फोटो – सोशल मीडिया

क्रिकेटमधील एखादी चांगली खेळी ही ती खेळी खेळताना मारलेल्या एखाद्या चांगल्या फटक्यामुळे लक्षात राहते. सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 2004 च्या सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) झळकावलेली डबल सेंच्युरी त्याने ऑफ साईडला एकही ड्राईव्ह न मारल्याने सर्वांच्या लक्षात राहिलेली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता रुजवणाऱ्या सचिननं सिडनी टेस्टमध्ये एकही ऑफ ड्राईव्ह न मारता त्याच्या करियरमधील तिसरी डबल सेंच्युरी झळकावली होती.

सिडनी टेस्ट सुरु होण्यापूर्वी चार टेस्टची ती सीरिज 1-1 अशी बरोबरीत होती. सौरव गांगुलीच्या सेंच्युरीमुळे भारताने पहिली टेस्ट ड्रॉ केली. द्रविड-लक्ष्मणची पार्टरनरशिप आणि अजित आगरकरचा भेदक मारा यामुळे दुसरी टेस्ट जिंकली. तिसऱ्या टेस्टमध्ये ब्रेट ली च्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं कमबॅक करत बरोबरी केली.

भारतासाठी त्या सीरिजमधील एक प्रमुख डोकेदुखी होती ती म्हणजे सचिनचा खराब फॉर्म. सिडनी टेस्टपूर्वी सचिननं त्या सीरिजमध्ये 0,1,37,0 आणि 44 असे फक्त 82 रन्स केले होते. सचिनला एकही हाफ सेंच्युरी झळकावता आली नव्हती. सिडनीपूर्वी झालेल्या मेलबर्न टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये सचिन ऑफ साईडला खेळतानाच आऊट झाला होता.

( वाचा : नवदीप सैनी : दर मॅचसाठी 200 रुपये मानधन ते सिडनी टेस्टमधील टीम इंडियाचा सदस्य! )

सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना सचिन मैदानात आला. ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या प्लॅनवर त्याच्याकडे उत्तर होतं. ऑफ साईडच्या बॉलवर ‘ती चूक’ पुन्हा करायची नाही हे सचिनचं ठरलं होतं. सचिनने त्याच निग्रहाने तब्बल 10 तास बॅटिंग केली. मॅचच्या तिसऱ्या दिवशी एकूण दहा तासांपेक्षा जास्त बॅटिंग करुन सचिन नॉट आऊट परतला तेंव्हा भारताने सिडनीच्या मैदानावरील सर्वोच्च 7 आऊट 705 रन्सचा स्कोअर केला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या 436 बॉल्समधील नाबाद 241 रन्सचा समावेश होता. यामध्ये सचिननं 33 फोर लगावले होते.

“मी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळताना काही वेळा आऊट झालो होतो. त्यामुळे एकही कव्हर ट्राईव्ह खेळायचा नाही हे ठरवले होते. त्यांनी सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंग केली. मी ते सर्व बॉल सोडून द्यायचं ठरवलं होतं. त्यांनंतर त्यांनी माझ्या बॅटवर बॉल टाकले. मी त्या बॉलच्या पेसचा वापर केला. ही माझी एक सर्वोत्तम सेंच्युरी आहे. संपूर्ण इनिंगमध्ये मी शिस्तशीर खेळू शकलो याचा मला आनंद आहे. यापूर्वी काही वेळा माझे काही फटके चुकले होते. त्यामुळे त्या फटक्यांना मुरड घातली पाहिजे, हे मला माहिती होते.’’  या साध्या आणि नेमक्या शब्दात सचिननं त्या इनिंगबद्दल नंतर प्रतिक्रिया दिली होती.  

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

भारतानं पुढे सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियावर फॉलो ऑन लादण्याची संधी असूनही तो लादला नाही. सचिननं दुसऱ्या इनिंगमध्ये 82 रन्स काढले. सचिनच्या त्या खेळीमुळे स्टीव्ह वॉ ला त्याच्या क्रिकेट करियरमध्ये टेस्ट आणि भारताविरुद्धची सीरिज जिंकून निरोप देण्याचं ऑस्ट्रेलियन टीमचं स्वप्न अपूर्ण राहिले. चौथी टेस्ट संपल्यानंतर सचिनची सीरिजमधील सरासरी होती 76.60!

सचिनच्या ऐतिहासिक खेळीचा व्हिडिओ

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: