फोटो – ट्विटर / Extra_Pace

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये (Adelaide Test)  झालेल्या मोठ्या पराभवाचे मोठे पडसाद भारतीय क्रिकेटमध्ये उमटले आहेत. अ‍ॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाची (Team India) दुसरी इनिंग फक्त 36 रन्सवर संपुष्टात आली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा निचांकी स्कोअर आहे. या लज्जास्पद कामगिरीनंतर भारतीय टीमला आता मेलबर्नमध्ये दुसऱ्या टेस्टला सामोरे जायचे आहे. पहिल्या टेस्टमधील पाच खेळाडू म्हणजे जवळपास निम्मी टीम दुसऱ्या टेस्टमध्ये नसेल असा अंदाज आहे. पृथ्वी शॉ, विराट कोहली, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा आणि मोहम्मद शमी हे पाच खेळाडू दुसऱ्या टेस्टमध्ये नसतील. यापैकी विराट आणि शमी वगळता अन्य तीन जणांना खराब कामगिरीचा फटका बसू शकतो.

( वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’! )

भारतीय टीमच्या या लज्जास्पद कामगिरीमुळे सर्वात जास्त नुकसान हे टीम इंडियाचा विकेटकिपर बॅट्समन वृद्धिमान साहाचे (Wriddhiman Saha)  होऊ शकते. मेलबर्न टेस्टमध्ये साहाच्या जागी ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतला उर्वरित तीन्ही टेस्टमध्ये खेळवण्याचा टीम मॅनेजमेंटमध्ये गांभीर्याने विचार सुरु आहे.

दुर्दैवी साहा

बंगालकडून रणजी क्रिकेट खेळणारा ऋद्धीमान साहा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. या कामगिरीच्या जोरावर 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूरमध्ये तो पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट खेळला. भारतीय क्रिकेटमधल्या ‘महेंद्रसिंह धोनी पर्वा’चा फटका साहालाही बसला. धोनीच्या खेळापुढे साहाची कामगिरी चार वर्ष झाकली गेली. धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर तो टेस्ट टीमचा पहिल्या पसंतीचा विकेट किपर बनला

( वाचा : पार्थिव पटेलसह भारतीय क्रिकेटमधील ‘धोनी पर्वा’चा फटका बसलेले क्रिकेटपटू )

साहाच्या करियरला दुखापतीचं ग्रहण आहे. त्याला अनेक मोठ्या मॅच दुखापतीमुळे खेळता आल्या नाहीत. भारतीय टीमच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शेवटच्या टप्प्यात जबरदस्त खेळ करुनही त्याला दुखापतीमुळे ‘प्ले ऑफ’ मध्ये टीमच्या बाहेर बसावे लागले होते.

ऋषभ पंत का?  

उत्तराखंडचा असलेल्या ऋषभ पंतची आक्रमक विकेट किपर बॅट्समन अशी ओळख आहे. टीम इंडियाच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने 4 टेस्टमध्ये 1 सेंच्युरीसह 58.33 च्या सरासरीने 350 रन्स केले होते. पंतने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीपेक्षा 68 रन्स जास्त केले होते. ऑस्ट्रेलियाप्रमाणे इंग्लंडमध्येही पंतने टेस्टमध्ये सेंच्युरी केली आहे.

टीम इंडियाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या प्रॅक्टीस मॅचमध्ये पंतने फक्त 73 बॉलमध्ये आक्रमक सेंच्युरी केली होती. त्या मॅचमध्ये त्याने फक्त एका ओव्हरमध्ये 4 फोर आणि एका सिक्सर्सह 22 रन्स काढले होते. एकाच सेशनमध्ये मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता ही पंतकडे आहे. त्याचबरोबर तो यंदा फॉर्मातही आहे. साहाने अ‍ॅडलेड टेस्टमधील दोन इनिंगमध्ये 9 आणि 4 असे फक्त 13 रन्स काढले होते. त्याचबरोबर एक कॅचही सोडला होता.

( वाचा : व्वा पंत! 73 बॉल्समध्ये झळकावली सेंच्युरी, टीकाकारांची तोंडं केली गप्प )

पंतला वयाचा फायदा

 पंत हा सध्या 23 वर्षांचा तर साहा सध्या 36 वर्षांचा आहे. ही गोष्ट देखील पंतच्या पथ्यावर पडणारी आणि साहाच्या विरुद्ध जाणारी आहे. भविष्याचा विचार करुन पंतचा टीमममध्ये समावेश करावा अशी मागणी अनेक दिग्गज क्रिकेटपटू सध्या करत आहेत. टीम मॅनेजमेंट या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहे. टीम मॅनेजमेंट पंतला पुढील सात टेस्ट सलग खेळवू शकते असं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने देखील दिले आहे.

ऋषभ पंतही दुर्दैवाने वारंवार अपयशी झाला तरी भारताकडे सध्या के. भरत, संजू सॅमसन, इशान किशन असे अनेक तरुण पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी देखील वृद्धिमान साहाच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. त्यामुळे अ‍ॅडलेड टेस्टमधील मोठ्या पराभवानंतर साहाचे टेस्ट करियर संपण्याची भीती निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: