फोटो – ट्विटर/ Calcutta Times

टीम इंडियानं (Team India) सिडनी टेस्ट (Sydney Test) ड्रॉ करणं हा एक अभुतपूर्व असा पराक्रम आहे. तब्बल 19 वर्षांनी भारतीय बॅट्समननं 100 पेक्षा जास्त ओव्हर्स खेळून काढल्या. 2002 च्या लॉर्ड्स टेस्टनंतर टीमनं हा पराक्रम केला. अजित आगरकरनं (Ajit Agarkar) सेंच्युरी झळकावलेल्या त्या टेस्टमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे ‘ऑल टाईम ग्रेट’ बॅट्समन होते.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये खेळणाऱ्या या टीममधील काही खेळाडूंवर काय आक्षेप घेण्यात आले आहेत. सिडनी टेस्टच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या खेळाडूंच्या निवडीबद्दल वारंवार शंका उपस्थित केली जाते. अशा तीन खेळाडूंचं महत्त्व आता समजेल अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सुवर्ण युगात म्हणजे स्टीव्ह वॉ (Steve Waugh) कॅप्टन असताना एक टेस्ट सीरिज त्यांना हरवणारा आणि नंतर ऑस्ट्रेलियात पुढची सीरिज बरोबरीत सोडवणारा कॅप्टन अशी सौरव गांगुलीची ओळख आहे. गांगुलीला काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे तो सध्या घरी आराम करत आहे. घरात बसल्यानंतरही दादाचं लक्ष हे भारतीय टीमच्या कामगिरीकडं आहे. त्यामुळे सिडनी टेस्ट संपताच त्यानं एक लक्षवेधी ट्विट केलं आहे.

( वाचा : संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स! )

गांगुलीनं कुणाचा उल्लेख केला?

सिडनी टेस्टमध्ये चार भारतीय बॅट्सनननी 100 पेक्षा जास्त बॉल खेळून ही मॅच वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली. या चौघांपैकी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या तिघांचा उल्लेख गांगुलीनं त्याच्या ट्विटमध्ये केला आहे.

गांगुली त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “ मला वाटतं की, पुजारा पंत आणि अश्विन या तिघांच्या खेळाचं महत्त्व आता समजलं असेल. तिसऱ्या क्रमांकावर या प्रकारच्या बॉलिंगचा सामना करणे ही सामान्य गोष्ट नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये जवळपास 400 विकेट्सही सहज मिळत नाहीत. टीम इंडिया चांगल्या प्रकारे खेळली. आता सीरिज जिंकण्याची वेळ आली आहे.’’

गांगुली असं का म्हणाला?

सिडनी टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारावर ‘संथ खेळाडू’ असा ठप्पा त्याच्या टीकाकारांनी मारला आहे. पुजाराच्या सिडनीमधील दुसऱ्या इनिंगमधील बॅटिंगवरही टीका झाली होती. ऋषभ पंतवरही तो परिपक्व नसल्याची आणि त्याला अवास्तव संधी दिली जाते अशी टीका होते. तर आर. अश्विनचं टीम इंडियामधील स्थान सुरक्षित नाही, असा धक्कादायक गौप्यस्फोट सुनील गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. अश्विनला टीम मॅनेजमेंटकडून चांगली वागणूक मिळत नाही, असा दावा गावस्कर केला होता.

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का?)

बीसीसीआय अध्यक्ष या नात्यानं गांगुलीनं आजवर कायम निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. त्याबद्दल कधीही जाहीर मत व्यक्त केलेलं नाही. मात्र सिडनी टेस्टच्या निर्णयानंतर गांगलीनं या तीन खेळाडूंवर उठसूठ टीका करणाऱ्या मंडळींना सुनावलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल धरसोड वृत्ती बाळगणाऱ्या मॅनेजमेंटलाही नाव न घेता टोला लगालवला आहे, असं मानलं जात आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: