फोटो – ANI

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये (Sydney) कोव्हिड 19 (COVID-19) ची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)  यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या टेस्टला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आपला रोहित शर्माही (Rohit Sharma) सध्या सिडनीमध्ये आहे. त्यामुळे तो सध्या किती सुरक्षित आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. रोहित शर्माला तातडीनं सिडनीच्या बाहेर काढावं अशी मागणी क्रिकेट फॅन्स करत आहेत. त्यावेळी रोहितच्या वास्तव्याबाबत एक अपडेट माहिती आहे.

कसा आहे रोहित?

बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्यानं ANI या वृत्तसंस्थेला रोहितबाबत माहिती दिली आहे. ‘रोहित शर्मा सध्या सिडनीमध्ये असून तो बीसीसीआयच्या नियमित संपर्कात आहे. तो सेफ क्वारंटाईन आणि बायो सुरक्षित वातावरणात आहे. तो त्याच्या रुममध्ये एकटाच असून त्याला सिडनीमधून लगेच दुसरिकडे हलवण्याची सध्या गरज नाही,’ असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केले आहे. ‘भविष्यात आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही रोहितला तातडीनं सिडनीच्या बाहेर काढू, सध्या तो पूर्ण सुरक्षित आहे’, असा दिलासाही या अधिकाऱ्यानं दिला आहे.

( वाचा : IND vs AUS: ‘बॉक्सिंग डे’ टेस्टच्या सर्वोत्तम खेळाडूला मिळणार एक विशेष पुरस्कार, वाचा काय आहे त्याचे खास कारण )

रोहित शर्मा सिडनीत का आहे?

आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानं त्याची सुरुवातीला ऑस्ट्रेलियी दौऱ्यावर निवड झाली नव्हती. त्याच्या दुखापतीवरुन देशात बरंच महाभारत रंगले होते. त्यानंतर बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीकडून फिट झाल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रोहित आता सिडनीमध्ये दाखल झाला आहे.

 ऑस्ट्रेलियातील सध्याच्या नियमानुसार त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण टीम मेलबर्नमध्ये दुसऱ्या टेस्टसाठी सराव करत असताना रोहित एकटाच सिडनीच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. सिडनी टेस्टच्यापूर्वी तो भारतीय टीममध्ये दाखल होईल. ‘रोहित हॉटेलच्या रुममध्येही फिटनेसवर पूर्ण काम करत आहे,’ असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

( वाचा : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत काय, काय घडले? )

सिडनीत टेस्ट होणार का?

सिडनीमध्ये परिस्थिती सध्या नाजूक आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलियातील तिसरी टेस्ट सिडनीत होणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. त्यावर सध्या तरी तिसऱ्या टेस्टची जागा बदलण्याचा कोणताही विचार नाही, असं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने जाहीर केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: