फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेली ओव्हल टेस्ट टीम इंडियानं जिंकली तर त्यामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सेंच्युरी इतकाच शार्दुल ठाकूरच्या दोन हाफ सेंच्युरीचं योगदान असेल. पहिल्या इनिंगमध्ये सर्व प्रमुख बॅट्समन परतल्यानंतर शार्दुलनं इंग्लंडच्या बॉलरवर प्रतिहल्ला केला. त्यानं फक्त 31 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. ही इंग्लंडमधील सर्वात फास्ट टेस्ट हाफ सेंच्युरी आहे. त्यानं यावेळी इयान बोथमचा रेकॉर्ड मोडला. तर भारताकडून कपिल देवच्या नंतरची हाफ सेंच्युरी आहे. दुसऱ्या इनिंगमध्येही त्यानं 60 रनची उपयुक्त खेळी करत टीम इंडियाला चांगली आघाडी मिळवून देण्यात योगदान दिले. ‘पालघर एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्दुलचा (Palghar Express Shardul Thakur) आजवरचा प्रवास सहज झालेला नाही.

मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे. मुंबईच्या शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या पालघरमध्ये शार्दुलचा दिवस रोज पहाटे 3.30 वाजता सुरु होत असे. चार वाजता मुंबईला जाणारी मेल पकडायची. मेलमध्ये जिथं जागा मिळेल तिथं बसून, अनेकदा क्रिकेटचं किट घेऊन मेलच्या टॉयलेटजवळ उभं राहून राहून शार्दुल सकाळी 7.30 वाजता चर्चगेटमध्ये सुरु होणाऱ्या क्रिकेट प्रॅक्टीसमध्ये उपस्थित राहत असे.

संघर्ष, आव्हानात्मक परिस्थिती, प्रतिकुलता हे सर्व शार्दुलनं अगदी लहानपणापासून अनुभवलं आहे. त्यामुळेच तो ब्रिस्बेन किंवा ओव्हल टेस्टमध्ये (Brisbane Test) अडखळला नाही. सर्वच प्रमुख बॉलर्स जायबंदी झाल्यानं शार्दुलला ब्रिस्बेनमध्ये उतरवण्यात आलं. स्वत: शार्दुलचा यापूर्वीच्या एकमेव टेस्टचा अनुभव चांगला नव्हता. वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) विरुद्ध 2018 साली हैदराबाद टेस्टमध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्या टेस्टमध्ये मोजून 10 बॉल टाकून तो जायबंदी झाला आणि टेस्टच्या बाहेर पडला.

‘एका कॅचची किंमत काय असते’, ते भारतीय क्रिकेटमधील ‘या’ दिग्गज बॉलरला विचारा

तीन वर्षात पुन्हा शिकला शार्दूल!

पहिल्या टेस्टमधील फ्लॉप शो मुळे शार्दुलची टेस्ट कारकीर्द संपण्याची शक्यता होती. भारतामध्ये प्रत्येत मालिकेत नव्या बॉलर्सचा उगम होत होता. टीम इंडियाकडून खेळण्यासाठी फिटनेसचं महत्त्व वाढलं होतं. शार्दुल तर पहिल्याच टेस्टमधून खराब फिटनेसनं बाहेर पडला होता. हैदराबादमध्ये शार्दुलला त्याच्या फिटनेसनं दुसऱ्यांदा दगा दिला होता.

मुंबईच्या अंडर – 19 टीममधूनही त्याला वजन जास्त असल्यामुळे परत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानं फिटनेसवर काम केलं आणि मुंबईच्या टीममध्ये पुनरागमन केलं.हैदराबाद टेस्टमध्ये तो अनुभव गाठीशी होता. तो पुन्हा कामाला लागला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून आणि आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) शार्दुल खेळत होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध 2019 साली झालेल्या फायनलमध्ये मलिंगाच्या शेवटच्या बॉलवर आऊट होणारा शार्दुल (Palghar Express Shardul Thakur) सर्वांच्या चांगला लक्षात आहे. ‘त्याला बॅटिंगमध्ये प्रमोशन का देण्यात आलं?’ हा प्रश्न तेंव्हा वारंवार विचारण्यात आला होता.

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट

एकाच ओव्हरमध्ये मारले होते सहा सिक्स!

‘स्पोर्ट्स स्टार‘मध्ये शायन आचार्य यांनी लिहिलेल्या लेखानुसार शार्दुल ठाकूरनं वयाच्या 16 व्या वर्षी 2006 साली शालेय क्रिकेटमध्ये बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशन स्कुल ( Swami Vivekanand International School, Borivali) कडून खेळताना एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. या कामगिरीनंतरच त्यानं मुंबई क्रिकेटमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

शार्दुलमध्ये बॅट्समन दडला आहे, हे सर्वांनाच माहिती होतं. पण तो बॅट्समन रणजी क्रिकेटमध्ये फारसा बाहेर आला नाही. उत्तर प्रदेशविरुद्ध (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) त्यानं 100 बॉलमध्ये 87 रनची खेळी केली होती. मात्र त्यापूर्वी आणि त्यानंतर स्थानिक क्रिकेटमधील त्याची ठळक मोठी इनिंग नाही.

शार्दुल ठाकूर 2.0

शार्दुलला वन-डे आणि T20 मध्ये संधी मिळाली. त्यामध्ये बॉलिंग करताना त्याने महागडी बॉलिंग केली. वेस्ट इंडिजविरुद्ध कटकमध्ये झालेल्या सीरिजमधील निर्णायक वन-डे मध्ये  त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करुन टीमला जिंकून दिलं. त्यावेळी विराट कोहलीनं ‘तुला मानलं रे ठाकूर’ असं ट्विट केलं होतं. विराटच्या या ट्विटचा नंतरच्या काळात शार्दुलची (Palghar Express Shardul Thakur) थट्टा करण्यासाठी उपयोग करण्यात आला.

कोरोना ब्रेकनंतर झालेल्या आयपीएल स्पर्धेत शार्दुलला सुरुवातीला संधी मिळाली नव्हती. CSK चे प्रमुख खेळाडू अपयशी ठरु लागले, टीम सातत्यानं पराभूत होत होती. त्यावेळी त्याला संधी मिळाली. मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) त्यानं 9 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये मॅचमधील हाणामारी ओव्हर्समध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यानं बॉलिंग केली. टीमनं दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.  

9 महिन्यातील 3 ऐतिहासिक विजयाचा नायक, टीम इंडियाचा ‘लाल बादशाह’!

ब्रिस्बेनचा हिरो

मानसिकतेचा कस पाहणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शार्दूलला फक्त 3 मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचमध्ये संधी मिळाली. टेस्ट सीरिजसाठी तो नेट बॉलर होता. ब्रिस्बेनमधील पहिले सहा ऑप्शन वापरल्यानंतर किंवा दुखापतीमुळे बाद झाल्यानंतर सातव्या क्रमांकाचा पर्याय असलेल्या शार्दुलला संधी मिळाली.

यापूर्वीच्या कारकीर्दीमधील एकमेव टेस्टमध्ये फक्त 10 बॉल बॉलिंग करुन बाहेर पडलेल्या शार्दुलनं ब्रिस्बेनमध्ये पहिल्याच बॉलवर मार्कस हॅरीसची (Marcus Harris) विकेट घेतली. शार्दुलला आत्मविश्वास आणि भारतीय फॅन्सला आणखी एक हिरो सापडला होता.

शार्दुल आणि सुंदरच्या पार्टरनरशिपबद्दल ‘Cricket मराठी‘वरील या लेखात सविस्तर लिहलं आहे. ब्रिस्बेन टेस्टचं चित्र बदलवणाऱ्या या पार्टरनरशिपनंतर शार्दुलनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 61 रन देत 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला 300 रन्सच्या आत रोखण्यात मोहम्मद सिराजसह (Mohammed Siraj) त्याचाही मोठा वाटा होता.

टीम मॅनेजमेंटचा विश्वास

शार्दुलला आता टेस्ट टीममध्ये पुन्हा संधी कधी मिळेल हे सांगता येत नाही. पण, अचानक आणि ती देखील तात्पुरती मिळालेल्या संधीचं दडपण न घेता त्याचं सोनं शार्दुलनं केलं आहे. त्यानं ब्रिस्बेन टेस्टमध्ये दाखवलेल्या जिगरबाज वृत्तीमुळे नॉटिंघम टेस्टमध्ये टीम इंडियाचा सर्वात सिनिअर फास्ट बॉलर इशांत शर्माच्या (Ishant Sharma) जागी त्याला संधी देण्यात आली. त्या टेस्टमध्ये समाधानकारक कामगिरी करुनही दुखापतीमुळे त्याला टीम बाहेर व्हावं लागलं. आता ओव्हल टेस्टमध्ये पुन्हा शार्दुल टीममध्ये परतला.

लोकल ट्रेनमधील जागेपासून सर्व गोष्टी संघर्षातून मिळवलेल्या शार्दुलनं (Palghar Express Shardul Thakur) टीम इंडियातील जागा टिकवण्याबाबतचं दडपण नीट पेललं. रोज पहाटे चार वाजता उठून पालघरहून मुंबईची मेल पकडून शार्दुलनं क्रिकेटची साधना केली आहे. पालघर-मुंबई प्रवासात दमलेल्या अवस्थेत, अर्धवट झोपेत, जिथं जागा मिळेल ती बसत किंवा उभा राहत जी स्वप्न शार्दुलनं पाहिली होती, ती स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading