
‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ हे जितकं खरं आहे, तितकंच ती सतत फिरवली तरी बिघडते, हे देखील सत्य आहे. हे सत्य समजून घेण्यासाठी स्वयंपाक घरात जाण्याची गरज नाही. जगात आजबाजूला अनेक ठिकाणी याचा अनुभव येत असतो. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रुट (Joe Root) याला याचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे त्याने आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (Joe Root ECB) तातडीची मागणी केली आहे.
काय आहे मागणी?
“आता विश्रांती आणि रोटेशन पॉलिसी बंद करण्याची वेळ आली आहे. जर सर्वजण फिट असतील तर आपण आपली बेस्ट टीम आगामी काळात मैदानात उतरवली पाहिजे. मी या विषयावर आशावादी आहे. आम्हाला आता दोन तगड्या टीमविरुद्ध 10 टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. त्यामुळे सर्वजण फिट आणि उपलब्ध असतील तर आमच्यातील सर्वोत्तम टीम मैदानात उतरली पाहिजे.
आगामी पाच टेस्टमध्ये आमची सर्वोत्तम टीम खेळायला हवी. त्यानंतर होणाऱ्या अॅशेस सीरिजसाठी तयारी करण्याची आणि त्या सीरिजपूर्वी टीममधील सर्व वरिष्ठ खेळाडूंना फॉर्ममध्ये येण्याची हीच योग्य पद्धत आहे.” असे मत रुटनं (Joe Root ECB) व्यक्त केले आहे.
का आहे नाराज?
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं कोरोना काळातील बायो-बबल आणि कठोर निर्बंधामुळे खेळाडूंच्या मनस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांना विश्रांती देण्याचा आणि आळीपाळीने खेळवण्याचा (Rest and Rotation Policy) निर्णय घेतला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी सर्वात महत्त्वाची असलेल्या भारताविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडने हे धोरण राबवले होते. या धोरणानुसार त्यांचा पहिल्या पसंतीचा विकेटकिपर आणि आक्रमक बॅट्समन जोस बटलर (Jos Buttler) हा एक टेस्ट खेळून मायदेशी परतला. तर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि मार्क वूड (Mark Wood) हे दोघे जण दोन टेस्टनंतर टीममध्ये दाखल झाले. इंग्लंडने भारताविरुद्धची सीरिज पहिली टेस्ट जिंकल्यानंतरही 1-3 ने गमावली. त्यामुळे त्यांच्याच देशात झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) टीव्हीवर पाहण्याची वेळ जो रुटवर आली.
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये देखील इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे न्यूझीलंडच्या B टीमविरुद्ध टेस्ट सीरिज गमावण्याची नामुश्की जो रुटला सहन करावी लागली.
टेस्ट क्रिकेटपुरतेच धोरण
जो रुटनं ‘ऑन कॅमेरा’ आजवर बोर्डाच्या या धोरणाची पाठराखण केली आहे. मात्र बोर्डाचे हे धोरण टेस्ट क्रिकेटसाठीच आहे. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी नाही, हे देखील त्याने अनुभवले आहे. टीम इंडिया पाठोपाठ श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्येही इंग्लंडनं त्यांची सर्वोत्तम T20 टीम उतरवली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड इऑन मॉर्गनला (Eoin Morgan) सर्वोत्तम टीम दिलीय, आपल्याला मात्र तडजोड करावी लागत आहे, ही खंत जो रुटला सतावत असेल, त्यामुळेच त्याने आता बोर्डाकडे (Joe Root ECB) मागणी केली आहे.
निवड समितीचा रुटला नाही तर मॉर्गनला पाठिंबा, इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सीरिजपासून वर्ल्ड़ टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सिझनला सुरुवात होत आहे. भारताविरुद्धच्या सीरिजनंतर या वर्षाच्या शेवटी इंग्लंडला ऑस्ट्रेलियात अॅशेस सीरिज खेळायची आहे. त्यामुळे आगामी 10 टेस्ट कॅप्टन म्हणून जो रुटसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.