फोटो – ट्विटर

भारतीय क्रिकेटमध्ये 2008 साली एका तरूण मुलाचा उदय झाला. त्या मुलाच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी थोडासा जाड, काहीसा उर्मट आणि देहबोलीनं अस्सल दिल्लीचा वाटणाऱ्या त्या तरूणाचा म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli) गेला 14 वर्षांमधील प्रवास आपण सर्वांनी पाहिला आहे. पार्टी लव्हर ते फिटनेस फ्रिक, नवोदीत टॅलेंट ते ऑल टाईम ग्रेट, अंडर 19 कॅप्टन ते टीम इंडिया कॅप्टन हा प्रवास विराटनं मोठ्या कष्टानं पूर्ण केला आहे. विराट म्हणजे भारतीय क्रिकेट अशी काही वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. गेल्या काही महिन्यात ही परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. विराटचा फॉर्म सध्या हरपलाय. त्याच्यावर टीका करणारे आणि सल्ला देणारे या दोघांचीही संख्या वाढली आहे. विराटनं या बॅड पॅचमध्ये फक्त सचिन तेंडुलकरच्या एका इनिंगचा (Sachin Tendulkar Sydney Inning) अभ्यास करावा, त्याच्या बॅटींगमधील सर्व गोष्टी आपोआप पूर्वपदावर येतील.

विराटचं काय चुकतंय?

एकदा झालेली चूक पुन्हा न करणे आणि बॉलर्सना आपली विकेट घेण्यासाठी 100 टक्के नाही तर 200 टक्के प्रयत्न करायला लावणे ही विराट कोहलीच्या खेळाची खासियत होती. याच जोरावर तो रन मशिन बनला. त्याने 70 आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावल्या. सध्या सक्रीय असलेल्या क्रिकेटपटूंमधील बेस्ट अशी त्याची ओळख बनली.

गेल्या दोन वर्षात विराट ही ओळख विसरला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराट रंगात आला आहे. त्यानं मोठ्या खेळीचा पाया रचलाय. आता तो सेंच्युरी पूर्ण करणार असं वाटत असतानाच स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल खेळण्याच्या नादात विराट फसतो आणि त्याचा कॅच स्टंपमागे पकडला जातो. हे गेल्या तीन वर्षात एक दोन वेळा नाही तर 11 वेळा घडले आहे.

विराट कोहली आऊट झाल्यानंतर जितका आश्चर्यचकीत होतो त्यापेक्षा जास्त आश्यर्य वाटणारी ही आकडेवारी आहे. विराटला आऊट झाल्यानंतर जितका मोठा धक्का बसतो त्याहून जास्त धक्कादायक हे वास्तव आहे.

2 वर्ष, 50 मॅच आणि 20 संधी…. इन्तहा हो गई इंतजार की!

सचिन कसा सावरला?

विराट कोहलीची त्याच्या सातत्यपूर्ण खेळामुळेच सचिन तेंडुलकरशी तुलना करण्यात येते. सचिनचा 100 सेंच्युरीचा रेकॉर्ड विराट मोडू शकेल असा अनेकांना विश्वास आहे. सचिन तेंडुलकर देखील त्याच्या कारकिर्दीमध्ये एकदा याच प्रकारच्या बॅडपॅचमधून गेला होता.

टीम इंडिया 2003-04 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, त्या सीरिजमध्ये सचिनचा खराब फॉर्म ही टीम इंडियासाठी डोकेदुखी होता.  सिडनी टेस्टपूर्वी सचिननं त्या सीरिजमध्ये 0,1,37,0 आणि 44 असे फक्त 82 रन्स केले होते. सचिनला एकही हाफ सेंच्युरी झळकावता आली नव्हती. सिडनीपूर्वी झालेल्या (Sachin Tendulkar Sydney Inning) मेलबर्न टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये सचिन ऑफ साईडला खेळतानाच आऊट झाला होता.

पाकिस्तान विरुद्धच्या ‘या’ मॅचपूर्वी सचिन 12 रात्र जागा होता!

कसा खेळला सचिन?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्गला होणारी टेस्ट ही टीम इंडियाची या कॅलेंडर वर्षातील पहिली टेस्ट आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 2004 साली सिडनीमध्ये झालेली ती टेस्ट देखील त्या कॅलेंडर वर्षातील पहिलीच टेस्ट होती. नव्या वर्षात नव्या टेस्टमध्ये अगदी नवा सचिन तेव्हा क्रिकेट फॅन्सनी पाहिला.

सचिनने  2004 च्या सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) झळकावलेली डबल सेंच्युरी त्याने ऑफ साईडला एकही ड्राईव्ह न मारल्याने सर्वांच्या लक्षात राहिलेली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता रुजवणाऱ्या सचिननं सिडनी टेस्टमध्ये एकही ऑफ ड्राईव्ह न मारता त्याच्या करियरमधील तिसरी डबल सेंच्युरी झळकावली (Sachin Tendulkar Sydney Inning) होती.

…. म्हणून असा खेळला सचिन

सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना सचिन मैदानात आला. ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या प्लॅनवर त्याच्याकडे उत्तर होतं. ऑफ साईडच्या बॉलवर ‘ती चूक’ पुन्हा करायची नाही हे सचिनचं ठरलं होतं. सचिनने त्याच निग्रहाने तब्बल 10 तास बॅटिंग केली. मॅचच्या तिसऱ्या दिवशी एकूण दहा तासांपेक्षा जास्त बॅटिंग करुन सचिन नॉट आऊट परतला तेंव्हा भारताने सिडनीच्या मैदानावरील सर्वोच्च 7 आऊट 705 रन्सचा स्कोअर केला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या 436 बॉल्समधील नाबाद 241 रन्सचा समावेश होता. यामध्ये सचिननं 33 फोर लगावले होते.

“मी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळताना काही वेळा आऊट झालो होतो. त्यामुळे एकही कव्हर ट्राईव्ह खेळायचा नाही हे ठरवले होते. त्यांनी सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंग केली. मी ते सर्व बॉल सोडून द्यायचं ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी माझ्या बॅटवर बॉल टाकले. मी त्या बॉलच्या पेसचा वापर केला. ही माझी एक सर्वोत्तम सेंच्युरी आहे. संपूर्ण इनिंगमध्ये मी शिस्तशीर खेळू शकलो याचा मला आनंद आहे. यापूर्वी काही वेळा माझे काही फटके चुकले होते. त्यामुळे त्या फटक्यांना मुरड घातली पाहिजे, हे मला माहिती होते.’’  या साध्या आणि नेमक्या शब्दात सचिननं त्या इनिंगबद्दल (Sachin Tendulkar Sydney Inning) नंतर प्रतिक्रिया दिली होती.

विराट कोहलीसाठी नवीन वर्ष ठरणार खास, धमाकेदार रेकॉर्डची करणार नोंद

विराटनं शिकण्याची गरज

भारतानं पुढे सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियावर फॉलो ऑन लादण्याची संधी असूनही तो लादला नाही. सचिननं दुसऱ्या इनिंगमध्ये 82 रन्स काढले. सचिनच्या त्या खेळीमुळे स्टीव्ह वॉ ला त्याच्या क्रिकेट करियरमध्ये टेस्ट आणि भारताविरुद्धची सीरिज जिंकून निरोप देण्याचं ऑस्ट्रेलियन टीमचं स्वप्न अपूर्ण राहिले. चौथी टेस्ट संपल्यानंतर सचिनची सीरिजमधील सरासरी होती 76.60!

विराट कोहलीला सध्याच्या अडचणीच्या काळात शिकण्यासाठी प्रेरणा देणारी इनिंग ही त्याच्या घरातील माणसाने खेळली आहे. विराट सचिनचा खेळ पाहातच लहाणाचा मोठा झाला. तो सचिन सोबत खेळला आहे. त्यामुळे सचिन मोठ्या मॅचची, टेन्शन देणाऱ्या मॅचची तयारी कशी करत असे हे त्यानं प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्याचसोबत त्याला बॅटींगमधील कोणत्याही अडचणीवर सल्ला देण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) हा जगातील बेस्ट कोच विराटसोबत आफ्रिकेत आहे. विराटनं सचिनच्या सिडनीमधील इनिंगपासून (Sachin Tendulkar Sydney Inning) शिकत सेंच्युरीची प्रतीक्षा जोहान्सबर्गमधील टेस्टमध्यचे संपवली तर टीम इंडियाच्या फॅन्ससाठी नवीन वर्षाचं हे मोठं गिफ्ट असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: