर्शन जगाला दाखवलं.

( वाचा : IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’ )

रहाणे फक्त कॅप्टन म्हणून थांबला नाही, तर त्यानं बॅटिंगमध्येही कमाल केली. 2020 या वर्षात टीम इंडियाकडून एकमेव टेस्ट सेंच्युरी अजिंक्य रहाणेनं झळकावली आहे. संपूर्ण टीमला सर्वात जास्त गरज होती तेंव्हा रहाणेनं ही सेंच्युरी झळकावली. भारताच्या 2003-04 च्या दौऱ्यामधील पहिल्याच ब्रिस्बेन (Brisbane) टेस्टमध्ये तेंव्हाचा कॅप्टन सौरव गांगुलीनं 134 रन्सची खेळी केली होती. गांगुलीच्या त्या सेंच्युरीनं संपूर्ण सीरिजची दिशा बदलली होती. रहाणेची ही सेंच्युरी देखील याच गटातील आहे.

( वाचा : संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स! )

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजानं पहिल्या इनिंगमंध्ये मॅथ्यू वेडचा मस्त कॅच घेतला आणि टीमच्या फिल्डिंगमध्ये जीव आला. टीमचा उत्साह वाढवणारी ही गोष्ट जडेजाच्या कॅचनं शक्य झाली. त्यानंतर त्याने रहाणेसोबत पहिल्या इनिंगमध्ये 112 रन्सची पार्टरनरशिप केली. जडेजाच्या ‘ऑल राऊंड’ कौशल्यावर टीमनं मोठा विश्वास दाखवला होता. जडेजा मेलबर्नमध्ये त्या विश्वासाला पात्र ठरला आहे. या टेस्टमध्ये रहाणेशिवाय 50 रन करणारा एकमेव बॅट्समन जडेजा आहे. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं 2 विकेट्स घेत टीमच्या विजयात ‘ऑल राऊंड’ कामगिरी केली आहे.

बुमराह – अश्विन (Jasprit Bumrah, R. Ashwin)

भारताच्या बॉलिंगचे दोन आधारस्तंभ. इशांत शर्मा आणि शमी जखमी झाल्यानंतर भारतीय बॉलिंगची सर्व धुरा ही बुमराह-अश्विन जोडीवर आली आहे. भारतामधल्या सपाट पिचवर ते नेहमीच धोकादायक ठरतात. मेलबर्नच्या फास्ट पिचवरही ते ऑस्ट्रेलियन बॉलर्सपेक्षा जास्त धोकादायक ठरले.

अश्विननं पहिल्या इनिंगममध्ये तर बुमराहनं दुसऱ्या इनिंगमध्ये स्मिथला अक्षरश: ‘मामा’ बनवला. ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा जीव स्मिथच्या बॅटमध्ये आहे. स्मिथ आऊट झाल्यावर त्यांनी फक्त वेळ घालवणारी रटाळ बॅटिंग केली. ही रिकी पॉन्टिंगचा वारसा सांगणारी टीम आहे की, चंदरपॉल-जिमी अ‍ॅडम्सचा वारसा सांगणारी टीम? हा प्रश्न पडावा इतकी रटाळ बॅटिंग टीम पेन (Tim Paine) च्या टीमनं केली. मेलबर्नच्या दोन्ही इनिंगमध्ये एकाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनला हाफ सेंच्युरी करता आली नाही, याचं मोठं श्रेय बुमराह- अश्विन जोडीला आहे.

शुभमन गिल – मोहम्मद सिराज (Shubman Gill , Mohammed Siraj)

या दोन्ही खेळाडूंच्या टेस्ट कारकीर्दीचा श्रीगणेशा मेलबर्नमधील विजयानं झाला. ही आठवणही त्यांना आयुष्यभर पुरणारी आहे. गिल आणि सिराज हे दोघं तेवढ्यावरच थांबले नाहीत. सिराजच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिराज वडिलांच्या अंत्यदर्शनालाही भारतामध्ये गेला नाही. सिराजनं वडिलांचं स्वप्न तर पूर्ण केलंच. त्याचबरोबर अ‍ॅडलेडच्या पराभवाचा बदला लगेच पुढच्याच टेस्टमध्ये चुकवण्यात यावा या भारतीयांच्या स्वप्नातही हातभार लावला. सिराजनं या टेस्टमध्ये एकूण पाच विकेट घेतल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगचा टॉप स्कोअरर मार्नस लाबुशेन आणि दुसऱ्या इनिंगचा टॉप स्कोअरर कॅमेरुम ग्रीनचा समावेश आहे.

( वाचा : ‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज! )

शुभमन गिलचं बहुप्रतीक्षित टेस्ट पदार्पण अखेर मेलबर्नमध्ये झालं. पृथ्वी शॉचं अपयश, टीमची अवस्था हे पाहता त्याच्याकडच्या अपेक्षा आणि दडपण दोन्ही वाढलं होते. हा सर्व दबाव त्यानं पहिल्या टेस्टमध्ये तरी सहन केला. पहिल्याच दिवशी शेवटच्या सेशनमध्ये त्यानं आत्मविश्वासानं बॅटिंग केली. त्याच्या 45 रन्सच्या पहिल्या इनिंगमध्ये तो कुठेही अडखळला नाही. भारताच्या दुसऱ्या आणि टेस्टमधील चौथ्या इनिंमध्येही त्यानं आव्हानात्मक परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग केली. मयांक-पुजारा झटपट आऊट झाले होते. त्यावेळी भारताच्या ताब्यातून विजय निसटणार नाही, याची काळजी गिलनं घेतली.

टीम इंडियाचा 2020 मधील एकमेव टेस्ट विजय आहे. या टेस्टसारखी कामगिरी सुरु राहिली तर या वर्षातला एकमेव विजय 2021 मधील अनेक विजयांची नांदी ठरु शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: