फोटो – सोशल मीडिया

लेखक: आदित्य जोशी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी आणि निर्णायक टेस्ट केपटाऊनमध्ये सुरू झाली आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने मोठा स्कोअर करावा, अशी सर्वांची अपेक्षा होती. विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचा अलिकडच्या काळातील सर्वोत्तम खेळ केला. तरीही भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 223 रनवरच ऑल आऊट झाली. टीम इंडियाच्या निवडीचं नेहमीचं दुखणं (Team India Selection Problem) या टेस्टमध्येही कायम आहे.

पंचवार्षिक दुखणं

विराट केपटाऊनच्या पिचवर निर्धाराने खेळत होता. त्यावेळी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी साथ देणे आवश्यक होते. पण, तसे झाले नाही. पुजाराने प्रयत्न केला, पण तो सेट झाल्यानंतर आऊट झाला. अजिंक्यकडून ते देखील झाले नाही. हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे पर्याय उपलब्ध होते. त्यांना बेंचवरच बसवण्यात आले. कॅलेंडरची वर्ष बदलली, पण टीम इंडियाच्या निवडीचं दुखणं संपलेलं नाही. गेल्या पाच वर्षांपासून हे दुखणं टीम इंडियात घर करून आहे.

कॅप्टन विराट कोहली आणि माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीनंतरच्या तीन-चार वर्षांमध्ये मनमानी कारभार केला. त्यांच्याच काळात या दुखण्याने मुळ धरले. टीमचे सर्वाधिकार या दोघांकडेच होते. रवी शास्त्री आता मुलाखतींमध्ये काहीही सांगत असले तरी टीमच्या निवडीमध्ये कॅप्टन आणि कोचचा संपूर्ण सहभाग होता. गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये त्यांनी टेस्ट टीम उत्तम बांधली आणि परदेशातही भारताला विजय मिळू लागले. याच श्रेय या दोघांना आहेच, पण त्याचवेळी 2019 च्या वर्ल्ड कपनंतर वन-डे आणि T20 टीमची कॅप्टनसी रोहितकडे का आली नाही याचं कारण शास्त्री आणि कोहलीकडे असलेला कंट्रोल (Team India Selection Problem) हेचं होतं.

Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का?

किती उदाहरणं द्यायची…

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या मनी आले तर खेळाडूला 8-10 संधीही मिळाल्या अन्यथा 1-2 संधींनंतर घरी पाठवलं गेलं. मनिष पांडे (Manish Pandey) हा भारतातला सध्याही सर्वोत्तम फिल्डर आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि ऋतुराज गायकवाडने विजय हजारे स्पर्धेत भरपूर रन करून टीम निवडीसाठी त्यांचं नावं चर्चेत आणलं, पांडे तर गेली 10 वर्ष तेवढाचं चांगला खेळतोय. संधी मिळाली होती तेव्हा ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंच्युरीही केली. पण केवळ या जोडगोळीला नको म्हणून हा राखीव खेळाडू म्हणूनच बहुतांश राहीला.

ऋषी धवन, करन शर्मा, बरिंदर सरन, फझल, कौल, गुरकीरत सिंग मान हे सगळे अशाच मनमानी कारभारामुळे आले आणि गेले. कोणत्याही खेळाडूसाठी कामगिरी हा निकष लावण्यात आला (Team India Selection Problem) असं म्हणण्यास कमी वाव आहे.

मनिष दोडका आणि केदार लाडका!

मनिष पांडे दोडका तर केदार जाधव (Kedar Jadhav) हा या जोडगोळीचा (विराट-शास्त्री) लाडका. 2019 साली हाच आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देणार (Cricket World Cup 2019) अशी दोघांनाही खात्रीच होती. शिवाय त्याची चतूर बॉलिंग मोक्याच्या क्षणी विकेट देइल असा आत्मविश्वास होता. 2017 साली चांगली कामगिरी केल्यानंतर 2018 च्या 11 मॅचमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर होता 28. तरीही अर्थात त्याची निवड झालीच. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यावर या जोडगोळीला जाधवला नंबर चारला खेळवायची हिम्मत झाली नाही आणि सेमी फायनलला तर त्याला टीममध्ये पण घेण्यात आलं नाही.

ज्या खेळाडूला 3 वर्षांपासून तयार केलं गेलं त्याला अचानक झटकण्यात आलं. अंबाती रायुडूची कथा आणि व्यथा तर वेगळीच. नंबर चारला रायडू वर्ल्ड कपच्या आधीच्या न्यूझीलंड दौ-यामध्ये उत्तम खेळला होता, आयपीएलही चांगली झाली होती आणि त्याला पंधरामध्ये घेण्यात आलं नाही. रवी शास्त्रींनी  गेल्या पंधरा दिवसांत मुलाखतींमध्ये असं सांगितलं की 2019 च्या निवडीचा सगळा गोंधळ (Team India Selection Problem) निवड समितीने घातला. त्याच मुलाखतीमध्ये ते असंही म्हणतात, ‘जसप्रीत बुमराहाला तू दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी पदार्पण करशील असं त्यांनी चार महिन्यांपूर्वीच सांगितलं आणि त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या.’ याचा अर्थ ज्याचा त्याने समजून घ्यावा.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या अपयशाची 5 मुख्य कारणं

20 संधी झाल्या…

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या डोक्यावर टांगती तलवार गेल्या 10 मॅचपासून आहे. थोडक्यात त्यांना त्यांचं महत्त्व सिद्ध करायला 20 संधी मिळाल्या आहेत. दोघांनी त्यापैकी केवळ 3 किंवा अगदीच आकडेवारीची कथ्याकूट करत बसलो तर 4 वेळा त्यांचं योगदान दिलंय. कोणत्याही खेळाडूची कामगिरी कधीच त्याने केलेली सेंच्युरी किंवा 5 विकेट्स यावर ठरवायची नसते, तर त्याने कोणत्या परिस्थितीमध्ये किती आणि कसं योगदान दिलं यावर अवलंबून असते. अगदी हा मापदंड लावला तरी या दोघांचं संघामध्ये असणं पचनी पडणं अवघड आहे. कोहली-शास्त्री यांच्यामुळेच या दोघांना एवढ्या संधी मिळाल्या आहेत.

द्रविडला कोच म्हणून आल्यावर दोन सीरिजमध्ये मोठे बदल करणे अवघड असेल. पण या दोघांना अगणित संधी मिळत असताना, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, प्रियांक पांचाल, शुभमन गिल यांची मोक्याची वर्ष वाया घालवत आहोत. आता कोच नवीन आहेत आणि कोहलीचे पंखही छाटण्यात आले आहेत. निदान आता खेळाडूची निवड आणि वगळणं एका प्रोसेसने व्हावं एवढीच अपेक्षा आहे. ही साधी अपेक्षा पूर्ण झाली तर टीम इंडियाचं हे पंचवार्षिक दुखणं (Team India Selection Problem) संपेल. हेड कोच म्हणून हे दुखणं संपवण्यासाठी कुणाचीही पर्वा न करता द्रविड कडू गोळी कधी देणार हा प्रश्न आहे.

(आदित्य जोशी हे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आदित्य क्रिकेटचे उत्तम जाणकार असून याबाबत त्यांनी विवध वृत्तपत्रात लेखन केले आहे. )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: