इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) या गुजरातच्या (Gujarat) 23 वर्षांच्या फास्ट बॉलरची स्टँडबाय म्हणून निवड झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज (India vs England) भारतीय बॅट्समन्सला नेटमध्ये बॉलिंग करणे हे त्याचं मुख्य काम असेल.

कोण आहे अर्झान?

अर्झाननं 2018 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. बडोदा विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये त्याला युसूफ पठाणची (Yusuf Pathan) एकमेव विकेट मिळाली. पण त्यानंतर मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये त्यानं पाच विकेट्स घेतल्या. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांच्या विकेट्सचाही समावेश होता.

2019-20 चा रणजी सिझन अर्झानसाठी (Arzan Nagwaswalla) महत्त्वाचा ठरला. त्यानं त्या सिझनमध्ये 8 मॅचमध्ये 41 विकेट्स घेतल्या. त्यानं आजवर 16 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 62 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 20 लिस्ट A मॅचमध्ये 39 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये होती आशा

कोरोना लॉकडाऊननंतर या वर्षाच्या सुरुवातीला भारतामध्ये क्रिकेट पुन्हा सुरु झालं. सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेटमध्ये अर्झाननं 5 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या. तर विजय हजारे ट्रॉफीत 7 मॅचमध्ये त्यानं 19 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या स्पर्धेत गुजरातला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

आयपीएलपूर्वी झालेल्या दोन्ही स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानं अर्झानला एखादी टीम करारबद्ध करेल अशी आशा होती. त्याची आयपीएलसाठी 20 लाख रुपये बेस प्राईज होती. पण, त्याची निराशा झाली. एकाही टीमनं त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं नाही.

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, ‘या’ दिग्गजांना वगळलं

विराटची एकदाही भेट नाही

अर्झानला एकाही आयपीएल टीमनं करारबद्ध केलं नाही. पण, मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians)  त्याची नेट बॉलर म्हणून निवड केली. त्यामुळे त्याची रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि झहीर खान (Zaheer Khan) यांची भेट झाली. यापैकी झहीर खान हा त्याचा आदर्श आहे. अर्झानप्रमाणेच झहीर देखील डावखुरा फास्ट बॉलर. झहीरनं 2011 साली वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तो वर्ल्ड कप झाला तेंव्हा अर्झान 14 वर्षांचा होता. त्या वर्ल्ड कपमधील झहीरची बॉलिंग पाहून त्यानं क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची मात्र अर्झानची आजवर एकदाही भेट झालेली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या अर्झानची आता ही इच्छा पूर्ण होणार आहे. त्याच्या बॉलिंगसाठी इंग्लंडचे पिच आणि हवामान उपयोगी असल्याचं मानलं जातंय.

असा घडला ब्रिस्बेन टेस्टचा हिरो ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

भारताच्या विजयाची किल्ली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. (India vs New Zealand)  न्यूझीलंडच्या टीममध्ये ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि नील वॅगनर (Neil Wagner) हे डावखुरे फास्ट बॉलर्स आहेत. या दोघांचा सामना करताना टीम इंडियाच्या बॅट्समनची यापूर्वी भंबेरी उडाली आहे.

अर्झान देखील त्यांच्याप्रमाणे डावखुरा फास्ट बॉलर असल्यानं बोल्ट-वॅगनरचा अभ्यास करण्यासाठी तो नेटमध्ये उपयोगाचा आहे. त्याचबरोबर त्यानं मुंबई इंडियन्समध्ये असताना बोल्टची बॉलिंग अगदी जवळून पाहिली आहे. याचाही टीमला फायदा होणार आहे. त्यामुळे विराटला आजवर कधीही न भेटलेला अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकण्यासाठी ‘टीमची किल्ली ठरण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: