
सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) टीम इंडियाचा (Team India) पराभव टाळण्यात हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या जोडीचा महत्त्वाचा वाटा होता. ही जोडी मैदानात एकत्र आली आणि ऑस्ट्रेलियानं नवा बॉल घेतला.
कमिन्स, स्टार्क, हेजलवूड आणि लायन असा ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण बॉलिंग अटॅक समोर होता. याच चौघांनी पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला 36 वर गुंडाळलं होतं. ‘कॅप्टन आहे म्हणून टीममध्ये आहे’ अशा टीम पेनचं (Tim Paine) तोंड सुटलं होतं. त्यानं भारतीय टीमचा प्रमुख बॉलर आणि ज्याच्या पेनपेक्षा टेस्टमध्ये चार सेंच्युरी जास्त आहेत, अशा अश्विनबद्दल अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. (अश्विनच्या टेस्टमध्ये 4 सेंच्युरी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनच्या शून्य आहेत.) ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स अश्विनच्या शरिरावर रोखून बॉलिंग करत होते. त्यात तो जखमी झाला, पण हटला नाही.
( वाचा : IND vs AUS: सिडनीतील पराभव टाळून टीम इंडियाची द्रविडला वाढदिवशी गुरूदक्षिणा! )
विहारी – अश्विन जोडीनं 256 बॉलमध्ये 62 रन्सची पार्टनरशिप केली. ‘T20 च्या युगात टेस्ट क्रिकेटही किती जिद्दीनं खेळलं गेलं’ यावर भविष्यात केस स्टडी करायची असेल तर या पार्टरनरशिपचा अभ्यास केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. विहारीनं 161 बॉलमध्ये नाबाद 23 रन्स काढले. तर अश्विननं 128 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली.
अश्विनच्या बायकोनं सांगितलं सत्य!
आर. अश्विनची बायको प्रिती अश्विननं मॅच संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तिनं अश्विनला या ऐतिहासिक खेळाच्या आदल्या रात्री झालेल्या त्रासाचं वर्णन केलं आहे.
‘’त्याला रात्रभर त्रास होत होता. सकाळी उठल्यावर त्याला बुटाचे लेस देखील नीट बांधता येत नव्हते. जो माणूस रात्रभर पलंगावर असह्य वेदनेनं अस्वस्थ होता. सकाळी त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. पायाच्या बुटाची लेस बांधण्यासाठी देखील उठता येत नव्हतं. त्यानं आज या प्रकारचा खेळ केला. हे पाहून मी अचंबित आहे.’’ असं प्रितीनं सांगितलं.
जिगरबाज अश्विन!
आर. अश्विन कसा खेळाडू आहे. त्याच्यासाठी क्रिकेट किती महत्त्वाचं आहे. भारतीय टीम त्याचं कसं सर्वस्व आहे, हे समजण्यासाठी त्याच्या बायकोनं केलेलं हे ट्विट पुरेसं आहे. अश्विनवर फक्त भारतीय पिचवरचा बॉलर असा आरोप सातत्यानं केला गेला. त्याची विदेशी खेळपट्टीवरील टीममधील जागा निश्चित नव्हती. या सर्वाचा त्यानं कधीही क्रिकेटवर परिणाम होऊ दिला नाही.
( वाचा : IND vs AUS : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद )
अश्विननं शारिरीक त्रासावर त्याच्या मानसिक इच्छाशक्तीनं सिडनीमध्ये मात केली. त्यामुळे तो बॉलनं नाही तर बॅटनं टीमसाठी इतिहास घडवू शकला. जिगरबाज अश्विनला ‘Cricket मराठी’ चा सलाम.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.