फोटो – BCCI

मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) बद्दल काहीही वाचण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test)  मधील चौथ्या दिवसाचा हिरो मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ आहे. सिराजनं हेजलवुडला आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 294 वर संपवली. त्याचबरोबर त्यानं एकाच इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्याची कामगिरी पहिल्यांदा केली.

या विशेष मोहिमेबद्दल टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) त्याला मैदानातून बाहेर पडताना टीमला लीड करण्याची संधी दिली. सिराज मैदानाच्या बाहेर येताच त्याला जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मिठी मारली.

‘ही मिठी खूप काही सांगते’

बुमराह आणि सिराजची ही मिठी खूप काही सांगते. बुमराह टीम इंडियाचा मुख्य बॉलर. सिराज उगवता बॉलर. भारताला ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) जिंकून देण्याच्या उद्देशानं या दोघांनीही या सीरिजमध्ये बॉलिंग केली. बुमराहनं पहिल्या तीन टेस्टमध्ये दोन्ही टीममधल्या कोणत्याही फास्ट बॉलरपेक्षा जास्त बॉलिंग केली. बॉलिंगचा ताण असह्य झाल्यानं तो जखमी झाला आणि ब्रिस्बेन टेस्ट खेळू शकला नाही.

सिराजला मेलबर्न टेस्टमध्ये मोहम्मद शमी जखमी झाल्यानंतर पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतरच्या तिन्ही टेस्टमध्ये तो सर्वस्व ओतून बॉलिंग करतोय. त्यामुळेच या दोघांना सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) वर्णद्वेषी टिप्पणी सहन करावी लागली. या दोघांनी त्याला योग्य माध्यमातून बाहेर काढलं. सुरुवातीला कोणताही आरडाओरडा न करता योग्य ठिकाणी तक्रार करत वर्णद्वेषी मंडळींना सिडनीच्या मैदानातून बाहेर काढलं.

ब्रिस्बेनमध्ये बुमराहच्या अनुपस्थितीत तिसरीच टेस्ट खेळणाऱ्या सिराजकडं अचानक टीमच्या बॉलिंग अटॅकचं नेतेपद आलं. त्यावेळी त्यानं ती जबाबादारी चोख पार पाडली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सिराजनं निम्मी टीम आऊट केली. सिराजची ही कामगिरी पाहून आनंदी झालेल्या बुमराहची ‘मित्रा तू हे केलंस’ ही भावना व्यक्त करणारी या दोघांची मिठी होती.

( वाचा : IND vs AUS: भारतीय खेळाडूंना सिडनीमध्ये शिवीगाळ, टीम मॅनेजमेंटकडून तक्रार दाखल )

सचिननं केलं कौतुक

मोहम्मद सिराजच्या ब्रिस्बेन टेस्टमधील बॉलिंगला साक्षात सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) दाद दिली होती. सिराजला ब्रिस्बेनच्या पिचची मदत मिळत होती, असं अनेकांचं मत होतं. सचिननं ब्रिस्बेनच्या पिचला नाही तर सिराजच्या स्किलला हे श्रेय दिलं होतं. “सिराज आऊट स्विंग चांगल्या पद्धतीनं टाकतोय. हातामधून बॉल सोडताना तो कसा पडला पाहिजे यावर त्याचं पूर्ण नियंत्रण आहे, असं सचिननं सांगितलं होतं.

वडिलाचं स्वप्न जगणारा पोरगा

हैदराबादच्या मोहम्मद सिराजच्या आयुष्यात त्याच्या वडिलांची जागा खूप मोठी आहे. त्याच्या वडिलांकडून त्याला प्रचलित संपत्तीचा वारसा मिळाला नाही. पण त्याला वडिलांकडून संघर्ष करण्याची, कधीही हार न मानण्याचा आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा वारसा मिळाला आहे.

आयपीएल (IPL) स्पर्धेच्या दरम्यान सिराजच्या वडिलांची तब्येत खालावली होती. सिराजचं अर्ध लक्ष घरी होतं. ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु झाला आणि सिराजचे वडील गेले. ‘चायनीज व्हायरस’मुळे बदललेल्या परिस्थितीमुळे सिराज ‘बायो बबल’मध्ये होता. त्यामुळे घरी गेला तर ऑस्ट्रेलिया सीरिजमधून तो बाहेर पडला असता.

सिराजनं आयुष्यातील सर्वात दु:खद प्रसांगात कर्तव्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. तो ऑस्ट्रेलियात थांबला. आपल्या मुलाला टेस्ट क्रिकेट खेळताना पाहण्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. सिराजनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. सिडनी टेस्ट सुरु होताना या आणि अशा अनेक वडिलांच्या आठवणी दाटून आल्यानं सिराजला राष्ट्रगीताच्या वेळी अश्रू अनावर झाले होते.

मैदानाबाहेर हळवा असलेला सिराज मैदानात खंबीर आहे. तो सिडनीमध्ये झालेल्या स्लेजिंगनंतर ही ठाम उभा होता. ब्रिस्बेन टेस्टपूर्वी अचानक परिस्थिती बदलली. टीम इंडियाचे सर्वच्या सर्व प्रमुख बॉलर्स दुखापतीमुळे टेस्टपूर्वी टीममधून आऊट झाले. ब्रिस्बेनच्या पिचवर, ऑस्ट्रेलियाच्या ‘अजिंक्यगडा’त तिसरीच टेस्ट खेळणाऱ्या सिराज हा टीममधील सर्वात ज्येष्ठ बॉलर बनला.

( वाचा : IND vs AUS : ब्रिस्बेनमध्ये 1046 विरुद्ध 13 या विषम लढाईला सुरुवात! )

जसप्रीत बुमराह सोडला तर अलिकडच्या काळात परदेशातील टेस्टमध्ये ज्यांनी पदार्पण केलं आहे, अशा भारतीय फास्ट बॉलरची कारकीर्द सुरु झाल्यानंतर लगेच थांबली. (जयदेव उनाडकत आणि पंकज सिंग) ब्रिस्बेन टेस्टपूर्वी सिराजसमोर तो धोका होता.

त्यावेळी कदाचित सिराज नवा असता हैदराबाद टीमचे आणि आता टीम इंडियाचे बॉलिंग कोच असलेल्या भरत अरुण (Bharat Arun) यांचे शब्द सिराजला आठवले असावेत. “जे तू देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलं आहेस, तेच इथं करायचं आहे, अनुभवाचा बाऊ करण्याची गरज नाही’’ हे अरुण सरांचे शब्द सिराजला उभारी देऊन गेले.

( वाचा : ‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज! )

सिराज ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यानंतर पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा विदेशी बॉलर बनला आहे. जवागल श्रीनाथचा (Javagal Srinath) रेकॉर्ड त्यानं 1991-92 च्या सीरिजमधील 10 विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्यानं मोडला आहे. त्याचबरोबर त्यानं या टेस्ट सीरिजमध्ये भारताकडूनही सर्वात जास्त 13 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

आयपीएल स्पर्धेत एकेकाळी सिराजच्या बॉलिंगला भरपूर चोप मिळत असे. त्यामुळे तो पंचिंग बॅग बनला होता. ‘पंचिंग बॅग ते लढवय्या’ हा प्रवास त्यानं ऑस्ट्रेलियातील खडतर सीरिजमध्ये पूर्ण केला आहे. वडिलांचं स्वप्न जगण्यासाठी सर्वस्व झोकून देणारी सिराजची संघर्षगाथा प्रत्येक मुलाला प्रेरणा देणारी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading