
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसरी टेस्ट सिडनीमध्ये (Sydney) सुरु झाली आहे. सिडनी हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्ननंतरचे महत्वाचे ग्राऊंड. फास्ट बॉलर्सप्रमाणे बॅटिंगलाही साथ देणाऱ्या या मैदानाशी भारतीय क्रिकेट फॅन्सच्या काही खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
सचिन – शेन वॉर्नची पहिली चकमक
शेन वॉर्ननं (Shane Warne) टेस्ट क्रिकेटमध्ये सिडनीमध्येच पदार्पण केलं. पाच टेस्टच्या त्या सीरिजमधील तिसरी टेस्ट सिडनीमध्ये होती. यापूर्वीच्या दोन्ही टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलियाकडे 2-0 अशी भक्कम आघाडी होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना डेव्हिड बूनच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 313 रन्स काढले.
टीम इंडियाची पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात खराब झाली. एका बाजूनं विकेट्स जात असताना रवी शास्त्री (Ravi Shastri) दुसऱ्या बाजूला मैदानात पाय रोवून उभे होते. अखेर रवी शास्त्रीच्या मदतीला मुंबईकर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आला. शास्त्री- सचिन जोडीनं पाचव्या विकेट्ससाठी 196 रन्सची भक्कम पार्टरनरशिप केली. शास्त्रीनं 206 तर सचिन तेंडुलकरनं नाबाद 148 रन्स काढले. ऑस्ट्रेलियामध्ये सचिनची ती पहिली टेस्ट सेंच्युरी होती.
( वाचा : Explained: नवदीप सैनीची सिडनी टेस्टसाठी अंतिम 11 मध्ये निवड का झाली? )
शेन वॉर्नला त्या टेस्टमध्ये चांगलाच घाम गाळावा लागला. त्याला तब्बल 150 रन्स मोजून रवी शास्त्रीची एकमेव विकेट मिळाली. शास्त्री-सचिनच्या खेळीमुळे टीम इंडियाने ती टेस्ट ड्रॉ राखण्यात यश मिळवलं. सिडनी टेस्ट ड्रॉ झाल्याने पाच टेस्टच्या सीरिजमधील टीम इंडियाचा व्हाईट वॉश टळला.
व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा उदय
टीम इंडियाला 1999-2000 च्या दौऱ्यात सिडनी टेस्टमध्ये व्हाईटवॉश टाळण्यात अपयश आलं. त्या दौऱ्यातील तिसरी आणि शेवटची टेस्ट सिडनीमध्ये होती. ती टेस्ट ऑस्ट्रेलियाने एक इनिंग आणि 141 रन्सने दणदणीत जिंकली. पुढील काळात ऑस्ट्रेलियाचा कोच बनलेल्या जस्टीन लँगरने (Justin Langer) त्या टेस्टमध्ये पहिली डबल सेंच्युरी ठोकली. रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) दणकेबाज शतक ठोकत नाबाद 141 रन्स काढले.
402 रन्सची पिछाडी भरुन काढण्याच्या उद्देशानं टीम इंडिया तिसऱ्या इनिंगमध्ये मैदानात उतरली. टीम इंडियाला 261 पर्यंतच मजल मारता आली. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनं (V.V.S. Laxman) त्या इनिंगमध्ये एकाकी झुंज देत पहिलीच टेस्ट सेंच्युरी झळकावली. लक्ष्मणनं 167 रन्स काढले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्चस्व गाजवणाऱ्या ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणचा सिडनीच्या मैदानात उदय झाला.
( वाचा : मेलबर्न टेस्टमध्ये यापूर्वी कुणीही केले नव्हते ‘ते’ वीरेंद्र सेहवागने केले! )
स्टीव्ह वॉ ची शेवटची टेस्ट
2002-03 च्या दौऱ्यातील चौथी आणि शेवटची टेस्ट सिडनीमध्ये होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरीत होते. सिडनी जिंकून ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचा इतिहास करण्याची टीम इंडियाला संधी होती. तर स्टीव्ह वॉ (Steve Waugh) च्या कारकीर्दीतील शेवटची टेस्ट असल्याने कांगारु कॅप्टनला विजयी निरोप देण्याच्या निर्धारानं उतरले होते.
टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 आऊट 705 रन्सचा डोंगर उभा केला. सिडनीच्या मैदानावरची ती आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. सचिननं नाबाद 241 रन्स काढले. त्या लक्ष्मणनं 178 रन्स काढत भक्कम साथ दिली. आता टेस्ट वाचवण्याचं सर्व दडपण ऑस्ट्रेलियावर होतं.
ऑस्ट्रेलिया पहिल्या इनिंगमध्ये ते दडपण पेलू शकले नाहीत. सायमन कॅटिचनं सेंच्युरी झळकावली खरी पण त्यांना फॉलोऑन टाळता आला नाही. टीम इंडियानं बॉलर्सना विश्रांती देण्यासाठी ‘फॉलो ऑन’ दिला नाही. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 443 रन्सचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाची 4 आऊट 196 अशी अवस्था झाली असताना शेवटची टेस्ट खेळणाऱ्या स्टीव्ह वॉ ने सायमन कॅटिचच्या मदतीने पराभव टाळला. शेवटच्या टेस्ट इनिंगमध्ये वॉ ने 80 रन्स काढले. आपल्या कॅप्टनला सीरिज जिंकून निरोप देण्याचं ऑस्ट्रेलियन टीमचं स्वप्न पूर्ण झालं नाही.
( वाचा : पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव! )
‘विराट’ पर्वाचा प्रारंभ!
2014-15 मधील सिडनी टेस्टपूर्वी महेंद्रसिंह धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यामुळे विराट कोहली टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून सिडनीच्या मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या सेंच्युरीच्या जोरावर 7 आऊट 572 असा भक्कम स्कोअर उभा केला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या विराटने सेंच्युरी झळकावली. विराटने 147 रन्स काढले. त्याला के.एल. राहुलने 110 रन्स काढत उत्तम साथ दिली. विराट-राहुलच्या सेंच्युरीमुळे टीम इंडियाने 475 पर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या इनिंगमध्ये झटपट बॅटिंग करत टीम इंडियासमोर 349 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झालेल्या मुरली विजयनं दुसऱ्या इनिंगमध्ये जबाबदारीनं खेळ केला. विजयनं 80 रन्स काढले. अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारनं शेवटच्या टप्प्यात खंबीरपणे खेळ करत सिडनी टेस्ट ड्रॉ केली.
( वाचा : NZ vs PAK: केन विल्यमसननं डॉन ब्रॅडमन यांना टाकलं मागं, पाकिस्तानी बॉलर्सनी ओलांडल्या स्वैरपणाच्या मर्यादा! )
टीम इंडियानं टेस्ट सीरिज जिंकली!
टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याचे स्वप्न 2018-19 च्या सिडनी टेस्टमध्ये पूर्ण झाले. सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियाकडे 2-1 अशी आघाडी होती. संपूर्ण सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) 193 रन्स काढले. ऑस्ट्रेलियात पहिलीच सीरिज खेळणाऱ्या ऋषभ पंतनंही (Rishabh Pant) सेंच्युरी झळकावत 189 बॉल्समध्ये नाबाद 159 रन्स काढले. रवींद्र जडेजानं 81 रन्स काढत त्याला उत्तम साथ दिली.
टीम इंडियाच्या 7 आऊट 622 रन्सला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 300 रन्सवरच आटोपली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियावर ‘फॉलो ऑन’ ची नामुष्की ओढावली. शेवटच्या दिवशी आलेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला, पण टीम इंडियाने सीरिज जिंकली. टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकत इतिहास घडवला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.