
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ही या शतकातील सर्वात यशस्वी टीम आहे. मैदानावर आक्रमक खेळण्याच्या नादात ते अनेकदा सर्व मर्यादा ओलांडतात. ते फक्त सेल्जिंगवरच थांबत नाहीत. तर त्यांचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन नव्या खेळाडूला बॉल कुरतडण्याचाही आदेश देतात. खेळताना नियम मोडणे ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंची गेल्या काही वर्षातली सवय नाही. किमान 1981 सालापासून तरी नक्कीच आहे. भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी दिलेल्या ताज्या माहितीमुळे याचा पुरावा मिळाला आहे.
भारतानं ऑस्ट्रेलियाला ज्या मेलबर्नमध्ये नुकतंच हरवलं, त्या मेलबर्नच्या मैदानात 1981 साली संतापलेल्या गावसकरांना सर्व जगानं पाहिलं होतं. गावसकर त्यांचे सहकारी चेतन चौहान यांना घेऊन मैदानाच्या बाहेर जात आहेत, हे दृश्य आजच्या इंटरनेटच्या विश्वात ते ‘ऑनलाइन’ देखील उपलब्ध आहे.
नेमकं काय घडलं होतं?
गावसकर यांनी या घटनेच्या 40 वर्षांनी त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर डेमियन फ्लेमिंग ( Damien Fleming) याच्याशी बोलताना गावसकरांनी तो किस्सा सांगितला. “मला अंपयारनं LBW आऊट दिलं म्हणून मी चिडलो होतो ही चुकीची समजूत आहे. मी चेतनच्या जवळून जात असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मला उद्देशून अपशब्द वापरले. त्यांनी मला उद्देशून ‘गेट लॉस्ट’ (Get Lost) हा शब्द वापरला. त्यामुळे मी चेतनला माझ्यासोबत येण्यास सांगितलं.’’ असं गावसकरांनी स्पष्ट केले.
आदल्या दिवशी काय झालं होतं?
पण Walk Off चा निर्णय का घेतला? या प्रश्नावर गावसकरांनी त्या टेस्टच्या आदल्या दिवशी काय घडलं ते सांगितलं. “अॅलन बॉर्डर (Allan Border) तीनदा आऊट होता, अशी आमची खात्री होती. त्यानंतर त्यानं सेंच्युरी पूर्ण केली. तो पायाजवळनं बॉल लागल्यानं बोल्ड झाला होता. त्यावेळी अंपायरनं खात्री करण्यासाठी स्केवअर लेग अंपायरला विचारले होते. त्यांच्या या कृतीमुळे विकेट किपर सय्यद किरमाणी दुखावला होता. अंपायरची कृती आपल्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित केली आहे, अंपायरनं बॉर्डरला नॉट आऊट दिलं, तर मी मैदान सोडणार असं किरमाणीनं मला सांगितलं होतं,’’ अशी आठवणही गावसकरांनी सांगितली.
अखेर काय घडलं?
भारतीय टीम मॅनेजमेंटनं वेळीच हस्तक्षेप करत चेतन चौहान यांना मैदान सोडण्यापासून रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कपिल देवनं अविस्मरणीय स्पेल टाकला. कपिलचा स्पेल ऑस्ट्रेलियन स्लेजिंग, त्यांना अंपायर्सची मदत या सर्वांवर भारी पडला आणि भारतानं 59 रन्सनं मेलबर्न टेस्ट जिंकली.
(वाचा : ‘कपिल देव का जबाब नही’ – पेन किलर घेत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला केले होते पराभूत! )
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.