फोटो – इंडियन एक्स्प्रेस

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये (Sydney) होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी नवदीप सैनीची (Navdeep Saini) अंतिम 11 मध्ये निवड झाली आहे.  टेस्ट मॅचच्या अंतिम 11 मध्ये खेळण्याची 2018 पासूनची सैनीची प्रतीक्षा अखेर संपली. टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येक मॅचसाठी 200 रुपये मानधन ते सिडनी टेस्टमधील टीम इंडियाचा सदस्य असा सैनीचा प्रवास हा मोठ्या संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे.

लहानपणापासून क्रिकेटची आवड

नवदीप सैनीचा जन्म 23 नोव्हेंबर 1992 या दिवशी हरयाणातील करनालमध्ये झाला. त्याचे वडील ड्रायव्हर होते. मुलानं चांगलं शिकावं आणि इंजिनिअर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. नवदीपला मात्र पहिल्यापासून क्रिकेटचा ध्यास होता. शाळा-कॉलेज बुडवून तो क्रिकेट खेळत असे. लहान गाव, साधारण परिस्थिती त्यामुळे त्याची क्रिकेट बॉलनं खेळण्याची ऐपत नव्हती. त्यानं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केली. करनाल परिसरातील अनेक टेनिस बॉल स्पर्धा गाजवणाऱ्या सैनीला त्या काळात प्रत्येक मॅचमध्ये 200 ते 250 रुपये मानधन मिळत असे.

( वाचा : ‘पंचिंग बॅग’ नाही, ‘लढवय्या’ मोहम्मद सिराज! )

गौतम गंभीरचा आयुष्यात प्रवेश

दिल्लीचा माजी बॉलर सुमित नरवालनं सैनीचा खेळ एका स्पर्धेत पाहिला. त्यानं सैनीला दिल्लीमध्ये बोलावलं. नरवालनं टीम इंडियाचा सदस्य आणि दिल्ली रणजी टीमचा तेंव्हाचा कॅप्टन गौतम गंभीरची (Gautam Gambhir) सैनीला ओळख करुन दिली. गंभीरचा सैनीच्या आयुष्यात प्रवेश झाला आणि त्याचं आयुष्य बदललं. गंभीरच्या वाढदिवशी मागच्या वर्षी (14 ऑक्टोबर 2020) सैनीनं केलेलं ट्विट त्याच्या गंभीरबद्दलच्या भावना व्यक्त करणारं आहे.

सैनीसाठी गंभीर का खास आहे?

‘सैनीनं हे ट्विट का केलं?’  याचंही एक कारण आहे. सैनीला दिल्लीच्या नेटमध्ये गंभीरला बॉलिंग करण्याची संधी मिळाली. टेनिस बॉलनं 130-140 किमी प्रती तास वेगानं बॉलिंग करणाऱ्या सैनीला पाहून तो प्रभावित झाला. सैनीकडं तेंव्हा क्रिकेट बूटही नव्हते. तेंव्हा गंभीरनं सैनीला पहिले क्रिकेट बूट घेऊन दिले होते.

सैनीची दिल्लीच्या रणजी टीममध्ये निवड व्हावी यासाठी गंभीरनं आग्रह धरला. या विषयावर त्याचा दिल्लीचे कोच आणि निवड समितीशी वादही झाला. या ‘गंभीर’ पाठपुराव्यानंतर अखेर सैनीची दिल्लीच्या रणजी टीममध्ये निवड झाली.

 रणजीमध्ये दमदार कामगिरी

रणजी क्रिकेटचा (Ranji Trophy) 2017-18 हा सिझन सैनीनं गाजवला. त्यानं त्या सिझनमधील 8 मॅचमध्ये 34 विकेट्स घेतल्या. त्या सिझनमध्ये दिल्लीची टीम उपविजेती ठरली. दिल्लीच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात सैनीचा मोठा वाटा होता. सैनीनं आजवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 28.46 च्या सरासरीनं 128 विकेट्स घेतल्या आहेत.

नवदीप सैनीची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कामगिरी

मॅच48
विकेट्स128
सरासरी28.46
इकॉनॉमी रेट2.84
एका इनिंगमधील सर्वोत्तम6/32

आयपीएलमध्ये पदार्पण

सैनी 2017 साली दिल्ली डेअर डेव्हिल्स टीमचा सदस्य होता. त्याला त्या सिझनमध्ये एकही मॅच खेळता आली नाही. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) 2018 मध्ये तीन कोटी रुपयांना त्याला करारबद्द केलं.

सैनीकडं सातत्यानं 130 ते 140 किमी प्रती तास वेगानं बॉलिंग करण्याची क्षमता आहे. आयपीएलमधील त्याच्या एका बाऊन्सरनं शेन वॉटसनला निरुत्तर केलं होतं. त्याचबरोबर मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) बलाढ्य मुंबई इंडियन्यच्या टीमच्या विरुद्ध सैनीनं सुरेख सुपर ओव्हर टाकत RCB ला विजय मिळवून दिला होता.

( वाचा : Explained: नवदीप सैनीची सिडनी टेस्टसाठी अंतिम 11 मध्ये निवड का झाली? )

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सैनी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि भारत A कडून चांगली कामगिरी केल्यामुळे सैनीची सर्व प्रथम अफगाणिस्तानविरुद्ध 2018 साली झालेल्या एकमेव टेस्टसाठी टीम इंडियामध्ये (Team India) निवड झाली होती. मात्र, त्यावेळी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 साली तो पहिली आंतरराष्ट्रीय T20 खेळला. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं हेटमायर, पूरन आणि कायरन पोलार्ड या तिघांना आऊट केलं. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय T20 मधील पहिल्याच मॅचमध्ये 20 ओव्हर मेडन टाकत त्यामध्ये एक विकेट घेण्याचा विक्रम सैनीच्या नावावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध 2020 च्या वन-डे मॅचमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबत एक चांगली पार्टरनरशिप करत आपण बॅटींगही करु शकतो, हे सैनीनं दाखवून दिलं आहे.

नवदीप सैनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

मॅचविकेट्ससरासरीइकॉनॉमी रेटसर्वोत्तम
T20101318.077.153/17
वन-डे7675.666.982/58

स्वप्न पूर्ण करण्यासाठी साधनं नाही तर प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत याची जास्त आवश्यकता असते. हरयाणातील करनालपासून सुरु झालेला सैनीचा प्रवास हेच तर सांगतो.  टेस्ट क्रिकेटमध्ये अंतिम 11 मध्ये खेळण्याची सैनीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ही जागा मिळवण्यासाठी किती संघर्ष केलाय याची 28 वर्षांच्या सैनीला नक्कीच जाणीव आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्यासाठी तो जीवतोड प्रयत्न करेल यात शंका नाही. सिडनी टेस्टमधून टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीला ‘Cricket मराठी’ च्या खूप खूप शुभेच्छा.  

* लेखातील आकडेवारी ही 6/1/201 पर्यंतची आहे

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: