फोटो – अजिंक्य रहाणे/ ट्विटर

‘भारतीय क्रिकेटची वॉल’ अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होऊन आता आठ वर्ष झाली आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 16 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्याने वारंवार टीम इंडियाचे रक्षण केले. कितीही अवघड पिचवर, कोणत्याही खतरनाक बॉलर्स समोर भक्कम उभं राहणे हा त्याचा सहज क्रिकेटधर्म होता. द्रविड रिटायरमेंटनंतरही सातत्याने भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारतानं एक अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच भारत ‘अ’ टीमला ही त्याच्या अनुभवाच्या टीप्स वारंवार मिळत असतात. सध्या तो बंगुळरुतील नॅशनल क्रिकेट अ‍ॅकडमीचा (NCA) प्रमुख आहे.

पुन्हा द्रविडची आठवण!

भारतीय टीम संकटात सापडली की राहुल द्रविडची हमखास आठवण येते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया (Team India) देखील सध्या अशाच संकटात सापडली आहे. अ‍ॅडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची इनिंग फक्त 36 रन्सवर संपुष्टात आली. टेस्ट क्रिकेटमधील भारताचा हा निचांकी स्कोअर आहे. या अडचणीच्या परिस्थितीमधून टीम इंडियाला बाहेर काढण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) राहुल द्रविडला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवावे अशी मागणी भारतीय टीमचे माजी कॅप्टन आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी केली आहे.

( वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’! )

वेंगसरकर यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना ही मागणी केली आहे. ‘बीसीसीआयने भारतीय टीमच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवावे. तेथील परिस्थितीमध्ये बॉलचा कशा प्रकारे सामना करावा हे द्रविड योग्य पद्धतीनं सांगू शकतो. त्याच्या मार्गदर्शनाचा भारतीय टीमला नेटमध्ये मोठा फायदा होईल. NCA कोव्हिड 19 मुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहे. बीसीसीआय राष्ट्रीय टीमच्या मदतीसाठी द्रविडचा चांगला उपयोग करुन घेऊ शकते,’’  असा सल्ला वेंगसरकर यांनी दिला आहे.

शेवटच्या दोन टेस्टमध्ये होऊ शकतो फायदा!

ऑस्ट्रेलियातील नियमांप्रमाणे राहुल द्रविडला दोन आठवडे क्वारंटाईन राहावे लागेल. द्रविडला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवले तर तिसऱ्या टेस्टपासून त्याच्या मार्गदर्शनाचा भारतीय टीमला फायदा होईल. तिसरी टेस्ट सात जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरु होणार आहे.

( वाचा : लॉर्ड्स 1974 ते अ‍ॅडलेड 2020, दोन लज्जास्पद कामगिरीमधील अजब योगायोग! )

द्रविडचा ऑस्ट्रेलियात जबरदस्त रेकॉर्ड

ज्या अ‍ॅडलेडच्या मैदानावर विराट कोहलीच्या टीमनं शरणागती पत्कारली त्याच मैदानावर द्रविडने एक अविस्मरणीय खेळी केली आहे. 2003 साली याच मैदानावर द्रविडने 233 रन्सची अविस्मरणीय खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारताने तब्बल 22 वर्षांनी ऑस्ट्रेलियात टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला होता. राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियात 16 टेस्टमध्ये 41.64 च्या सरासरीने 1166 रन्स केले आहेत.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: